Breaking News

Paris Olympics 2024: पहिल्या दिवशी नेमबाजांची निराशाजनक कामगिरी, सरबजोतची फायनल थोडक्यात हुकली

paris olympics 2024
Photo Courtesy: X

Paris Olympics 2024 Updates: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 (Paris Olympics 2024) च्या पहिल्या दिवसातील पहिले सत्र भारतीय पथकासाठी निराशाजनक राहिले. दोन इव्हेंटमध्ये भारताच्या सहा नेमबाजांनी सहभाग नोंदवला. मात्र, कोणालाही अंतिम फेरीत प्रवेश करताना नाही. तसेच, नौकानयनपटू बलराज पंवर (Balraj Panwar) हा देखील थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही.

पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात बलराज याने नौकानयनमध्ये भारताचे आव्हान सादर केले. मात्र, आपल्या हिटमध्ये तो चौथ्या क्रमांकावर राहिला. हिटमध्ये अव्वल राहणाऱ्या दोन खेळाडूंना थेट उपांत्य फेरीत संधी मिळते. अद्यापही त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले नाही. रेपचेजमध्ये त्याला अजूनही उपांत्य फेरी गाठण्याची संधी असेल.

पहिल्या दिवशी भारताचे तब्बल आठ नेमबाज आपले आव्हान सादर करणार होते. त्यापैकी पहिल्या सहा नेमबाजांना पूर्णतः अपयश आले. मिश्र 10 मीटर एयर रायफल प्रकारात भारताच्या दोन जोड्यांनी सहभाग नोंदवलेला. रमिता व अर्जुन बबुता या जोडीने चांगली सुरुवात केली. मात्र, त्यांना अखेरपर्यंत सातत्य राखता आले नाही. या जोडीने 628.7 इतके गुण कमावले. त्यांना सहाव्या स्थानी समाधान मानावे लागले. याच प्रकारात सहभागी झालेली दुसरी जोडी एलावेनिल वलारिवन व संदीप सिंग यांची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहीली. या जोडीने 12 व्या क्रमांकावर इव्हेंट समाप्त केला. अव्वल चार जोड्यांनाच पुढील फेरीत प्रवेश दिला जातो.

यानंतर झालेल्या पुरूष 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात सरबजोत सिंग (Sarabjot Singh) आणि अर्जुन सिंग चीमा यांनी सहभाग नोंदवला. सरबजोत याने सुरुवातीपासून चांगली नेमबाजी दाखवली. अखेरच्या चार सिरीज शिल्लक असताना तो पहिल्या चारमध्ये होता. मात्र, त्यानंतर त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. पूर्ण पात्रता फेरीनंतर सरबजोत व जर्मन नेमबाज 577 गुणांसह आठव्या स्थानी होते. मात्र, जर्मन नेमबाजाने 17 तर सरबजोतने 16 परफेक्ट शूट केल्याने, जर्मन नेमबाजाला आठवा क्रमांक देण्यात आला. या प्रकारात पहिल्या आठ नेमबाजांना अंतिम फेरीत संधी देण्यात येते. भारताचा दुसरा नेमबाज अर्जुन या प्रकारात अठराव्या क्रमांकावर राहिला.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

पहिल्या दिवसातील नेमबाजीतील अखेरचे आव्हान मनू भाकेर व रिदम सागवान सादर करतील. दोघीही महिला 10 मीटर एयर पिस्टल प्रकारात सहभाग नोंदवणार आहेत.

(Paris Olympics 2024 Updates 2024 Sarabjot Misses Final)

Paris Olympics 2024: ओपनिंग सेरेमनीमध्ये सिंधू-शरथने फडकाविला तिरंगा! पारंपारिक वेशभूषेत 117 ऍथलिटची हजेरी