Breaking News

Tennis Hall Of Fame: पेस-अमृतराजने रचला इतिहास! संपूर्ण आशिया खंडात कोणालाही न‌ मिळालेला सन्मान केला नावे

TENNIS HALL OF FAME
Photo Courtesy: X/Olympic khel

International Tennis Hall Of Fame: भारताचे महान पुरुष टेनिसपटू विजय अमृतराज (Vijay Amritraj) व लिएंडर पेस (Leander Paes) यांनी भारताच्या तसेच आशियाई टेनिसच्या इतिहासात आपले नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले आहे. आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये मानाचा समजला जाणारा आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम (Tennis Hall Of Fame) पुरस्कार त्यांना मिळाला. या यादीमध्ये समावेश झालेले ते पहिलेच आशियाई टेनिसपटू आहेत.

पेस व अमृतराज यांना 28 व्यां वेळी दिल्या गेलेल्या या पुरस्कारांमध्ये स्थान मिळाले. टेनिस पत्रकारितेत अनेक वर्ष काम केलेल्या रिचर्ड इवान्स यांना देखील हा पुरस्कार देण्यात आला.

अमृतराज यांनी 1970 ते 1994 असा मोठा काळ आंतरराष्ट्रीय स्तरावर टेनिस खेळले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 18 व्या क्रमांक पर्यंत मजल मारली होती. यादरम्यान त्यांनी 15 एटीपी स्पर्धा आपल्या नावे केल्या. भारतीय संघाला दोनदा डेविस कप अंतिम फेरीपर्यंत नेण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. निवृत्तीनंतर देखील त्यांनी भारतात टेनिसचा प्रचार करण्यासाठी अनेक वर्ष मेहनत घेतली.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

दुसरीकडे सध्या 51 वर्षाच्या असलेल्या पेस याने काही वर्षांपूर्वीच निवृत्ती जाहीर केलेली. दुहेरीचा दिग्गज खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. पुरुष दुहेरी व मिश्र दुहेरी या दोन प्रकारात त्याच्या नावे तब्बल 18 ग्रँडस्लॅम विजेतेपद आहेत. विशेष म्हणजे त्याने 1996 अटलांटा ऑलिंपिकमध्ये पुरुष एकेरीत भारताला कांस्यपदक जिंकून दिले होते.

हा पुरस्कार मिळाल्यानंतर बोलताना पेस म्हणाला, “हा पुरस्कार देण्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. या दोन दिग्गजांच्या सोबतीने हा सन्मान स्वीकारताना मला अत्यंत आनंद होत आहे.” सध्या पेस हा राजकारणात आपले भवितव्य शोधताना दिसतोय.

(Leander Paes And Vijay Amritraj Honoured In Tennis Hall Of Fame)