Team India Victory Parade : टी20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे मुंबईत आगमन झाले आहे. मुंबई विमानतळावर भारतीय संघाचे विमान उतरताच अनोख्या स्टाईलमध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले. भारतीय संघाच्या विमानासमोर पाण्याचा फव्वारा उडवत त्यांना अनोखी सलामी देण्यात आली. त्यानंतर विमानासमोर एका रांगेत चार गाड्या धावल्या, ज्यांवर भारताचा तिरंगा फडकताना दिसला. या शानदार स्वागतानंतर भारतीय संघ मिरवणुकीच्या बसच्या दिशेने रवाना झाला आहे. दरम्यान भारतीय संघाच्या विजय यात्रेसाठी मुंबईत क्रिकेटचाहत्यांची तुडुंब गर्दी भरली आहे.
जगज्जेत्या भारतीय संघाची मुंबईच्या एनसीपीए, नरिमन पॉईंटपासून वानखेडे स्टेडियमपर्यंत भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. या मिरवणुकीसाठी विशेष बसही सजवण्यात आली आहे. भारतीय संघाच्या या विजय यात्रेसाठी मरीन ड्राईव्हवर मोठ्या संख्येने चाहते जमा झाले आहेत. मरीन ड्राईव्हपासून ते वानखेडे स्टेडियमपर्य़ंत मुंबईच्या रस्त्यांवर अगदी पाय ठेवायलाही जागा नाही, इतकी मोठी गर्दी चाहत्यांनी केली आहे.
All in readiness for the #T20WorldCup Champions homecoming 🤩🇮🇳 pic.twitter.com/vCvvcJaIEZ
— ICC (@ICC) July 4, 2024
आयसीसीने मुंबईच्या रस्त्यांवरील चाहत्यांच्या गर्दीचे फोटो शेअर केले आहेत. केवळ मुंबईच्या रस्त्यांवरच नव्हे तर वानखेडे स्टेडियममध्येही चाहते खचाखच भरलेले आहेत. 2007 नंतर तब्बल 17 वर्षांची भारतीय क्रिकेटप्रेमींच्या हाती ही संधी आली आहे. ही गर्दी क्रिकेटचाहत्यांचे भारतीय संघावर असलेल्या प्रेमाचे हे प्रतीक आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.