Breaking News

IPL 2024| ‘नेतृत्त्वबदलाचा खेळ’ मुंबई इंडियन्सला चांगलाच महागात पडला! फ्रँचायझीच्या ब्रँड व्हॅल्यूत मोठी घसरण

IPL 2024 teams brand valuation :- इंडियन प्रीमियर लीग (IPL) ची ब्रँड व्हॅल्यू दरवर्षी वाढत आहे. 2023 मध्ये आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू 15.4 अब्ज यूएस एवढी होती, परंतु 17 व्या हंगामाच्या समाप्तीनंतर त्यात 6.5 टक्क्यांनी जबरदस्त वाढ झाली आहे. आता या लीगची ब्रँड व्हॅल्यू 16.4 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे, जी भारतीय चलनात 1.3 लाख कोटी रुपयांच्या समतुल्य आहे. परंतु आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू वधारली असली तरीही लीगमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्सची ब्रँड व्हॅल्यू मात्र घसरली आहे.

हावलिन लॉकीच्या ताज्या अहवालानुसार, चेन्नई सुपर किंग्ज संघाची ब्रँड व्हॅल्यू सर्वाधिक आहे. 2024 मध्ये सीएसकेचे ब्रँड व्हॅल्यू $231 दशलक्ष आहे, जे भारतीय चलनात 19 अब्ज रुपयांच्या बरोबर आहे आहे. चेन्नईनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (1,896 कोटी) आणि विजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचा (1,805 कोटी) अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक आहे. मात्र मुंबई संघ ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत टॉप-3 मध्येही नाही. 2023 पर्यंत ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत अव्वलस्थानी असणारा मुंबईचा संघ थेट चौथ्या स्थानावर घसरला आहे.

मुंबई इंडियन्स, हा आयपीएलमधील एक यशस्वी आणि लोकप्रिय संघ आहे, मात्र आयपीएलच्या सतराव्या हंगामात फ्रँचायझीने रोहित शर्माला कर्णधारपदावरुन काढून टाकत हार्दिक पांड्याकडे नेतृत्त्वपद सोपवले. हार्दिकच्या नेतृत्त्वाखाली मुंबईचे हंगामातील प्रदर्शनही निराशादायी राहिले आणि संघ गुणतालिकेत तळाशी राहिला. या सर्व गोष्टींचा मुंबईच्या ब्रँड व्हॅल्यूवर मोठा परिणाम झाला, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. 204.0 दशलक्ष यूएस डॉलर्स अर्थात 1,704 कोटींच्या ब्रँड व्हॅल्यूसह मुंबई संघ यादीत चौथ्या स्थानावर आहे.

दरम्यान ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत राजस्थान रॉयल्सचा पाचवा क्रमांक लागतो. तर लखनऊ सुपर जायंट्स सर्वात शेवटच्या म्हणजेच दहाव्या स्थानावर आहे.

आयपीएल संघांचे ब्रँड मूल्यांकन (हावलिन लॉकी):

1. चेन्नई सुपर किंग्ज- 1,930 कोटी
2. रॉयल चॅलेंजर्स बंगलुरू- 1,896 कोटी
3. कोलकाता नाईट रायडर्स- 1,805 कोटी
4. मुंबई इंडियन्स- 1,704 कोटी
5. राजस्थान रॉयल्स- 1,111 कोटी.
6. सनरायझर्स हैदराबाद- 1,103 कोटी
7. दिल्ली कॅपिटल्स- 1,094 कोटी
8. गुजरात टायटन्स- 1,036 कोटी
9. पंजाब किंग्ज- 844 कोटी
10. लखनऊ सुपर जायंट्स- 760 कोटी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *