
19 November Bad Memories: दोन वर्षांपूर्वी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर करोडो भारतीय क्रिकेट चाहत्यांचे हृदय तोडणारा दिवस म्हणजे 19 नोव्हेंबर. बारा वर्षानंतर विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या क्रिकेटप्रेमींचे स्वप्न कमीत कमी पुढच्या चार वर्षासाठी चक्काचूर करणारा हा दिवस. Gen Z म्हटली जाणारी ही पिढी त्यांच्या आयुष्यातील सर्वात वाईट क्रिकेटिंग मेमरी म्हणून याकडे पाहिलं. त्याचीच ही नकोशी आठवण
Flashback World Cup 2023, Final Held 19th Nov,2023.
The image captures the conclusion of the 2023 ICC Men's Cricket World Cup final, where Australia defeated India. pic.twitter.com/4Aqu7CfyJ6
— CA Sumit Gupta (@007sg) November 19, 2025
2023 ODI World Cup Final 19 November
भारतात वर्ल्डकप होतोय आणि भारत फेवरेट असणे यामध्ये काही नवीन नव्हते. संघ अगदी वर्षभरापासून तयार होता. रोहित शर्मा (Rohit Sharma) नेतृत्व करत होता. वर्ल्डकप सुरू व्हायच्या तोंडावर एक बदल केला गेला. जखमी झालेल्या अक्षर पटेलच्या जागी अनुभवी रविचंद्रन अश्विनला संधी मिळाली. देशभरातील चारही दिशांच्या 10 शहरांत हा क्रिकेटचा कुंभमेळा सुरू झाला.
वर्ल्डकप सुरू झाला आणि पहिल्या दिवसापासून टीका व्हायला लागली. एकतर यजमान असूनही भारत पहिला सामना खेळत नव्हता. दुसरीकडे, इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड या सलामीच्या सामन्यात नरेंद्र मोदी स्टेडियमचे स्टॅंड अक्षरशः रिकामे दिसत होते. भारत चौथ्या दिवशी वर्ल्डकपमध्ये आपले आव्हान घेऊन उतरला.
चेन्नईच्या चेपॉकवर भर दुपारी तीन स्पिनर्स घेऊन उतरलेल्या भारतासमोर ऑस्ट्रेलियाचा निभाव लागलाच नाही. जडेजा आणि कुलदीपने कहर करत ऑस्ट्रेलियाचा डाव 199 मध्ये गुंडाळला. भारत सहज जिंकत सुरुवात करणार असे वाटले. मात्र, सोप्यात हार मानतील ते ऑस्ट्रेलियन कसे? भारतीय डावाची दुसरी ओव्हर संपली आणि स्कोअरकार्ड होते 3 बाद 2 धावा. काही समजायच्या आत रोहित, ईशान व अय्यर तंबूत परतलेले. मिच मार्शने 12 धावांवर विराटचा एक सोपा झेल सोडला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा तिखट मारा सुरूच होता. मात्र, विराट-राहुल टिच्चून उभे राहिले. असे की ऑस्ट्रेलियाला पुन्हा सेलिब्रेशन करायची संधीच दिली नाही. भारताला 167 पर्यंत पोहोचवून विराट वैयक्तिक 85 धावांवर बाद झाला. राहुलने शेवटपर्यंत उभे राहत हार्दिकसह विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. संघाला विजयासाठी पाच धावांची आवश्यकता असताना, राहुलला शतक करण्याची संधी होती. मात्र, चौकार मारण्याचा प्रयत्नात षटकार गेला आणि तो झुंजार 97 धावांवर नाबाद राहिला. परंतु, त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे भारताने विजयी सुरुवात केली होती.
