Breaking News

क्ले कोर्टवरील वादळ थांबले! Rafael Nadal ने खेळला अखेरचा French Open सामना, 19 वर्षांचा प्रवास थांबला

rafael nadal retirement
Photo Courtesy: X/US Open

Rafael Nadal|स्पेनचा अनुभवी टेनिसपटू राफेल नदाल (Rafael Nadal) याने आपल्या कारकीर्दीतील अखेरचा फ्रेंच ओपन 2024 (French Open 2024) सामना खेळला. स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पराभूत झाल्यानंतर त्याने हा निर्णय घेतला. यासह त्याच्या 19 वर्षांच्या फ्रेंच ओपन कारकिर्दीची अखेर झाली.

मागील दोन वर्षांपासून सातत्याने दुखापतीची झुंज देत असलेल्या नदाल याने 2024 सिझननंतर निवृत्तीचे सुतोवाच केले होते. पहिल्याच फेरीत त्याच्यासमोर जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी असलेल्या ऍलेक्झांडर झेरेव (Alexander Zverev) याचे आव्हान होते. सध्या 37 वर्षांच्या असलेल्या नदाल याला युवा झेरेवने चांगलेच लढण्यास भाग पाडले. पहिला सेट झेरेवने 6-3 असा सहज नावे केला.

दुसऱ्या सेटमध्ये मात्र नदालने आक्रमक खेळ दाखवत आघाडी घेतली होती. मात्र,फॉर्ममध्ये असलेल्या झेरेवने शानदार कमबॅक करत टायब्रेकरमध्ये हा सेट 7-6 असा नावे केला. तिसऱ्या सेटच्या सुरुवातीचे दोन गेम नदाल याने आपल्या नावे केले. मात्र, युवा झेरेवने पुन्हा पुनरागमन करत हा सेट 6-3 असा जिंकत सामना खिशात घातला.

सामन्यानंतर बोलताना तो म्हणाला, “कदाचित मी इथे अखेरचा सामना खेळलो‌. पुढील वर्षी मी येईल की नाही माहित नाही. इथे मला नेहमीच प्रेम मिळत आले आहे. शक्य झाल्यास इथेच पुन्हा एकदा ऑलिम्पिकसाठी गाठ पडेल.”

नदाल याने वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी व्यावसायिक खेळाडू म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्याने 2005 मध्ये पहिल्यांदा फ्रेंच ओपन जिंकत आपल्या ग्रँडस्लॅम विजेतेपदांचे खाते खोलले. यानंतर 2022 फ्रेंच ओपनपर्यंत तब्बल 22 ग्रॅंडस्लॅम जिंकली. यामध्ये 14 फ्रेंच ओपन, 4 युएस ओपन व प्रत्येकी दोन ऑस्ट्रेलियन ओपन आणि विम्बल्डन यांचा समावेश होता. याशिवाय त्याने 2008 बीजिंग ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक देखील जिंकले. तसेच सर्वाधिक दिवस जागतिक क्रमवारीत पहिला क्रमांकावर राहण्याचा मान देखील त्याने मिळवला.

आपल्या कारकिर्दी दरम्यान रॉजर फेडरर व नोवाक जोकोविच यांच्याविरुद्धच्या त्याच्या लढती विशेष गाजल्या. त्याच्या या अखेरच्या सामन्याला जोकोविच याने विशेष हजेरी लावली होती.

(Spain Legend Tennis Player Rafael Nadal Played His Last French Open Match)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *