IND vs SA Final :- वेस्ट इंडिजच्या बार्बाडोसच्या मैदानावर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) संघात टी20 विश्वचषक 2024 चा (T20 World Cup 2024 Final) अंतिम सामना होत आहे. या महामुकाबल्यात खेळाडूंच्या प्रदर्शनाबरोबरच नाणेफेकीची महत्त्वाची भूमिका असणार आहे. बार्बाडोसच्या ब्रिजटाउन येथील केनिंग्टन ओव्हल मैदानावर टी20 विश्वचषक अंतिम सामन्याचा थरार रंगत आहे. या सामन्यात संध्याकाळी 7.30 वाजता नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आता नाणेफेक जिंकत एकप्रकारे सामनाही भारताच्या बाजूने वळला आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कारण आकडेवारीही तेच सांगते आहे.
बार्बाडोसमध्ये 2024 च्या टी20 विश्वचषक अंतिम सामन्यापूर्वी आतापर्यंत 8 सामने खेळले गेले आहेत. येथील खेळपट्टीचे वैशिष्ट्य म्हणजे येथे फलंदाजांसोबतच गोलंदाजांनाही पूर्ण साथ मिळते. या मैदानावर मोठी धावसंख्या पाहायला मिळते आणि येथेच भारताने सुपर 8 सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला होता. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडली होती. प्रथम फलंदाजी करताना भारताने 8 बाद 181 धावा फलकावर लावल्या होत्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानला 134 धावांवर सर्वबाद करत सामना खिशात घातला होता. बार्बाडोसमध्ये धावसंख्येचा पाठलाग करणे सोपे नाही. अशा परिस्थितीत अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 175 धावसंख्या जरी फलकावर लावल्या तरीही ती विजयी धावसंख्या असेल.
बार्बाडोसच्या स्टेडियमवर आतापर्यंत एकूण 32 सामने खेळले गेले आहेत, ज्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी 19 सामने जिंकले आहेत; तर नंतर फलंदाजी करणाऱ्या संघांनी 10 सामने जिंकले आहेत. येथील पहिल्या डावाची सरासरी 153 धावांची आहे. अशा स्थितीत अंतिम फेरीत संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल. या मैदानावर सर्वाधिक धावसंख्या वेस्ट इंडिजने इंग्लंडविरुद्ध केली होती, जी 5 विकेट्सच्या नुकासानावर 224 धावा होती. तर सर्वात कमी धावसंख्येचा विक्रम अफगाणिस्तानच्या नावावर आहे, जो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 80 धावांवर सर्वबाद झाला होता. या मैदानावर सर्वात मोठे धावांचे आव्हान वेस्ट इंडिजने (172/6) इंग्लंडविरुद्ध केले होते.