शुभ आरंभ झाल्यानंतर भारतीय संघ थांबला नाही. दिल्लीत अफगाणिस्तान रोहितच्या पट्टात आला. त्याच्या शतकी धमाक्याने भारताचा दुसरा विजय साकार झालेला. मात्र, त्या सामन्यातही चर्चा झाली विराटचीच. नवीन उल हकसाठी प्रेक्षकांना टाळ्या वाजवायला लावून त्याने आयपीएलमधील वादावर पडदा टाकला. अहमदाबादमध्ये पाकिस्तान भारताला आव्हानच देऊ शकला नाही. सगळ्या बॉलर्सने रचलेल्या पायावर रोहितने 86 धावांचा तडाखा दिला. पुण्यात बांगलादेशविरुद्ध विराटचे शतक आले. भारताचा चौथा विजयही आला. मात्र, हार्दिक इंजर्ड होऊन वर्ल्डकपमधून बाहेर पडला. जगातील नंबर 1 ऑलराऊंडर आता क्रिकेटच्या सगळ्यात मोठ्या स्टेजवर दिसणार नव्हता.
भारतीय संघाला पुढचे आव्हान होते न्यूझीलंडचे. स्पर्धेच्या मध्यापर्यंत न्यूझीलंड आणि भारत टॉप 2 म्हणून पुढे आलेले. धर्मशालेत सामनाही तसाच रंगला. मिचेलच्या शतकाने न्यूझीलंडच्या डावाला आकार दिला. मात्र, शमीने क्लास दाखवत शेवटचे 6 विकेट 30 धावांत गुंडाळत न्यूझीलंडला 273 पर्यंत थांबवले. विराट पुन्हा उभा राहिला आणि 95 रन्सची लाजवाब इनिंग खेळत संघाला विजयाच्या दारात नेले. जडेजाने फिनिश करत संघ अजिंक्य ठेवला.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: IPL 2026 Retention: आयपीएल 19 साठी रिटेन आणि रिलीज झालेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी
लखनऊच्या इकानावर बॅंटिंगसाठी अवघड पीच असताना रोहितने आपल्या आक्रमक खेळाला मुरड घालून 87 ची इनिंग खेळली. दुसरा मुंबईकर सूर्यकुमार यादवने त्याला साथ दिली. त्या पीचवर शमी आणि बुमराहने 229 चा स्कोअर 329 सारखा केला. दोघांच्या तुफानी गोलंदाजीने इंग्लंडचा डाव 129 च्या पुढे जाऊ शकला नाही. शमीने बेन स्टोक्सविरूद्ध टाकलेला स्पेल तर अक्षरशः स्वप्नवत. या विजयानंतर भारताची सेमी-फायनलमधील जागा एकदम पक्की झालेली.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर 2011 च्या फायनलचा रिपीट पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांची श्रीलंकेने निराशा केली. मात्र, भारतीय संघाने पैसा वसूल खेळ दाखवला. गिल, विराट आणि श्रेयसने तोडफोड फलंदाजी करुन 357 इतकी डोंगरासारखी धावसंख्या उभी केली. सिराज-बुमराहने श्रीलंकेचे हाल 4 बाद 3 धावा असे केले. त्यावर शमीने चार चांद लावत श्रीलंकेला 8 बाद 29 अशा दयनीय अवस्थेत पोहचवले. अखेर श्रीलंकेला 55 वर ऑल आऊट करून 302 धावांनी वनडे इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवला. शमीने 3 मॅचमध्ये 5-4-5 अशी अवाक् करणारी कामगिरी केली.
ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना ‘विराटमय’ झाला. वनडे कारकिर्दीतील 50 वे शतक त्याच्या बॅटमधून आले. दक्षिण आफ्रिका 327 चा पाठलाग करताना 87 धावांवर ढेपाळली. यावेळी जडेजाने पंजा खोलला. बेंगळुरूमध्ये शेवटच्या साखळी सामन्यात नेदरलँडला अक्षरशः भारतीय फलंदाजांनी रगडले. टॉप फाईव्हने 50 प्लस स्कोर केला. त्यातही श्रेयस अय्यर आणि केएल राहुलची शतके. भारत 410. नेदरलँड्सने 250 पर्यंत संघर्ष केला. मात्र, हायलाईट राहिली ‘कोहली को बॉलिंग दो’ ही लाईन आणि त्यानंतर रोहित-विराटने घेतलेल्या विकेट्स. भारत अपराजित राहत सेमी-फायनलमध्ये पोहचलेला.
