Jasprit Bumrah Performance In T20 World Cup 2024 :- टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) कामगिरी अतुलनीय राहिली. विशेषतः त्याची गोलंदाजी अतिशय कंजूष होती. त्याचा इकॉनॉमी रेट उत्कृष्ट होता. जसप्रीत बुमराहने या विश्वचषकात भारतीय संघाला नितांत गरज असताना अनेकदा विकेट्स मिळवून दिल्या, त्यामुळे त्याला संघाचा ‘अनसंग हिरो’ म्हणणे वावगे ठरणार नाही. त्याने टी20 विश्वचषकाच्या एकाच हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज आहे. अर्शदीप सिंगने (17) बुमराहपेक्षा जास्त विकेट्स घेतल्या.
बुमराहला या विश्वचषकातील सर्वात कंजूष गोलंदाज म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. जसप्रीत बुमराह आणि भारतीय संघाने या विश्वचषकात आपला पहिला सामना आयर्लंडविरुद्ध खेळला, जो भारताने जिंकला. या सामन्यात बुमराहने 3-1-6-2 अशी गोलंदाजी कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीमुळे भारतीय संघाने आयर्लंडचा एकतर्फी पराभव केला. बुमराहला त्याच्या या कामगिरीसाठी ‘सामनावीरा’चा खिताब देण्यात आला.
यानंतर, पाकिस्तानची पाळी आली, जिथे बुमराहने पुन्हा एकदा शानदार गोलंदाजी केली आणि 3 विकेट्स घेत सामनावीराचा खिताब पटकावला. विशेष म्हणजे त्या सामन्यात बुमराहने प्रथम बाबर आझम (13 धावा) आणि नंतर मोहम्मद रिझवान (31 धावा) यांना बाद केले. यानंतर, अखेरीस इफ्तिखार अहमद (5 धावा) देखील बाद झाला. अशाप्रकारे कमी धावसंख्येच्या सामन्यात भारताच्या विजयात बुमराहने महत्त्वाची भूमिका बजावली.
अमेरिकेविरुद्ध बुमराहने 4 षटकात 25 धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट मिळाली नाही. यानंतर बुमराह पुन्हा एकदा अफगाणिस्तानविरुद्ध धोकादायक फॉर्ममध्ये दिसला. येथे त्याने 4-1-7-3 असा बॉलिंग स्पेल टाकला.
यानंतर बुमराहने अत्यंत महत्त्वाच्या वेळी बांगलादेशलाही बॅकफूटवर आणले. जेव्हा नजमुल हसन शांतो (40 धावा) सेट दिसत होता. बुमराहने बांगलादेशी संघाविरुद्ध 4 षटकात 13 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातही त्याने असेच केले होते, ट्रॅव्हिस हेड (76 धावा) पूर्ण फॉर्मात असताना बुमराहने आपल्या संथ चेंडूवर रोहित शर्माच्या हातून त्याला झेलबाद करून भारताच्या बाजूने सामना फिरवला. विशेष म्हणजे त्या सामन्यात बुमराहची ही एकमेव विकेट होती. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत बुमराहने फिल सॉल्टला त्रिफळाचीत केले आणि जोफ्रा आर्चरचीही बत्ती गुल करुन सामना संपवला.
बुमराहचा अंतिम सामन्यात जलवा
अंतिम सामन्यातही बुमराहची जादू चालली. बुमराहने 4 षटकात 18 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. सर्वात आधी बुमराहने रीझा हेंड्रिक्सला त्रिफळाचीत केले. त्यानंतर 18व्या षटकात मार्को जॅनसेनला बाद केले. बुमराहने 18व्या षटकात केवळ 2 धावा दिल्या, हा सामन्याचा टर्निंग पॉइंट म्हणता येईल. अशाप्रकारे बुमराहने टी20 विश्वचषक 2024 मध्ये एकूण 8 सामन्यात 4.17 च्या इकॉनॉमी रेटने 15 विकेट्स घेतल्या. या लक्षणीय कामगिरीसाठी बुमराहची ‘मालिकावीर’ म्हणून निवड झाली.
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।