Pat Cummins Hattrick : ऑस्ट्रेलिया संघाने डीएलएस पद्धतीनुसार बांगलादेशविरुद्धचा (AUS vs BAN) सुपर ८ सामना २८ धावांनी जिंकला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स (Pat Cummins) या सामन्याचा नायक राहिला. कमिन्सने बांगलादेशविरुद्ध विकेट्सची हॅट्ट्रिक घेतली. ही सध्या सुरू असलेल्या टी२० विश्वचषक २०२४ मधील पहिली हॅट्ट्रिक ठरली, तर टी२० विश्वचषकातील ही सातवी हॅट्ट्रिक होती.
कमिन्सने बांगलादेशविरुद्ध आपल्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये २९ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. यादरम्यान डावातील १८ व्या आणि १९व्या षटकात मिळून कमिन्सने सलग तीन विकेट्स घेत इतिहास रचला. १८व्या षटकातील पाचव्या चेंडूवर कमिन्सने बांगलादेशचा फलंदाज महमदुल्लाहला त्रिफळाचीत केले. त्यानंतर लगेचच पुढील चेंडूवर कमिन्सने नुकताच फलंदाजीला आलेल्या मेहंदी हसनला ऍडम झम्पाच्या हातून शून्यावर बाद केले. १९व्या षटकातील पहिल्या चेंडूवर कमिन्सकडे हॅट्ट्रिकची संधी होती, परंतु यावेळी त्याच्यापुढे ४० धावांवर खेळत असलेल्या तौहिद हृदोयचे आवाहन होते. मात्र कमिन्सने अगदी सहजरित्या जोश हेझलवुडच्या हातून तौहिदला झेलबाद केले. अशाप्रकारे कमिन्सने टी२० विश्वचषक आणि आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधील त्याची पहिली हॅट्ट्रिक घेतली.
यासह कमिन्स टी२० विश्वचषकात विकेट्सची हॅट्ट्रिक घेणारा सातवा गोलंदाज ठरला आहे. तसेच कमिन्स ऑस्ट्रेलियाकडून हॅट्ट्रिक घेणारा दुसराच गोलंदाजही आहे.
PAT CUMMINS BECOMES THE FIRST AUSTRALIAN TO TAKE MEN’S T20I WC HAT-TRICK AFTER 17 LONG YEARS. 🐐 pic.twitter.com/rt9rC5hImA
— Johns. (@CricCrazyJohns) June 21, 2024
पुरुषांच्या टी२० विश्वचषकात हॅट्ट्रिक घेणारे गोलंदाज
ब्रेट ली (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध बांगलादेश, केप टाउन, २००७
कर्टिस कॅम्फर (आयर्लंड) विरुद्ध नेदरलँड्स, अबू धाबी, २०२१
वानिंदू हसरंगा (श्रीलंका) विरुद्ध दक्षिण आफ्रिका, शारजाह, २०२१
कागिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका) विरुद्ध इंग्लंड, शारजाह, २०२१
कार्तिक मयप्पन (युएई) विरुद्ध श्रीलंका, गिलॉन्ग, २०२२
जोशुआ लिटल (आयर्लंड) विरुद्ध न्यूझीलंड, ॲडलेड, २०२२
पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) विरुद्ध बांगलादेश, अँटिग्वा, २०२४