Breaking News

Rahul Dravid Bharatratna : जगज्जेत्या भारताचा प्रशिक्षक राहुल द्रविडला भारतरत्न द्या; कुणी केली ही मोठी मागणी?

Rahul Dravid Bharatratna Award: 29 जून 2024 रोजी भारतीय क्रिकेट संघाने ऐतिहासिक कामगिरी केली. गेल्या 10 वर्षांपासूनचा भारतीय संघाचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपला. तसेच तब्बल 17 वर्षांनंतर भारतीय संघाने टी20 विश्वचषक ट्रॉफी जिंकली. भारतीय संघाला टी20 विश्वचषक जिंकून देण्यात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचाही मोठा वाटा राहिला. दरम्यान आता जगज्जेता प्रशिक्षक राहुल द्रविडला ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी होत आहे. 

द्रविडच्या प्रशिक्षकपदाखाली, भारत जागतिक कसोटी अजिंक्यपद 2023 आणि वनडे विश्वचषक 2023 चा उपविजेता राहिला. प्रशिक्षक असण्यासोबतच द्रविडने भारतीय क्रिकेटमध्येही महत्वपूर्ण योगदान दिले आहे. तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (NCA) प्रमुख होते आणि 2018 मध्ये 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचाही प्रशिक्षक होता. एक खेळाडू म्हणून द्रविडने 24,177 धावा केल्या आहेत. द्रविडचा प्रभाव मैदानावर आणि मैदानाबाहेरही प्रचंड आहे.

यादरम्यान महान भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी द्रविडला सर्वोच्च नागरी पुरस्कार, भारतरत्न देण्याची मागणी केली आहे. गावसकरांनी एका लेखात लिहिले की, ‘भारत सरकारने द्रविडचा भारतरत्न देऊन गौरव केला तर ते योग्य ठरेल. कारण तो खरोखर एक महान खेळाडू आणि कर्णधार आहे, ज्याने वेस्ट इंडिजमध्ये मालिका जिंकली आणि इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकणारा तिसरा भारतीय कर्णधार ठरला. एनसीएचा अध्यक्ष या नात्याने त्याने तरुण प्रतिभेला जोपासले आणि त्यानंतर तो वरिष्ठ भारतीय संघाचा प्रशिक्षक बनला. वर्षाच्या सुरुवातीला समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या काही लोकांना भारतरत्न मिळाले होते. त्यांचे अत्यंत कट्टर समर्थकही मान्य करतील की त्यांचा प्रभाव मुख्यतः त्यांच्या पक्षापुरता आणि ज्या भागातून ते आले त्या भागापुरतेच मर्यादित होता.’

‘पण द्रविडची कामगिरी अशी आहे की त्यामुळे संपूर्ण देशाला आनंद झाला आहे. देशाच्या सर्वोच्च सन्मानासाठी द्रविड नक्कीच पात्र आहे. या देशाच्या या महान सुपुत्राचा सरकारने सन्मान करावा या मागणीसाठी माझ्यासोबत या. भारतरत्न राहुल शरद द्रविड, हे ऐकायला बरं वाटेल ना?,’ असेही गावसकरांनी पुढे लिहिलंय.