
Omkar Tarmale Picked By SRH: भारतातीलच नव्हे तर जगभरातील युवा खेळाडूंचे स्वप्न असलेल्या आयपीएल स्पर्धेत खेळण्याची संधी अगदी थोडक्यांनाच मिळते. मोठा पैसा, प्रसिद्धी आणि त्याहून महत्त्वाचा म्हणजे अनुभव या गोष्टी एकाच जागी मिळतात. जगातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या या टी20 लीगमध्ये आता ठाण्याच्या शहापूर तालुक्याचा सुपुत्र ओमकार तारमळे (Omkar Tarmale) हा दिसणार आहे. दिग्गजांच्या खांद्याला खांदा लावून मैदान गाजवण्यासाठी सज्ज असलेल्या ओमकारची ही कहाणी.
Story Of SRH Bowler Omkar Tarmale
सध्या केवळ 23 वर्षांचा असलेला ओमकार हा शहापूर तालुक्यातील शेरे गावचा राहणारा. त्याचे वडील तुकाराम तारमळे हे शेतकरी आहेत. सहा फुटांपेक्षा जास्त उंची आणि धडधाकड शरीरयष्टी असलेला ओमकार हा सुरुवातीपासूनच क्रिकेटचा चाहता होता. अगदी लहान वयात त्याने वेगवान गोलंदाजी करण्यास सुरुवात केली.
ठाण्याच्या ग्रामीण भागातून येत असल्यामुळे ओमकार याच्याकडे क्रिकेट खेळण्याची पुरेशी संधी नव्हती. त्यामुळे अर्थातच त्याने क्रिकेटची सुरुवात टेनिस बॉल क्रिकेटने केली. कमी वयातच त्याचा वेग पाहून अनेकांनी त्याच्यातील गुणवत्ता ओळखली होती. मात्र, त्याच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने, घरातून त्याला हवी तितकी आर्थिक मदत मिळणे जवळपास अशक्य होते. मुंबई व ठाणे परिसरातील टेनिस क्रिकेट गाजवत त्याने आपली ओळख निर्माण केली. तसेच, थोडाफार आर्थिक हातभारही तो आपल्या कुटुंबाला लावत होता.
पुढे ओमकार याला सिझन बॉलने क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. हा निर्णय त्याचे आयुष्य बदलून टाकणारा होता. अपार मेहनत घेत असलेल्या ओमकारने प्रत्येक चेंडू जीव लावून टाकत संधी साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यामुळेच त्याला विविध स्पर्धांमध्ये सामील होता आले. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील तो खेळला. त्याच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमकार याला त्रिपुरा संघाकडून ट्रायलसाठी बोलवण्यात आले होते. तिकडे जाण्याकरिता पैसे नसल्याने त्याच्या आईने बचत गटातून तीन लाखांचे कर्ज घेतले. त्रिपुरामध्ये त्याची गोलंदाजी पाहून त्रिपुराने त्याला आपल्यासाठी खेळण्याची ऑफर देखील दिली होती. मात्र, त्याच्या वडिलांनी स्पष्ट शब्दात त्यांना नकार कळवलेला.
ओमकार पुन्हा एकदा ठाण्यात आल्यानंतर काही ओळखीच्या लोकांच्या माध्यमातून त्याला मुंबईत सिझन बॉल क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. घरापासून जवळच असल्याने त्याच्या वडिलांनी व कुटुंबाने देखील त्याला मुंबईत पाठवले. मुंबई रणजी संघ तसेच रिलायन्स अकादमी यांच्यासोबत सराव करण्याचा अनुभव देखील त्याला मिळाला. भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या याने त्याच्या गोलंदाजीने प्रभावित होत त्याला बॉलिंग शूज भेट म्हणून दिले होते.
जून महिन्यात झालेल्या टी20 मुंबई (T20 Mumbai League 2025) या लीगमध्ये तो ईगल ठाणे स्ट्रायकर्स संघात निवडला गेला. त्यावेळी त्याला दोन लाख रुपयात विकत घेतले गेलेले. या हंगामात त्याला केवळ दोन सामने खेळायला मिळाले. मात्र बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, या उक्तीप्रमाणे ओमकारने आपल्या टॅलेंटची झलक दाखवली. त्याने आपल्या पहिल्याच षटकात प्रत्येक चेंडू 145 प्रतितास इतक्या वेगाने टाकला. त्याचा वेग पाहून अनेक दिग्गजांनी तोंडात बोटे घातली होती. इथूनच तो अनेक संघांच्या नजरेत आला. टेनिस क्रिकेटमध्ये भन्नाट वेग व जोरदार फटकेबाजी करण्यात हातखंडा असलेल्या ओमकारने केवळ गोलंदाजीमध्ये लक्ष केंद्रित करत आणखी मेहनत घ्यायला सुरुवात केली. त्याचे फळ त्याला लवकरच मिळाले.
Story Of SRH New Fast Bowler Omkar Tarmale
सनरायझर्स हैदराबाद संघाचा वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक असलेल्या वरूण ऍरॉन यांच्या देखरेखीखाली झालेल्या ट्रायलमध्ये ओमकारने शानदार गोलंदाजी केली. उजव्या हाताने गोलंदाजी करणाऱ्या ओमकारने यॉर्कर्स व बाऊंसरने समोरच्या फलंदाजांची भंबेरी उडवल्याचे सांगितले जाते. त्याच्या याच कौशल्याच्या जोरावर मिनी लिलावात सनरायझर्स हैदराबादने 30 लाखांच्या बेस प्राईजवर त्याला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. यानंतर त्याच्या शेरे गावात फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली.
गावकऱ्यांनी ओमकारचा नागरी सत्कार केल्यानंतर प्रतिक्रिया देताना ओमकार म्हणाला, “आज लिलावात नाव आल्यानंतर सुरुवातीला कोणी बॅटन वर न केल्याने काहीसे दडपण आले होते. मात्र, सनरायझर्सने बोली लावल्यानंतर आनंद झाला. घरच्या परिस्थितीमुळे एक वेळ अशी आली होती की, मला वाटायचे क्रिकेट सोडावे. मात्र, त्यासोबतच विश्वास होता की, क्रिकेटमध्ये आपण नक्की काहीतरी करू.” ते बोलताना त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले.
आई-वडिलांनी केलेला संघर्ष, टेनिस क्रिकेटपासून झालेली सुरुवात ते आता जगातील सर्वात मोठ्या लीगमध्ये मिळालेली संधी असा ओमकारचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे. पॅट कमिन्ससारख्या दिग्गज गोलंदाजाच्या मार्गदर्शनात या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न नक्कीच ओमकार करताना दिसेल.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: कोण आहे हा Kartik Sharma? 19 व्या वर्षी 14 कोटींची लागली बोली
kridacafe
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।