Breaking News

INDvSA: कसोटीत मामला झाला गंभीर! विरोधी संघांनी ओळखली टीम इंडियाची दुखरी नस, 3 कसोटी…

indvsa
Photo Courtesy: X

INDvSA Kolkata Test: भारतीय क्रिकेट संघाला रविवारी (16 नोव्हेंबर) एका लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कोलकाता कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघ 124 धावांचे लक्ष गाठण्यात अपयशी ठरला. तुटपुंज्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला 30 धावांनी पराभूत व्हावे लागले. विशेष म्हणजे नजीकच्या काळात भारतीय संघावर सातत्याने अशी वेळ येत आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्या छोट्याशा कारकिर्दीत अशी वेळ तिसऱ्यांदा आली. 

INDvSA Team India Not Chasing Small Targets In Test

फिरकीला मदतगार असणाऱ्या या खेळपट्टीवर भारतीय संघापुढे तिसऱ्या दिवशी 124 धावांचे आव्हान होते. घरच्या वातावरणात फिरकी गोलंदाजी खेळण्याचा सराव असलेल्या भारतीय फलंदाजांना हे आव्हान पेलवले नाही. सायमन हार्मर (Simon Harmer) याच्या गोलंदाजी पुढे भारतीय फलंदाजांनी नांग्या टाकल्या. भारताचा संपूर्ण संघ अवघ्या 93 धावांवर सर्वबाद झाला.

कोलकात्यात मिळाली मात, टीम इंडियासाठी WTC 2025-2027 फायनलची अवघड वाट

मागील वर्षी न्यूझीलंड संघाने मुंबई कसोटीत भारतीय संघासमोर 147 धावांचे आव्हान ठेवले होते. भारतीय संघ हे आव्हान पार करण्यात अपयशी ठरलेला. भारताने ती संपूर्ण मालिका 3-0 अशा फरकाने गमावली होती. तर, चालू वर्षी इंग्लंड दौऱ्यावर लॉर्ड्स कसोटीत भारताला विजयाची संधी निर्माण झालेली. मात्र, 193 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ पराभूत झालेला. विशेष म्हणजे या तीनही वेळी प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर हेच उपस्थित होते. भारत आपल्या कसोटी इतिहासात सर्वात कमी म्हणजे 120 धावांचा पाठलाग करण्यात अपयशी ठरला होता. वेस्ट इंडिज दौऱ्यावर 1997 मध्ये ब्रिजटाऊन येथील भारतीय संघावर ही वेळ आली होती.

गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनात भारतीय संघ मायदेशात केवळ बांगलादेश व वेस्ट इंडिज याच संघांविरुद्ध विजय मिळवू शकला आहे. न्यूझीलंडने इतिहासात प्रथमच भारताला भारतात 3-0 असे पराभूत केले होते. तर, दक्षिण आफ्रिकेने 2010 नंतर भारतात प्रथमच कसोटी सामना जिंकला. दुसऱ्या गुवाहाटी कसोटीत विजय मिळवून मालिका बरोबरीत आणण्याचा प्रयत्न भारतीय संघ करेल.

Latest Sports News In Marathi

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

हे देखील वाचा: ईडनवर टीम इंडियाची निघाली लाज! Kolkata Test मध्ये 124 धावांचा पाठलाग करताना भारत 30 धावांनी पराभूत

जुना भिडू तरी ईडनवर मिळाली नवी ओळख! Simon Harmer ची जबरदस्त स्टोरी