Manolo Marquez: भारतीय फुटबॉल संघाला (Indian Football Team) नवे मुख्य प्रशिक्षक मिळाले आहेत. इगोर स्टिमॅक (Igor Stimac) यांची हकालपट्टी केल्यानंतर जवळपास महिनाभरापेक्षा जास्तच्या कालावधीनंतर संघाला नवे मुख्य प्रशिक्षक (Indian Football Team Head Coach) मिळाले. स्पेनच्या मनोलो मार्केज (Manolo Marquez) यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. मार्केज सध्या एफसी गोवा (FC Goa) संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत.
Manolo Marquez appointed head coach of Senior Men’s National Team!
Read full details here 👉🏻 https://t.co/iUUMAwB8vk#IndianFootball ⚽️ pic.twitter.com/Ni9beyul8B
— Indian Football Team (@IndianFootball) July 20, 2024
स्टिमॅक यांच्यानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक बनण्यासाठी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (AIFF) अर्ज मागवले होते. मात्र, त्यानंतर तात्काळ प्रभावाने आता मार्केज यांची नियुक्ती केली गेली. मार्केज हे एफसी गोवा संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून देखील कायम राहतील. इंडियन सुपर लीग (ISL) नंतर त्यांच्याकडे संघाची पूर्णवेळ जबाबदारी देण्यात येणार आहे.
स्पेनचे नागरिक असलेले मार्केज सध्या 55 वर्षाचे आहेत. ते मागील चार वर्षांपासून भारतात प्रशिक्षण देत आहेत. त्यांनी 2020 ते 2023 या काळात हैदराबाद एफसी येथील संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. यामध्ये हैदराबाद संघाला एकदा विजेतेपद मिळवून देण्यात त्यांना यश आले. त्यानंतर त्यांनी मागील हंगामात ओडिशा एफसीचे मुख्य प्रशिक्षकपद भूषवले. तर, सध्या ते गोवा एफसीशी करारबद्ध आहेत.
तत्पूर्वी, त्यांनी स्पेनमध्ये मोठा कार्यकाळ घालवला. स्पेनमधील ला लीगा क्लब असलेल्या लास पल्मास संघाचे मॅनेजर म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेले. याव्यतिरिक्त अनेक छोट्या क्लबला मार्गदर्शन करण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड झाल्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले,
“भारतासारख्या देशाच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षकपद घेऊन मला सन्मानित झाल्यासारखे वाटते. भारताला मी माझे दुसरे घर समजतो. देशासाठी उत्कृष्ट काम करण्याचा माझा प्रयत्न राहील.”
मार्केज यांच्या नियुक्तीनंतर महासंघाचे अध्यक्ष कल्याण चौबे यांनी देखील त्यांचे स्वागत केले.
(Manolo Marquez Appointed As Indian Football Team Head Coach)