Two Years Of Heart Breaking 19 November
सेमी-फायनल होती भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईत. वानखेडेवर. समोर उभा राहिलेला आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये नेहमीच दुःखद आठवणी दिलेला न्यूझीलंड. मुंबईच्या त्या फलंदाजीसाठी स्वर्ग असलेल्या खेळपट्टीवर रोहित-गिलने 71 रनांची ओपनिंग दिली. रोहित आऊट झाल्यानंतर आलेल्या विराटने पुन्हा एकदा आपले विराट रूप दाखवायला सुरुवात केली. पहिल्या वर्ल्डकप शतकाकडे निघालेला गिल मात्र कमनशिबी ठरला. क्रॅम्पने त्याची हालचाल बंद झाली. दुर्दैवाने त्याला 80 धावांवर रिटायर्ड आऊट व्हावे लागले. मात्र, त्यानंतर आले मुंबईकर श्रेयस अय्यरचे तुफान. वर्ल्डकप नॉक-आऊटच्या इतिहासातील सर्वात इम्पॅक्टफुल अशी खेळी. श्रेयसच 69 चेंडूतील शतक.
रोहित, गिल आणि श्रेयस दमदार खेळले असले तरी तो दिवस विराट कोहली या नावासाठी लक्षात राहिला जाणार होता. क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या मैदानावर आणि त्याच्या साक्षीने विराटने आपले 51 वे वनडे शतक पूर्ण केले. सचिनला पाठीमागे टाकले. स्टेडियममध्ये आणि टेलिव्हिजनवर करोडो लोकांनी हा क्षण टाळ्या वाजवून साजरा केला. सेमी-फायनलमध्ये 397 इतकी अवाढव्य धावसंख्या भारताने उभी केली.
भारत सहज जिंकेल असे वाटत होते. मात्र, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे हे केन विल्यम्सन व डॅरिल मिचेल यांनी सिद्ध करण्याच्या दिशेने पाऊले टाकली. तिसऱ्या विकेटसाठी 179 रन्सची पार्टनरशिप झाली. मात्र, पुन्हा एकदा संघाच्या मदतीला धावला शमी. केनचा एक सोपा झेल सोडलेल्या शमीने केनलाच बाद करत भारतासाठी सामना सोपा करून टाकला. पुढच्या येणाऱ्या फलंदाजांनी आणखी 100 च धावांचा संघर्ष केला. एकवेळ सामना हरणार ही भीती वाटत असताना न्यूझीलंडला शमीने एकहाती लोळवले. त्याच्या नावावर होत्या 7 विकेट्स. खऱ्या अर्थाने GOAT कामगिरी. तब्बल 70 धावांनी विजय मिळवत भारत दिमाखात वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचलेला.
फायनलचा दिवस होता 19 नोव्हेंबर. मॅक्सवेलच्या ऐतिहासिक इनिंगनंतर स्फुरण चढलेला पाच वेळचा जगज्जेता ऑस्ट्रेलिया भिडायला तयार होता. फायनलच्या आदल्या दिवशी झालेल्या फोटोशूटमध्येही रोहितने डावी-उजवी करत नशीब आपल्या बाजूने राखायचा प्रयत्न केला. मात्र, क्रिकेट हे मैदानावर खेळले जात आणि ते देखील किमतीने. ही हिंमत ऑस्ट्रेलियन कॅप्टन पॅट कमिन्सने पत्रकार परिषदेत दाखवली.
“Nothing more satisfying than hearing a big crowd go silent”
या त्याच्या शब्दांमध्ये आत्मविश्वास दिसत होता. नरेंद्र मोदी स्टेडियमवर लाखाने फॅन्स आलेले. ऑस्ट्रेलियाचा झेंडा आणि पिवळी जर्सी दाखवायलाही मिळत नव्हती.
फायनलचा टॉस झाला आणि भारत पहिल्यांदा बॅटिंगसाठी उतरला. नुकताच फॉर्ममध्ये आलेला गिलचा सगळ्यात मोठ्या स्टेजवर निभाव लागू शकला नाही. त्याच्या नावापुढे फक्त चार धावा होत्या. मात्र, रोहितने वर्ल्डकपमध्ये अवलंबलेले ‘दे दणादण’ हे सूत्र कायम ठेवले. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. डावातील 10 वे षटक टाकायला आला ग्लेन मॅक्सवेल. पावर प्लेचे हे शेवटचे षटक. तिसऱ्या चेंडूवर षटकार आणि चौथ्या चेंडूवर चौकार मारत रोहितने त्या ओव्हरची वसुली केली होती.
