Breaking News

MI New York बनली MLC 2025 ची चॅम्पियन! एमआय‌ फॅमिलीची 13 वी ट्रॉफी कॅबिनेटमध्ये

mi new york
Photo Courtesy: X

MI New York Won MLC 2025: अमेरिकेतील सर्वात मोठी टी20 लीग असलेल्या मेजर लीग क्रिकेट म्हणजे एमएलसी 2025 चा तिसरा हंगाम रविवारी (13 जुलै) समाप्त झाला. अंतिम सामन्यात एमआय न्यूयॉर्क संघाने वॉशिंग्टन फ्रीडम संघाचा 5 धावांनी पराभव केला. अखेरच्या षटकात 12 धावा वाचवणारा युवा वेगवान गोलंदाज ऋषी उगरकर (Rushi Ugarkar) हा विजयाचा शिल्पकार ठरला.

MI New York Won MLC 2025

स्पर्धेतील सर्वात सातत्यपूर्ण संघ असलेल्या वॉशिंग्टन फ्रीडमने पहिल्या क्वालिफायरमध्ये विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती. तर, सुरुवातीच्या सात पैकी सहा सामन्यात पराभव झालेल्या एमआय न्यूयॉर्कने आधी एलिमिनेटर व त्यानंतर क्वालिफायर 2 जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केलेला.

प्रथम फलंदाजी करताना न्यूयॉर्क संघाने 180 अशी मोठी धावसंख्या उभारली होती. अनुभवी क्विंटन डी कॉक या ने 46 चेंडूत सर्वाधिक 77 धावा बनवल्या. इतर फलंदाजांनी देखील उपयुक्त योगदान देत संघाला तिथपर्यंत मजल मारून दिली. वॉशिंग्टन संघासाठी लॉकी फर्ग्युसन याने सर्वाधिक तीन बळी मिळवले.

विजयासाठी मिळालेल्या 181 धावांचा पाठलाग करताना वॉशिंग्टन संघाला पहिल्याच षटकात शून्य धावसंख्येवर ट्रेंट बोल्टने दोन धक्के दिले. रचिन रवींद्र याने एका बाजूने किल्ला लढवत 70 धावा बनवल्या. जॅक एडवर्ड्स याने 33 धावांचे योगदान दिले. अखेरच्या टप्प्यात ग्लेन फिलिप्स याने जोरदार फटकेबाजी करत सामना आपल्या संघाच्या दिशेने नेला.

वॉशिंग्टन संघाला अखेरच्या षटकात 12 धावांची गरज होती‌. कर्णधार ग्लेन मॅक्सवेल व ग्लेन फिलिप्स या अनुभवी जोडी समोर युवा 22 वर्षीय ऋषी उगरकर याने चेंडू हातात घेतला. पहिल्या दोन चेंडूंवर एकेरी धाव गेल्यानंतर, तिसरा चेंडू निर्धाव टाकत चौथ्या चेंडूवर त्याने मॅक्सवेलला बाद केले. त्यानंतर अखेरचा चेंडूवर चौकार आला तरी, न्यूयॉर्क संघाने आपले दुसरे विजेतेपद पटकावले. ऋषी यालाच सामनावीर पुरस्कार देण्यात आला. वॉशिंग्टन संघाचा अष्टपैलू मिचेल ओवेन याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला.

न्यूयॉर्क संघाचे हे तीन हंगामातील दुसरे विजेतेपद आहे. तसेच फ्रॅंचाईजी मालक असलेल्या एमआय समूहाचे हे एकूण 13 वे विजेतेपद ठरले. मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएल व दोन वेळा चॅम्पियन्स लीग, मुंबई इंडियन्सने दोन वेळा डब्ल्यूपीएल, दोन वेळा एमएलसी व प्रत्येकी एक वेळा एसए 20 आणि आयएलटी20 विजेतेपद जिंकण्यात यश मिळवले आहे.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: Jannik Sinner बनला विम्बल्डन 2025 चा बादशाह! अल्कारेझचे साम्राज्य खालसा