Breaking News

यायला लागतय! कॅप्टन रोहितने दिले टीम इंडियाच्या Victory Parade चे निमंत्रण, मुंबईच्या रस्त्यांवर 4 जुलैला…

VICTORY PARADE
Photo Courtesy: X

Team India Victory Parade: टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) जिंकल्यानंतर चार दिवसांनी भारतीय संघ मायदेशात परतत आहे. गुरुवारी (4 जुलै) पहाटे भारतीय संघ दिल्ली येथे पोहोचल्यानंतर सायंकाळी मुंबईमध्ये संघाची विजयी मिरवणूक निघेल. या मिरवणुकीसाठी स्वतः भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने निमंत्रण दिले आहे.

भारतीय संघाने 29 जून रोजी झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला सात धावांनी पराभूत केलेले. यासह भारताने तब्बल 17 वर्षानंतर टी20 विश्वचषक उंचावला. त्यानंतर संघाच्या स्वागतासाठी सर्व क्रिकेटप्रेमी आतुर आहेत. अखेर पाच दिवसानंतर आपले विश्व विजेते खेळाडू पाहण्यासाठी सर्व चाहते घराबाहेर पडतील.

बार्बाडोसमध्ये आलेल्या चक्रीवादळामुळे भारतीय संघाला भारतात येण्यास उशीर झाला. गुरुवारी पहाटे दिल्ली येथे आल्यानंतर भारतीय संघ सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेईल. त्यानंतर मुंबईकडे प्रस्थान केल्यावर सायंकाळी 5 वाजता नरिमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम अशी मिरवणूक भारतीय संघाची निघेल. सर्व खेळाडूंना एका ओपन बसमध्ये बसवण्यात येईल.

याच मिरवणुकीचे निमंत्रण रोहितने एक्स पोस्ट करत दिले. त्याने लिहिले, ‘आम्ही सर्वजण तुमच्यासोबत एक खास क्षण साजरा करण्यासाठी तयार आहे. आपण सर्वजण 4 जुलै रोजी मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम येथे विश्वचषक विजयाचा जल्लोष साजरा करणार आहोत. ट्रॉफी घरी आलेली आहे.’

भारतीय संघाने 2007 मध्ये विश्वचषक जिंकल्यानंतर अशाच प्रकारे विजय मिरवणूक आयोजित केली गेलेली. त्यावेळी मुंबई विमानतळ ते वानखेडे स्टेडियम असा प्रवास झालेला.

(Rohit Sharma Invites Fans For T20 World Cup Victory Parade)