Breaking News

Paris Olympics 2024: मनू भाकेर इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर! वाचा सोमवारी पॅरिसमध्ये काय घडले?

paris olympics 2024
Photo Courtesy: X

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 (Paris Olympics 2024) मध्ये तिसऱ्या दिवशी भारतीय संघासाठी पहिल्याच इव्हेंटमधून आनंदाची बातमी समोर आली. मिश्र प्रकारात झालेल्या 10 मी एअर पिस्टल पात्रता फेरीत भारताची मनू भाकेर (Manu Bhaker) व सरबजोत सिंग (Sarabjot Singh) या जोडीने ब्रॉंझ मेडल मॅचसाठी पात्रता मिळवली.

सोमवारी झालेल्या 10 मी एअर पिस्टल मिश्र प्रकारात भारताच्या दोन जोड्यांनी सहभाग घेतला होता. रविवारी कांस्यपदक जिंकणारी मनू भाकेर ही सरबजोत सिंग याच्यासह रेंजवर उतरली होती. तर, रिदम सांगवान व अर्जुन चिमा हे देखील भारताचे आव्हान सादर करत होते.

पात्रता फेरीच्या सुरुवातीला रिदम व अर्जुन हे पहिल्या चार मध्ये होते. मात्र, त्यानंतर त्यांना सातत्य राखता आले नाही. दुसऱ्या बाजूने मनू व सरबजोत यांनी पहिल्या चारमधील आपले स्थान खाली येऊ दिले नाही. त्यांनी पात्रता फेरी तिसऱ्या स्थानी संपवली. तर, रिदम व चिमा या जोडीला दहाव्या स्थानी समाधान मानावे लागले.

कोण आहे मनू भाकेरचे कोच? का होतेय त्यांची तुफान चर्चा? नक्की वाचाच

मिश्र 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात पहिल्या चार जोड्यांना  अंतिम फेरीत खेळण्याची संधी मिळते. पहिल्या दोन जोड्या थेट सुवर्णपदकासाठी लढतात. तर, तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावरील संघ ब्रॉंझ मेडल मॅचसाठी पात्रता मिळवतात. मनू व सरबजोत यांना हे मेडल जिंकण्यात यश आले तर, एकाच ऑलिंपिकमध्ये दोन पदके जिंकणारी मनू पहिली भारतीय महिला खेळाडू ठरेल. आतापर्यंतच्या ऑलिंपिक्स इतिहासात भारतासाठी ही कामगिरी कोणीही केलेली नाही. या व्यतिरिक्त म्हणून आणखी एका इव्हेंटमध्ये आपले आव्हान सादर करणार आहे. त्यामुळे तिच्याकडे एकाच ऑलिंपिकमध्ये तीन पदके जिंकण्याची सुवर्णसंधी असेल.

(Manu Bhaker Sarabjot Into Finals 10 M Air Pistol Mixed Final In Paris Olympics 2024)