Team India’s Champions Trophy 2013 Victory:
तारीख 23 जून 2013, मैदान बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन स्टेडियम, सामना होता आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 चा अंतिम सामना. समोरासमोर होते यजमान इंग्लंड आणि वनडे वर्ल्ड चॅम्पियन भारत. स्पर्धेतील दोन बलाढ्य संघ या मिनी वर्ल्डकप साठी भिडणार होते. दोन्ही क्रिकेटवेड्या देशातील रस्ते जवळपास निर्मनुष्य झालेले. कारण, दोन्ही संघांना कोणत्याही परिस्थितीत ही ट्रॉफी पाहिजेच होती.
🗓️ #OnThisDay in 2013
📍 Edgbaston, Birmingham
The @msdhoni-led #TeamIndia beat England to lift the ICC Champions Trophy 🏆 👏 pic.twitter.com/SFr1Tifs2J
— BCCI (@BCCI) June 23, 2024
सगळी तयारी झाली होती मात्र वरूणराजाला ही तयारी पाहावली नाही. ब्रॉडकास्टिंग सुरू झालं तसं मैदानावर कव्हर्स दिसत होते. थोड्या थोड्या वेळाने पंच जात आणि पाहणी करून येत. एक तासात सामना सुरू होईल, अर्ध्या तासात सामना सुरू होईल. पुन्हा पाऊस आला, पाऊस गेला, 45 ओव्हरचा सामना होणार, 35 ओव्हरचा सामना होणार, अशा अपडेट येत राहिल्या. भारतात रात्र होत आली होती. अनेकांनी आशा सोडून दिली की सामना सुरू होईल. चाहत्यांच्या आनंदावर विरजण पडलेले. अखेर तब्बल साडेपाच तासांच्या प्रतीक्षेनंतर फायनल अपडेट आली की, प्रत्येकी 20 ओव्हरचा सामना होणार.
वनडे क्रिकेटमधील दुसऱ्या सर्वात मोठ्या स्पर्धेचा विजेता टी20 मॅचने ठरणार होता. टॉसला जाण्यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार ऍलिस्टर कूक याने थोडा विचार केला की, खरंच आपण हा सामना खेळायचा का? मात्र अखेर त्यानेच कर्णधार व सलामीवीर म्हणून खेळण्याचा निर्णय घेतला. आयसीसीचे आधीच ठरल्या प्रमाणे त्यावेळी या स्पर्धेनंतर चॅम्पियन्स ट्रॉफी कायमची बंद होणार होती (मात्र, नंतर हा निर्णय बदलला गेला). या शेवटच्या चॅम्पियन ट्रॉफी फायनलमध्ये फायनलमध्ये कॅप्टन कूकने टॉस जिंकला आणि टीम इंडियाला बॅटिंगसाठी आमंत्रित केले.
दोन-दोन वर्ल्डकप जिंकलेल्या एमएस धोनी (MS Dhoni) याच्या करिश्माई कॅप्टन्सीत टीम इंडिया स्पर्धेत उतरली होती. अगदी दोन प्रॅक्टिस मॅचपासून सेमी फायनलपर्यंत भारताने वर्चस्व गाजवलेले. अजिंक्य राहत फायनल खेळण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाचे ओपनर होते गब्बर शिखर धवन आणि या स्पर्धेतून सलामीवीर म्हणून ओळख मिळालेला रोहित शर्मा.
अगदी महिनाभर आधीच आयपीएल खेळून आलेल्या टीम इंडियाला टी20 सामना असल्याने फेवरेट समजले जात होते. मात्र, नुकतेच मुंबई इंडियन्सला चॅम्पियन बनवून आलेल्या रोहितच्या दांड्या ब्रॉडने चौथ्याच ओव्हरमध्ये वाकवल्या. शिखर आणि विराटने 8 ओव्हरमध्ये पन्नाशीची मजल मारून दिली. शिखर सेट झालाय असं वाटत असतानाच बोपराने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्याने 31 धावा करत आपली गोल्डन बॅट नक्की केली.
संघाच्या 64 धावा होईपर्यंत सगळं काही ठीक चालले आहे असं वाटत होतं. मात्र, ट्रेडवेलने 12 व्या ओव्हरमध्ये दिनेश कार्तिकला आणि रवी बोपाराने 13 व्या षटकात सुरेश रैना (01) आणि कर्णधार धोनी (00) यांना बाद करून भारतीय संघ आणि चाहत्यांच्या पाठीत उसण आणली. तिकडे इंग्लंडच्या बार्मी आर्मीने चॅम्पियन ट्रॉफी जिंकल्याच्या अविर्भावात स्टेडियममध्ये धिंगाणा करायला सुरुवात केली.
या अफरातफरीच्या माहोलमध्ये मैदानावर उभा होता भारतीय क्रिकेटचा पुढचा सुपरस्टार विराट कोहली. त्याला साथ द्यायला आला, तोपर्यंत टॅलेंटेड म्हणूनच कौतुक होणारा आणि सर पदवी न मिळालेला रवींद्र जडेजा. पावसामुळे या पिचवर जास्त धावा होणार नाहीत याची खात्री सर्वांना झालेली. विराट आणि जडेजाने त्यांचा आजवरचा अनुभव पणाला लावला आणि केली, भारतीय क्रिकेटमधील एक अंडररेटेड अशी 47 धावांची पार्टनरशिप. एकोणिसाव्या ओव्हरमध्ये बाद होण्यापूर्वी विराटने आपल्याला क्रिकेटचे फ्युचर का म्हणतात हे दाखवणारी 47 रन्सची इनिंग खेळली. वॉर्नने म्हटल्याप्रमाणे, जडेजाने रॉकस्टारसारखी 33 रन्सची नाबाद इनिंग खेळली. शेवटच्या ओव्हरमध्ये अँडरसनला कव्हर्सवरून लगावलेला षटकार निव्वळ अप्रतिम होता. याच योगदानाने टीम इंडिया पोहोचली 129 पर्यंत पोहोचली. त्या स्लो पिचवर ही एक चांगली धावसंख्या मानली गेली.
