![PARIS OLYMPICS 2024](https://kridacafe.com/wp-content/uploads/2024/07/PARIS-OLYMPICS-2024-UPDATES.jpg)
Paris Olympics 2024 Updates: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 (Paris Olympics 2024) च्या तिसऱ्या दिवशी लागलेले भारताचे निकाल :
(Paris Olympics 2024 Day 3 Updates)
सोमवारी (29 जुलै) भारतीय आव्हानाची सुरुवात मनू भाकेर (Shooter Manu Bhaker) व सरबजोत सिंग (Manu Bhaker And Sarabjot Singh) तसेच रिदम सांगवान व अर्जुन चिमा या जोड्यांनी केली. या दोन्ही जोड्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात पात्रता फेरी खेळण्यासाठी उतरल्या. त्यापैकी मनू व सरबजोत यांनी तिसरे स्थान पटकावले. रिदम व अर्जुन या जोडीला दहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. या विजयासह मनू व सरबजोत मंगळवारी (30 जुलै) थेट कांस्य पदकासाठी लढतील. दुपारी 1 वाजता त्यांची अंतिम फेरी खेळली जाईल.
सोमवारी 10 मीटर एअर रायफल महिला अंतिम फेरीत रमिता जिंदाल (Ramita Jindal) ही सहभागी झाली होती. मात्र, ती अंतिम फेरीत सातव्या क्रमांकावर राहिली. पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल अंतिम फेरीत अर्जुन बबुता (Arjun Babuta) याने प्रवेश केला होता. मात्र, अंतिम फेरीत तो दुर्दैवी ठरला. त्याला नकोशा चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. भारताचा ट्रॅप शूटर पृथ्वीराज तोडाईमान पात्रता फेरीत अखेरच्या स्थानी राहिला.
कोण आहे मनू भाकेरचे कोच? का होतेय त्यांची तुफान चर्चा? नक्की वाचाच
बॅडमिंटनमध्ये भारतासाठी संमिश्र दिवस राहिला. पुरूष एकेरीत लक्ष्य सेन (Lakshya Sen) याने गट फेरीतील आपला विजय साजरा केला. आता अखेरच्या गट फेरीतील सामन्यात त्याला पाचव्या मानांकित ख्रिस्टी याचे आव्हान असेल. पुरुष दुहेरीत भारतीय जोडी सात्विकसाईराज व चिराग शेट्टी (Satwiksairaj And Chirag Shetty) यांनी उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय जोडी बनली. फ्रान्सच्या जोडीचा सलग दुसरा पराभव झाल्याने व जर्मन जोडीने माघार घेतल्याने त्यांचा फायदा झाला. महिला दुहेरीत मात्र अश्विनी पोनप्पा व तनिशा क्रास्टो यांना सलग दुसऱ्या सामन्यात पराभूत व्हावे लागले.
भारतीय पुरूष हॉकी संघ (Indian Hockey Team) मात्र विजय मिळवण्यात अपयशी ठरला. अर्जेंटिनाविरूद्ध संघ तब्बल 58 मिनिटे मागे होता. अखेरच्या दोन मिनिटात गोल करत भारताने बरोबरी साधली. त्यामुळे संघाला एका गुणावर समाधान मानावे लागले. भारत आपला पुढील सामना आयर्लंडविरुद्ध खेळेल.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
भारताच्या पुरुष तिरंदाजी संघाकडून सर्वांना अपेक्षा होत्या. मात्र, उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात तुर्कीच्या संघाने 4-2 असा विजय मिळवत भारतीय चाहत्यांच्या पदरी निराशा टाकली. आता तिरंदाजीत भारताचे वैयक्तिक व मिश्र प्रकारात आव्हान शिल्लक आहे.
(Paris Olympics 2024 Updates Day 3 Manu Sarabjot In Bronze Match)