Indian Cricket Team: भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फिरकीपटू आर अश्विन (R Ashwin) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. बुधवारी (18 डिसेंबर) बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) मालिकेतील तिसऱ्या सामन्यानंतर त्याने ही घोषणा केली. त्याच्या या निर्णयाने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, पुढील महिनाभराच्या काळात भारतीय संघात आणखी बदल होऊन, अनेक वरिष्ठ खेळाडू कसोटी संघातून बाहेर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Indian Cricket Team Who Retire Next)
Indian Cricket Team
तिसरी कसोटी अनिर्णित अवस्थेत संपल्यानंतर अश्विन याने आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. पावसामुळे सामना थांबला असताना, त्याने विराट कोहली (Virat Kohli) याला भावनिक होऊन मिठी मारल्याचे दिसत होते. तिथेच अश्विन हा निर्णय घेणार असल्याचे अंदाज वर्तवले जाऊ लागलेले. त्यानंतर अवघ्या काही वेळातच याची अधिकृत घोषणा झाली. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने देखील खुलासा केला की, ऑस्ट्रेलियात पोहोचल्यानंतरच अश्विनने याबाबत विचार करण्यास सुरुवात केली होती. अखेर मालिकेच्या मध्यातच त्याने आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द थांबवली.
A Legend Bids Adieu to International Cricket 👏👏
Hear what R Ashwin’s parting words were to the Indian dressing room 🎥🔽#TeamIndia | @ashwinravi99 https://t.co/6wtwdDOmzX
— BCCI (@BCCI) December 18, 2024
सध्या अश्विन याने वयाची 38 वर्ष पार केली आहेत. त्याचा फॉर्म पाहता तो आणखी काही वर्ष कसोटी क्रिकेट खेळू शकला असता, असे माजी क्रिकेटपटू म्हणत आहेत. मात्र, न्यूझीलंडविरुद्धची काहीशी खराब कामगिरी व ऑस्ट्रेलियात मिळालेल्या एकमेव संधीमुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे दिसते. तसेच, भारताला पुढील कसोटी मालिका थेट सात महिन्यांनी खेळायची आहे. त्यामुळे, भविष्याचा विचार करून अश्विनने हा निर्णय घेतला असावा. परंतु, आगामी महिनाभरात असे अनेक निर्णय पाहायला मिळू शकतात.
सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका 1-1 अशा बरोबरीत आहे. या मालिकेतील पुढील दोन सामने जिंकल्यानंतरच भारतीय संघाची जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील जागा नक्की होईल. असे न झाल्यास, भारतीय संघाला थेट पुढील सायकलमध्ये कसोटी सामना खेळायला मिळेल. त्यावेळी एक युवा संघ तयार करण्याच्या दिशेने संघ व्यवस्थापन चालल्याचे दिसते. असे झाल्यास, सध्याच्या कसोटी संघातील अनेक वरिष्ठ खेळाडूंना डच्चू मिळू शकतो.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
विराट कोहली याला पहिल्या सामन्यातील शतक वगळता उर्वरित 4 डावांमध्ये सपशेल अपयश आले आहे. विशेष म्हणजे त्याचे हे शतक देखील वर्षभराच्या कालावधीनंतर आले होते. आगामी दोन सामन्यात त्याची कामगिरी अशीच राहिल्यास, त्याच्यावर निवृत्तीचा प्रचंड दबाव असेल. सध्या विराट 36 वर्षांचा असून, त्याचा फिटनेस पाहता तो आणखी एक सायकल निश्चित खेळू शकतो. मात्र, यासाठी त्याचा फॉर्म सर्वात महत्त्वाचा असेल.
कर्णधार रोहित शर्मा याच्यासाठी ही मालिका जवळपास डू ऑर डाय अशा स्वरूपाची बनली आहे. रोहितने मालिकेतील पहिला सामना खेळला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह याने नेतृत्व करत संघाला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर रोहितने नेतृत्व स्वीकारल्यावर भारतीय संघ एका सामन्यात पराभूत झाला. तर, दुसऱ्या सामन्यात भारतीय संघावरील फॉलोऑनची नामुष्की थोडक्यात टळली होती. विशेष म्हणजे रोहितचे नेतृत्व या दोन्ही सामन्यात प्रभावहीन वाटले.
रोहित या मालिकेत खेळलेल्या तीनही डावात 20 धावांची खेळी देखील करू शकला नाही. रोहित या मालिकेनंतर कसोटी सामना खेळण्यासाठी उतरेल तेव्हा 38 वर्षांचा टप्पा पार करेल. आगामी दोन सामन्यात फलंदाज आणि कर्णधार म्हणून तो अपयशी ठरल्यास, कसोटी क्रिकेटमधील त्याची कारकीर्द जवळपास समाप्त होऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे रोहित आपल्या नियमित सलामीवीराच्या भूमिकेत न खेळता मध्यफळीत खेळत असल्याने त्याच्यापुढे मोठे आव्हान असेल. मधल्या फळीत त्याला ध्रुव जुरेल व सर्फराज खान आव्हान देत आहेत.
अश्विनचा स्पिन पार्टनर असलेला रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) हा देखील आपल्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात आहे. मात्र, ब्रिस्बेन कसोटीच्या पहिल्या डावात त्याने झळकावलेल्या शानदार अर्धशतकामुळे व मायदेशातील गोलंदाजी फॉर्ममुळे तो सध्यातरी संघ व्यवस्थापनाच्या रडावर नसेल. अश्विनच्या निवृत्तीनंतर त्याच्यावर अतिरिक्त जबाबदारी आल्याने तो, कसोटी संघाचा प्रमुख फिरकी गोलंदाज म्हणून आणखी एक डब्ल्यूटीसी सायकल खेळणे जवळपास निश्चित दिसते.
या व्यतिरिक्त भारतीय संघातून वर्षभरापासून बाहेर असलेले अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) व चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) हे पुनरागमन करण्याची शक्यता सध्या तरी धुसर दिसते. तसेच, वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा व उमेश यादव यांच्यासाठी देखील भारतीय संघाचे दरवाजे बंद झाले ते स्पष्ट दिसत आहे.
एकंदर परिस्थिती पाहता, विराट कोहलीच्या नेतृत्वात तयार झालेल्या व देश-विदेशात यशस्वी ठरलेल्या या संघातील सर्वच खेळाडू आगामी एक-दोन वर्षाच्या काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून बाजूला होऊ शकतात.
(Indian Cricket Team Who Retire Next? Virat Kohli Rohit Sharma Under Radar)
हे देखील वाचा- बिग ब्रेकिंग| R Ashwin चा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, 15 वर्षांच्या दैदिप्यमान कारकिर्दीची सांगता
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।