Breaking News

Paris Olympics 2024 मध्ये हे शिलेदार वाढवणार महाराष्ट्राचा मान! मेडलचेही आहेत दावेदार

paris olympics 2024
Photo Courtesy: X

Maharashtra Athletes In Paris Olympics 2024:

खेळांचा कुंभमेळा अशी ओळख असलेल्या ऑलिंपिक्स खेळांचे आयोजन यावेळी फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिस (Paris Olympics 2024) येथे होणार आहे. या स्पर्धेला आता तीन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला असताना, भारतीय खेळाडूंचे पथक जवळपास पूर्ण होत आले आहे. आतापर्यंत भारताच्या 111 खेळाडूंनी ऑलिंपिक पात्रता मिळवली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे पाच खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसतील. विशेष म्हणजे या सर्व खेळाडूंकडून पदकांची अपेक्षा राहणार आहे.

1) अविनाश साबळे (Avinash Sable): भारताचा अव्वल स्टीपलचेस धावपटू अविनाश साबळे याच्याकडून देशाला ट्रॅक प्रकारातील पहिल्या ऑलिंपिक पदकाची अपेक्षा आहे. नुकत्याच झालेल्या पॅरिस डायमंड लीगमध्ये तब्बल दहाव्यांदा त्याने 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारातील राष्ट्रीय विक्रम मोडला. ऑलिंपिकमध्येही तो याच प्रकारात सहभाग नोंदवेल. बीडच्या मांडवा गावचा रहिवासी असलेल्या अविनाश याने राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धांमध्ये पदके जिंकली आहेत.

2) सर्वेश कुशारे (Sarvesh Kushare): अल्पावधीतच ओळख मिळवलेला उंचउडीपटू सर्वेश कुशारे याला प्रथमच ऑलिंपिकमध्ये सहभागाची संधी मिळाली आहे. जागतिक क्रमवारीत 23 व्या स्थानी असल्यामुळे, त्याला थेट पात्रता मिळाली. नाशिक येथील सर्वेश हा अनपेक्षितपणे मेडल देखील मिळवू शकतो.

3) प्रवीण जाधव (Pravin Jadhav): साताऱ्याचा तिरंदाज प्रवीण जाधव हा टोकियो ऑलिंपिक वेळी चांगलाच चर्चेत आला होता. तो पदकापासून थोडक्यात वंचित राहिलेला. यंदा मात्र त्याच्याकडून देशाला पदकाचे अपेक्षा असेल. सांघिक प्रकारात तो तरुणदीप रॉय व धीरज बोम्मदेवरा यांच्यासह भारताचे आव्हान सादर करेल.

4) स्वप्निल कुसळे (Swapnil Kusale): भारताला यावेळी नेमबाजी स्पर्धेमधून अधिक पदकांची अपेक्षा आहे. मागील दोन ऑलिंपिक्समध्ये भारतीय नेमबाज पदक जिंकण्यात अपयशी ठरले आहेत. यावेळी 21 भारतीय नेमबाज पदकावर निशाणा लावतील. कोल्हापूरचा रहिवासी असलेला स्वप्निल 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात आपले नशीब आजमावेल.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

5) चिराग शेट्टी (Chirag Shetty): मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या युवा बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी याच्यावर समस्त देशाची नजर असणार आहे. मुंबईचा चिराग हा भारताची सर्वात मोठी मेडल होप म्हणून चर्चेत आहे. सात्विक साईराज याच्यासह पुरुष दुहेरीच्या पदकावर तो कब्जा करू शकतो.

(Five Maharashtra Athletes In Indian Squad For Paris Olympics 2024)