Breaking News

कहाणी Nassau County Stadium ची! टी20 वर्ल्डकपसाठी फक्त 5 महिन्यात अमेरिकेने उभे केलेले आंतरराष्ट्रीय स्टेडियम

NASSAU COUNTY STADIUM
Photo Courtesy: X/BCCI

Story Of Nassau County Stadium|टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धा वेस्ट इंडीज आणि अमेरिका येथे आयोजित केली गेली आहे. स्पर्धेची अधिकृत सुरुवात  2 जून पासून होईल. या विश्वचषकाचे सहयजमान असलेली अमेरिका तीन शहरात सामने आयोजित करणार आहे. त्यापैकी एक स्टेडियम आहे न्यूयॉर्क येथील नॅसॉ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडियम (Nassau County International Cricket Stadium). मात्र, तुम्हाला हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल की, हे स्टेडियम फक्त पाच महिन्यात उभे केले गेले आहे.

नॅसॉ काऊंटी स्टेडियमवर विश्वचषकातील आठ सामने होणार आहेत. त्यापैकी सर्वात मोठा सामना हा पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान होईल. अमेरिकेतील आशियाई लोकांना विचारात घेऊन हा सामना येथे आयोजित केला गेला आहे. मात्र, 34,000 प्रेक्षक क्षमता असलेल्या या स्टेडियमच्या उभारण्याची कहाणी अगदीच रंजक आहे.

नोव्हेंबर 2021 च्या अखेरीस वेस्ट इंडिज व अमेरिका यांना स्पर्धेचे यजमानपद दिले. त्यावेळी अमेरिकेकडे फक्त फ्लोरिडा व डेल्लास येथील स्टेडियम उपलब्ध होती. तिसऱ्या स्टेडियमसाठी त्यांनी शोधाशोध सुरू केली. यापूर्वी अनेक क्रीडा स्पर्धांमध्ये वेन्यू डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम केलेल्या डॉन लॉकरबी यांच्याकडे ही जबाबदारी दिली गेली. त्यांनी स्टेडियमसाठी दोन-तीन जागांची पाहणी केली. मात्र, काही जागा आयसीसीला पसंत न पडल्याने तसेच काही ठिकाणी स्थानिक लोकांनी विरोध केल्याने अखेर लॉंग आयलंडच्या नॅसॉ काऊंटी येथील इसानहॉवर पार्कची जागा निश्चित केली गेली.

कागदोपत्री सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्टेडियम बनवण्यासाठी फक्त सहा महिने हातात होते. त्यामुळे तिथे पिच बनवण्यासाठी पर्याप्त वेळ नव्हता. यावर उपाय म्हणून आयसीसीने ऑस्ट्रेलियाच्या ऍडलेड येथून ड्रॉप इन पीच मागवण्याचा पर्याय निश्चित केला. त्यानंतर जानेवारी 2024 मध्ये स्टेडियम च्या कामाने गती घेतली. फेब्रुवारी महिन्यात ती जागा बर्फाने पूर्ण आच्छादली असताना देखील काम सुरू होते.

स्टेडियमचे ड्रेनेज, ग्रास आणि इतर सुविधा यांचे काम वेगाने होत असताना स्टॅन्डसाठी अमेरिकेतील मॉड्यूलर आर्किटेक्चर (Modular Architect) वापरण्यात आले. या स्टेडियमवर 34,000 प्रेक्षक बसतील अशी व्यवस्था केली गेली आहे. मात्र, वर्ल्डकप संपल्यानंतर ते सर्व स्टॅन्ड पुन्हा एकदा काढून टाकण्यात येतील. त्यांचा उपयोग गोल्फ तसेच फॉर्मुला 1 च्या स्पर्धांसाठी होईल. हे स्टेडियम उभे करण्यासाठी लॉकरबी यांनी दिवस-रात्र कष्ट घेत, विश्वचषकाच्या पंधरा दिवस आधीच स्टेडियम तयार केले. चार मुख्य पीचेस आणि सहा प्रॅक्टिस पिचेस सह हे स्टेडियम वर्ल्डकपसाठी एकदम तयार आहे.

नॅसॉ काऊंटी स्टेडियम हे जगातील पहिले असे क्रिकेट स्टेडियम आहे, ज्यावर एकही आंतरराष्ट्रीय सामना न होता थेट विश्वचषकाचा सामना होणार आहे. एक पडीक जमीन ते विलोभनीय स्टेडियम असा प्रवास नॅसॉ काऊंटी स्टेडियमने फक्त पाच महिन्यात करून दाखवत सर्वांना थक्क करून सोडले.

(Story Of Nassau County Stadium How USA Built International Cricket Stadium In 5 Months For T20 World Cup)

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *