
Prithvi Shaw Join Maharashtra Ahead 2025-2026 Domestic Season: भारताचा आणि मुंबईचा अनुभवी सलामीवीर पृथ्वी शॉ याने अखेर मुंबई क्रिकेटला रामराम केला आहे. आगामी हंगामात तो महाराष्ट्र क्रिकेट संघासाठी खेळताना दिसेल. भारताचा आणि महाराष्ट्राचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याच्यासोबत तो सलामीची जबाबदारी सांभाळताना दिसेल. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (Maharashtra Cricket Association) चे अध्यक्ष रोहित पवार यांनी पृथ्वीचे स्वागत केले.
Prithvi Shaw Join Maharashtra Ahead 2025-2026 Domestic Season
पृथ्वी हा लहानपणापासून मुंबई क्रिकेटचा भाग राहिला होता. वयोगट क्रिकेटमध्ये जागतिक विक्रम केल्यानंतर त्याला 2017 मध्येच मुंबईचा रणजी संघात जागा मिळाली होती. त्यानंतर 2018 मध्ये अंडर 19 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा तो कर्णधार राहिला होता. त्याचवर्षी त्याला भारतासाठी कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने शतक झळकावले होते. त्यानंतर त्याला आपल्या कामगिरीत फारसे सातत्य ठेवता आले नाही. ऑस्ट्रेलियाच्या 2020-2021 दौऱ्यानंतर तो भारतीय संघातून बाहेर झाला.
मागील काही वर्षात तो अनेक मैदानाबाहेरील कारणांमुळे चर्चेत राहिलेला. मागील हंगामात त्याला मुंबई संघातून वगळण्यात देखील आले. तसेच, आयपीएलमध्ये त्याच्यावर कोणीही बोली लावली नव्हती. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा सरावात भाग घेण्यास सुरुवात केली.
मागील महिन्यात त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे दुसऱ्या राज्यात खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र मागितलेले. त्यानंतर आता मुंबईने त्याला ही परवानगी दिली असून, तो आता महाराष्ट्रासाठी खेळताना दिसेल.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: कमबॅकसाठी 25 वर्षांच्या Prithvi Shaw ने घेतला मोठा निर्णय