![david miller](https://kridacafe.com/wp-content/uploads/2024/07/david-miller.jpg)
David Miller Retirement: टी20 विश्वचषक 2024 अंतिम सामन्यात (T20 World Cup 2024 Final) दक्षिण आफ्रिकेला भारताकडून पराभूत व्हावे लागले. या पराभवामुळे व्यथित झालेला दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज डेव्हिड मिलर (David Miller) याने आंतरराष्ट्रीय टी20 मधून निवृत्तीची घोषणा केली. मिलर याला अखेरच्या षटकात सामना संपवण्यात अपयश आलेले.
📲| David Miller via IG: pic.twitter.com/lAqBgUg8YZ
— KnightRidersXtra (@KRxtra) July 1, 2024
डेव्हिड मिलर हा दक्षिण आफ्रिका संघातील सर्वात अनुभवी खेळाडू होता. आपल्या कारकिर्दीत प्रथमच आयसीसी स्पर्धेचा अंतिम सामना खेळत असलेल्या मिलर याला सामना संपवण्याची सुवर्णसंधी होती. अखेरच्या षटकात 16 धावांची आवश्यकता असताना, त्याने मोठा फटका खेळला. मात्र, सूर्यकुमार यादव याने सीमारेषेवर त्याचा झेल पकडत सामना भारताच्या बाजूने झुकवला. सामन्यानंतर मिलर अत्यंत निराश झालेला दिसला.
याच निराशेतून त्याने दोन दिवसानंतर इंस्टाग्राम पोस्ट करत लिहिले,
’मी दुःखी आहे. दोन दिवसांपूर्वी जे काही झाले ते पचवणे मला अवघड जातेय. मला काय वाटते हे मी शब्दात सांगू शकत नाही. या संघावर मला अभिमान आहे. पूर्ण महिनाभरात चढउतारांनी झालेला हा रोमांचक प्रवास होता. आम्ही दुःखात आहे. मात्र, पुढे जाऊन हा संघ आपली क्षमता अजून वाढवेल.”
मिलर याने 2010 मध्ये टी20 आंतरराष्ट्रीय मध्ये पदार्पण केले होते. त्याने 125 सामन्यांमध्ये 2437 धावा केल्या. यादरम्यान त्याची सरासरी 33 पेक्षा जास्त तर स्ट्राईक रेट 140 पेक्षा अधिक राहिला. त्याच्या नावे आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये दोन शतके सामील आहेत. सध्या 35 वर्षांचा असलेला मिलर पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर वनडे क्रिकेटमधून देखील निवृत्त होण्याची शक्यता आहे.
(David Miller Announced Retirement From T20I)