
WCPL 2024: वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या जाणाऱ्या महिला कॅरेबियन प्रीमियर लीग म्हणजेच डब्लूसीपीएल 2024 (WCPL 2024) स्पर्धेचा अंतिम सामना गुरुवारी मध्यरात्री खेळला गेला. या अंतिम सामन्यात गतविजेत्या बार्बाडोस रॉयल्स (Barbados Royals) संघाने ट्रिबॅंगो नाईट रायडर्स (TKR) संघाला चार गडी राखून पराभूत केले. यासह त्यांनी सलग दुसऱ्या वर्षी ट्रॉफी उंचावली.
Barbados Royals. WCPL Champions. AGAIN!!! 🏆🏆💗💗 pic.twitter.com/OpuT2MEjxR
— Barbados Royals (@BarbadosRoyals) August 29, 2024
त्रिनीदाद येथे झालेल्या या सामन्यात टीकेआर संघाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली होती. मात्र, रॉयल्सच्या गोलंदाजांनी त्यांना सामन्यात स्थिरावूच दिले नाही. जेनिलीया ग्लासगो हिच्या 24 व शिखा पांडे हिच्या 28 धावांव्यतिरिक्त कोणी फारसा संघर्ष केला नाही. त्यामुळे त्यांचा डाव केवळ 93 धावांमध्ये गुंडाळला गेला. बार्बाडोस संघासाठी आलिया अलिन हिने सर्वाधिक चार तर कर्णधार हायली मॅथ्यूज (Hayley Matthews) हिने दोन बळी मिळवले.
विजयासाठी मिळालेल्या सोप्या धावांचा पाठलाग करताना कर्णधार मॅथ्यूज व चमारी अटापट्टू यांनी 48 धावांची सलामी दिली. त्यानंतर नियमित अंतराने त्यांचे फलंदाज बाद होत राहिले. मात्र, आव्हान फारसे मोठे नसल्याने त्यांनी 15 व्या षटकात विजयाला गवसणी घातली. त्यांचे हे सलग दुसरे विजेतेपद असून, टीकेआरची दुसऱ्या विजेतेपदाची संधी हुकली. स्पर्धेत 147 धावा आणि 11 बळी घेणारी हायली मॅथ्यूज स्पर्धेची मानकरी ठरली.
(Barbados Royals Won WCPL 2024)