घरच्या मैदानावर खेळत असलेल्या इंग्लंडला ही धावसंख्या तशी आवाक्यात वाटत होती. दुसऱ्याच ओव्हरमध्ये उमेश यादवने कॅप्टन कूकला आऊट करत अपेक्षित सुरुवात केली. सहाव्या ओव्हरमध्ये धोनीची स्टंप मागे कलाबाजी दिसली आणि ट्रॉट चालता झाला. जो रूटची खेळी 7 धावांच्या पुढे गेली नाही. तर, संघर्ष करत असलेला बेल 13 धावा करत पव्हेलियनमध्ये पोहचला. त्यावेळी इंग्लंडची अवस्था होती 8.4 षटकात 4 बाद 46. भारत सामन्यात बराच पुढे.
यानंतर जोडी जमली ओएन मॉर्गन आणि गोलंदाजीत कहर केलेला रवी बोपारा. एजबॅस्टनच्या त्या गोलंदाजांना मदत करणाऱ्या पिचवर देखील या जोडीने भारतीय फलंदाजांना संधी दिली नाही. एकेरी दुहेरी धावांबरोबरच खराब चेंडूंवर मोठे फटके खेळून त्यांनी इंग्लंडला शंभरी पार करून दिली. भारतीय चाहत्यांनी अपेक्षा सोडली होती. इंग्लंड सामन्यात पुढे आलेली आणि त्यांना गरज होती शेवटच्या 18 चेंडूंमध्ये 28 धावांची.
या निर्णायक ओव्हरमध्ये धोनीने चेंडू हातात दिला सर्वात अनुभवी ईशांत शर्माच्या. यापूर्वी तीन ओव्हरमध्ये 27 धावा दिलेल्या ईशांतच्या पहिल्या चेंडूवर धाव निघाली नाही. मात्र, पुढच्या चेंडूवर मॉर्गनने स्क्वेअर लेगला सिक्स मारला. पुढचे दोन चेंडू वाईड गेले आणि भारतीय चाहत्यांनी कदाचित ईशांतच्या पूर्ण खानदानाचा उद्धार करायला सुरुवात केली. लक्ष एकदम इंग्लंडच्या आवाक्यात होते. 16 चेंडू 20 धावा. समोर उभे दोन सेट बॅटर.
यानंतर घडले ते केवळ अकल्पनीय होते. ईशांतच्या एका स्लोअर वनवर मॉर्गन फसला आणि शॉर्ट मिडविकेटला उभ्या असलेल्या अश्विनीच्या हातात त्याने झेल दिला. पुढच्या चेंडूवर ईशांतने बाउन्सर मारला आणि अगदी विचित्र पद्धतीत लेग अंपायरपाशी फिल्डिंगला गेलेल्या अश्विनच्याच हातात तो चेंडू विसावला. बोपारा नो बॉलची अपील करत राहिला आणि इकडे सामना भारताच्या बाजूने झुकला. पुढच्या दोन बॉलवर ईशांतने एकच धाव दिली.
पुढच्या ओव्हरमध्ये फॉर्ममध्ये असलेल्या जडेजाने खतरनाक जोस बटलर आणि टीम ब्रेस्नन यांना तंबूचा रस्ता दाखवला. यासाठी खर्च केल्या फक्त चार धावा. इथेच जडेजाचा गोल्डन बॉल देखील निश्चित झाला. शेवटच्या ओव्हरमध्ये इंग्लंडला हव्या होत्या 15 धावा आणि गोलंदाजीला होता आधीच्या तीन षटकात फक्त सहा धावा दिलेला रविचंद्रन अश्विन. त्याच्या दुसऱ्या चेंडूवर चौकार केला आणि सामना थोडाफार रंगणार असे वाटले. मात्र, त्यानंतरच्या पुढच्या तीन चेंडूवर एकही मोठा फटका आला नाही.
शेवटचा चेंडूवर इंग्लंडला गरज होती 6 धावांची आणि ट्रेडवेल स्ट्राइकला. अश्विनने चेंडू इतका फिरवला की त्याच्या बॅटलाही स्पर्श झाला नाही. धोनीही चेंडू पकडू शकला नाही. आणि कॉमेंट्री ऐकत असलेल्या सर्वांना हर्षा भोगले चा तो सुमधुर आवाज आला, “Tradewell misses Dhoni misses but it doesn’t matter”
आतापर्यंत कधीही आनंदाने उड्या न मारलेला धोनी यानंतर दिसला. भारताने 2002 च्या शेअर चॅम्पियन ट्रॉफीनंतर पहिल्यांदाच ही ट्रॉफी जिंकली. विश्वचषकापाठोपाठ भारत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकत वनडेचा बादशाह बनला. धोनीच्या कॅबिनेटमध्ये यासोबतच भर पडली तीनही आयसीसी ट्रॉफींची. अशी कामगिरी करणारा तो जगातला एकमेवाद्वितीय कर्णधार बनला. पांढरा कोट घालत भारतीय संघाने त्यानंतर चॅम्पियन ट्रॉफी उंचावून जो काही जल्लोष केला तो लक्षात राहणारा होता. कायमस्वरूपी!!
(Indian Cricket Team Won Last Champions Trophy 2013 On 23 June)
क्रिकेटची जय! ऐतिहासिक विजयानंतर तालिबानला न जुमानता रस्त्यावर उतरले अफगाणी चाहते, पाहा VIDEO