T20 World Cup 2024: टी20 विश्वचषक 2024 मध्ये अखेरचा सुपर 8 सामना बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान (BAN vs AFG) असा खेळला गेला. पावसाच्या व्यत्ययात झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तान संघाने बांगलादेशला 8 धावांनी हरवत, उपांत्य फेरीत जागा पक्की केली. कोणत्याही आयसीसी स्पर्धेच्या उपांत्य फेरी पोहोचण्याची अफगाणिस्तानची ही पहिलीच वेळ आहे. त्याचवेळी अफगाणिस्तानच्या विजयामुळे आता ऑस्ट्रेलिया विश्वचषकातून बाहेर पडली आहे.
उपांत्य फेरीच्या दृष्टीने बांगलादेश व अफगाणिस्तान यांच्यासह ऑस्ट्रेलियाची नजर या सामन्यावर होती. प्रथम फलंदाजी करत असलेल्या अफगाणिस्तान संघाला गुरबाज व झादरान यांनी 10.4 षटकात 59 धावांची संथ सुरुवात दिली. मधल्या फळीतील फलंदाज योगदान न देऊ शकल्याने अफगाणिस्तान 18 षटकात 94 अशीच मजल मारू शकलेली. मात्र, कर्णधार राशिद खान याने अखेरीस तीन षटकार मारत संघाला 115 पर्यंत नेले.
उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी बांगलादेशला हे आव्हान 12.1 षटकात पूर्ण करणे गरजेचे होत. मात्र, त्यांची सुरुवात खराब झाली व अवघ्या तीन षटकात त्यांचे तीन फलंदाज माघारी परतले. एका बाजूने लिटन दास आक्रमक फलंदाजी करत असल्याने ते हे आव्हान पार करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होते. मात्र, राशिद खान याने चेंडू हातात घेतल्यानंतर आपल्या तीन षटकातच चार फलंदाजांना बाद करत सामना फिरवला.
उपांत्य फेरीच्या आशा संपल्यानंतरही दास उभा असल्याने बांगलादेश या सामन्यात विजय मिळवेल असे वाटत होते. मात्र, त्याने अचानक संथ खेळ सुरू केला. याबरोबरच तळातील फलंदाजांना पुढे केल्याने अफगाणिस्तान गोलंदाजांनी याचा फायदा घेतला. नवीन उल हक याने अखेरचे दोन फलंदाज बाद करत अफगाणिस्तानला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
अफगाणिस्तानच्या विजयामुळे आता उपांत्य फेरीत प्रवेश केलेले चारही संघ निश्चित झाले आहेत. पहिल्या उपांत्य सामन्यात अफगाणिस्तान व दक्षिण आफ्रिका खेळतील. तर, दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारताचा सामना इंग्लंडशी होईल.
(Afghanistan Into T20 World Cup 2024 Semi Finals Australia Out)