Two Years Of Heart Breaking Of 19 November
परंतु, त्यानंतर आला तो क्षण.’खडा हूॅं आज भी वहीं’ चौथ्या चेंडूवर आणखी एक षटकार मारण्याचा प्रयत्न रोहितने केला आणि तो फसला. चेंडू बाहेरची कड घेऊन हवेत उडाला. ट्रेविस हेडने उलटा धावत जात तो एक अविश्वसनीय झेल पकडला. कोणाला माहित होतं, हा कॅच नव्हेतर मॅच होती. पुढच्या ओव्हरला कमिन्सने श्रेयसलाही तंबूची वाट दाखवली. त्यानंतर भारताच्या डावाला करकचून ब्रेक लागला. फायनलची मजाच निघून गेली. विराट आणि राहुलला चौकार षटकार सोडा, सिंगल-डबलही ऑस्ट्रेलियाने नीट घेऊ दिले नाहीत. मिस फिल्ड तर शक्यच नव्हती.
रडतखडत विराट फिफ्टीपर्यंत पोहोचला. मात्र, कमिन्सने त्याचा त्रिफळा उडवत, सगळ्या क्राउड सायलेंट केला. राहुलची 107 चेंडूतील 66 धावांची नकारात्मक खेळी, सूर्याने टाकलेली शस्त्रे आणि जडेजाने न दिलेली झुंज. भारत कसाबसा 240 पर्यंत पोहोचलेला. रोहित व विराटचे प्रत्येकी चार चौकार सोडल्यास, उर्वरित फलंदाजांनी फक्त चार चौकार मारलेले. त्यातीलही एक 11 नंबरच्या सिराजचा. भारत पहिल्याच डावात मागे पडलेला.
फलंदाजांनी कच खाल्ली तरी, वर्ल्डकपमध्ये मोक्याच्या वेळी संघाला तारणारे गोलंदाज अद्याप सामन्यात येणे बाकी होते. दुसऱ्याच ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर शमीने वॉर्नरला चालता केला. पाचव्या षटकात बुमराहने मार्शला माघारी पाठवत ऑस्ट्रेलियाच्या तंबूत खळबळ माजवली. ट्रेविस हेड पाच वेळा बीट झाला. सातव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाची धुरी असलेला स्टिव्ह स्मिथ पडला आणि इकडे भारताने वर्ल्डकप जिंकल्याचे सेलिब्रेशन सुरू झाले. परंतु, कोणालाच माहीत नव्हते, हे या सामन्यातील भारताचे शेवटचे सेलिब्रेशन ठरणार होते.
एका बाजूने मार्नस लाबुशेनने नांगर टाकला आणि दुसऱ्या बाजूने हेडने दांडपट्टा चालवला. 2003 वर्ल्डकप फायनलच्या ट्रॉमामधून बाहेर न पडलेल्या मिलेनियल्सला दुहेरी दुःख हेड देत राहिला. मारत राहिला. दे देखील एकही चान्स न देता. रिकी पॉंटिंगची आठवण करून देत त्याने फायनलमध्ये शतक ठोकले. लाबुशेनला संयमाचे फळ मिळाले. शतकानंतरही हेड भारताची गोलंदाजी फोडत राहिला. विजयासाठी केवळ 2 धावा हव्या असताना हेड बाद झाला. एक ऐतिहासिक इनिंग खेळून. साऱ्यांचा Respect मिळवून. ज्या मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकपमध्ये जिवंत ठेवलेले त्याच्याच वाट्याला ‘वर्ल्डकप विनिंग शॉट’ आला. ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वविजेता बनलेला.
तिसरा वर्ल्डकप जिंकण्याचे भारताचे स्वप्न लांबणीवर पडले. ‘बोले तैसा चाले’ ही उक्ती कमिन्सने खरी करून दाखवली. 19 November च्या ‘पुरूष दिनी’ विराट-रोहित आणि इतर करोडो ‘पुरूष’ अक्षरशः ढसाढसा रडले..!
Latest Sports News In Marathi
kridacafe
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।