
Manchester United: जगातील सर्वात मोठी व्यवसायिक लीग फुटबॉल स्पर्धा असलेली इंग्लिश प्रीमियर लीग (Premier League 2025-2026) सुरू होऊन एक महिना उलटला आहे. रविवारी (14 सप्टेंबर) स्पर्धेतील चौथ्या फेरीचे सामने खेळले गेले. मँचेस्टर येथे झालेल्या मँचेस्टर डर्बी (Manchester Derby) सामन्यात मँचेस्टर सिटी (Manchester City) संघाने मँचेस्टर युनायटेड संघाचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. त्यानंतर युनायटेड संघावर जगभरातून टीकेची झोड उठली आहे.
Defeat in the derby. pic.twitter.com/Ift5I9oyyi
— Manchester United (@ManUtd) September 14, 2025
Manchester United Trolled After Manchester Derby Loss
मँचेस्टर येथील एतिहाद स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात सिटीने युनायटेड संघाला अक्षरशः नेस्तनाबूत केले. फिल फोडेन याने 18 व्या मिनिटाला गोल करत संघाचे खाते उघडले. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये एर्लिंग हालांड याने दोन गोल करत संघाचा विजय निश्चित केला. सामना संपण्याआधीच युनायटेड संघाचे चाहते स्टेडियम सोडून जाताना दिसले.
काही आठवड्यांपूर्वी युनायटेड संघाला लीग 2 मधील ग्रिम्स्बी क्लबकडून काराबाओ कपमध्ये पराभूत व्हावे लागले होते. तर प्रीमियर लीगमध्ये सध्या त्यांनी आतापर्यंत चार सामने खेळत एक विजय, एक बरोबरी व दोन पराभव अशी कामगिरी केली आहे. मागील वर्षी देखील ते लीगमध्ये 15 व्या क्रमांकावर राहिलेले. हे मागील 35 वर्षातील त्यांचे सर्वात निच्चांकी स्थान होते.
आतापर्यंत 20 वेळा प्रीमियर लीग जिंकणाऱ्या युनायटेडच्या या खराब कामगिरीसाठी मॅनेजर रूबेन आमोरिम (Ruben Amorim) यांना जबाबदार धरले जात आहे. मागील वर्षी टेन हॅग यांच्या जागी आमोरिम यांची नियुक्ती केली गेलेली. मात्र त्यांच्या मार्गदर्शनात खेळताना युनायटेड संघाचा विजय दर केवळ 26 टक्के आहे. जगभरातून चाहते त्यांना हटवण्याची मागणी आता करत आहेत.
युनायटेडचे दिग्गज समजल्या जाणाऱ्या वेन रूनी (Wayne Rooney), गॅरी नेविल, पीटर श्मेकल आणि इतर खेळाडूंनी देखील संघात सर्व काही आलबेल नसल्याचे म्हटले. ही संघाची आतापर्यंतची सर्वात खराब कामगिरी आहे असे त्यांनी म्हटले. हंगामाच्या सुरुवातीला खेळाडूंचा ट्रान्सफर करिता केलेला मिलियन डॉलरचा खर्च निरर्थक होता, अशी टीका श्मेकल यांनी केली. तरी देखील माजी खेळाडू व चाहते म्हणून आम्ही संघासोबत असू, असे देखील हे खेळाडू म्हणताना दिसले.
(Latest Sports News In Marathi)
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: कॅप्टन रजतचे पुन्हा सोनेरी यश! Duleep Trophy 2025 मध्य विभागाच्या नावे