Gautam Gambhir As Head Coach: भारतीय क्रिकेट संघाचा नवा मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर (Gautam Gambhir) याची निवड केली गेली आहे. राहुल द्रविड यांच्या यशस्वी कारकीर्दीनंतर आता गंभीर भारतीय संघाचा कर्ताधर्ता म्हणून काम पाहिल. विशेष अटींसह हे पद स्वीकारल्यानंतर गंभीर याच्याकडे भारतीय क्रिकेटमधील सर्व ताकद असणार आहे असे बोलले जातेय. त्यामुळे तो भारतीय संघाला किती यश मिळवून देतो याकडे सर्वांचे लक्ष असेल.
यापूर्वी आयपीएलमध्ये लखनऊ सुपरजायंट्स व कोलकाता नाईट रायडर्स या संघांच्या मेंटरशिपचा अनुभव असल्यानंतर, गंभीर याला थेट राष्ट्रीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनवले गेले आहे. त्याने केकेआरला विजेता बनवत या पदासाठी दावा ठोकला होता. मात्र, राष्ट्रीय संघासमोरील आव्हाने मोठी असतात.
गंभीर याच्यापुढे सर्वात पहिले आव्हान असणार आहे या वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघ पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. मागील दोन मालिका भारतीय संघाने आपल्या नावे केल्या असून, यावेळी हॅट्रिक साधण्याची जबाबदारी गंभीरवर असेल. भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचणार की नाही हे बहुतांशी या मालिकेवर अवलंबून असेल.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
त्यानंतर आयसीसी ट्रॉफीच्या निमित्ताने पुढील वर्षी होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी महत्त्वपूर्ण असेल. तसेच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारत पोहोचल्यास यावेळी विजेतेपद पटकावण्यासाठी दावेदार ठरू शकतो. मागील दोन्ही अंतिम सामन्यात भारताला पराभूत व्हावे लागले आहे.
यानंतर पुढील वर्षी जून जुलै महिन्यात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाईल. तिथे भारताची परीक्षा होणार असून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारत कशी कामगिरी करतो हे पाहावे लागेल. भारताने 2007 नंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका विजय साजरा केलेला नाही.
गंभीरसाठी 2026 हे वर्ष विश्वचषकाचे वर्ष असणार आहे. कारण भारतातच टी20 विश्वचषक आयोजित केला जाईल. भारतीय संघ यजमान व गतविजेता अशा दोन्ही भूमिका घेऊन विजेतेपद राखण्यासाठी प्रयत्न करेल. त्यानंतर, न्यूझीलंडमध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका देखील खेळण्यासाठी भारत जाईल.
त्यानंतर अखेरीस गंभीर समोर सर्वात मोठे आव्हान असणार आहे ते वनडे विश्वचषकाचे. 2027 मध्ये दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या या विश्वचषकाकडे आत्तापासून सर्वांची नजर आहे. सोळा वर्षांचा दुष्काळ संपवून गंभीर भारताला वनडे विश्वविजेता बनवणार का? हे पाहणे रंजक असेल.
या सर्वांनी व्यतिरिक्त वरिष्ठ खेळाडूंसोबत गंभीर कशा प्रकारची भूमिका घेतो आणि संघातील वातावरण कसे ठेवतो, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष असेल.
(Challenges Ahead Gautam Gambhir As Team India Head Coach)
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।