Ravindra Jadeja Retirement : शनिवारी (29 जून) बार्बाडोस स्टेडियमवर टी20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला. यासह भारताने 17 वर्षांचा दुष्काळ संपवत दुसऱ्यांदा टी20 विश्वचषकावर आपले नाव कोरले. या ऐतिहासिक कामगिरीनंतर कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार क्रिकेटपटू विराट कोहली यांनी टी20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यांच्यापाठोपाठ आता अष्टपैलू रविंद्र जडेजा यानेही निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडिया पोस्टद्वारे त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे.
35 वर्षीय जडेजाने इंस्टाग्रामवर ट्रॉफीसोबतचा आपला फोटो शेअर करत टी20 क्रिकेटला अलविदा केल्याचे जाहीर केले आहे. त्याने लिहिले की, “कृतज्ञ अंतःकरणाने मी टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांना निरोप देतोय. अभिमानाने धावणाऱ्या घोड्याप्रमाणे, मी माझ्या देशासाठी नेहमीच माझे सर्वोत्तम दिले आहे आणि इतर फॉरमॅटमध्ये मी माझा उत्कृष्ट खेळ खेळत राहीन. टी20 विश्वचषक जिंकत मी माझ्या टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वात मोठे स्वप्न पूर्ण केले आहे. आठवणी, चिअर्स आणि अटूट पाठिंब्याबद्दल धन्यवाद,” अशी पोस्ट करत जडेजाने टी20 क्रिकेटला रामराम ठोकला आहे.
View this post on Instagram
दरम्यान जडेजाचा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील प्रवास उल्लेखनीय राहिला आहे. श्रीलंकेविरुद्ध फेब्रुवारी 2009 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील पदार्पणाचा सामना खेळला होता. त्यानंतर त्याने भारताकडून 74 टी20 सामने खेळताना 54 विकेट्स घेतल्या आणि 515 धावाही केल्या.