Breaking News

हे खरे फ्युचर स्टार्स! या पाच Uncapped खेळाडूंनी गाजवली IPL 2024, टाकला जबरदस्त Impact

IPL 2024|जवळपास दोन महिन्यांच्या जोरदार रस्सीखेचीनंतर आयपीएल 2024 मधील टॉप चार संघ निश्चित झाले आहेत. हे चार संघ आता प्ले ऑफ्समध्ये भिडतील. अनेक मातब्बर खेळाडूंचा समावेश असलेल्या या स्पर्धेत दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक युवा खेळाडूंनी आपल्या प्रदर्शनाने छाप पाडली. काही वर्षांपासून खेळत असलेले मात्र आतापर्यंत प्रभाव पाडण्यात अपयशी ठरलेल्या खेळाडूंनी देखील आपल्या प्रतिभेचे दर्शन घडवले. अशा 5 खेळाडूंबाबत आपण जाणून घेऊया.

1) रियान पराग- मागील सहा वर्षांपासून आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या रियान परागला यावर्षी अपेक्षित लय सापडली. चौथ्या क्रमांकावर सातत्याने फलंदाजीला त्याला संधी दिली गेली. मागील हंगामात प्रचंड टीका झाल्यानंतर त्याने या हंगामात त्या अपयशाची सव्याज परतफेड केली. त्याने 14 सामने खेळताना 531 धावा केल्या आहेत. यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश असून, सर्वाधिक धावा बनवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो चौथ्या स्थानी आहे. लवकरच त्याचा भारतीय संघात समावेश केला जाऊ शकतो.

2) अभिषेक शर्मा- 2018 मध्ये आयपीएल पदार्पण केलेल्या अभिषेक याला या हंगामात खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. सनरायझर्स हैदराबादसाठी ट्रेविस हेडसोबत सलामीला फलंदाजीला येताना त्याने आतापर्यंत 467 धावा कुटल्या आहेत. विशेष म्हणजे यावेळी त्याचा स्ट्राइक रेट तब्बल 209 इतका राहिला. तो प्रत्येक सामन्यात आपल्या संघासाठी वेगवान सुरुवात देण्यात यशस्वी ठरला आहे. भविष्यातील भारतीय संघाचा सलामीवीर म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे.

3) शशांक सिंग- अनेक वर्षांपासून देशांतर्गत क्रिकेट तसेच आयपीएल खेळत असलेल्या शशांक सिंग याला यावर्षी पंजाब किंग्सकडून खेळताना पुरेपूर संधी मिळाली. सातत्याने अपयशी ठरत असलेल्या पंजाब संघासाठी त्याने जबाबदारी खांद्यावर घेत आपली प्रतिभा दाखवून दिली. त्याने 354 धावा करताना पंजाबसाठी अनेक मॅच विनिंग खेळ्या केल्या. अनेक छोट्या खेळ्या करताना त्याने संघाच्या विजयात हातभार लावला. त्याने तब्बल 21 षटकार या स्पर्धेत लगावले.

4) हर्षित राणा- 2022 मध्ये कोलकाता संघाने करारबद्ध केलेल्या हर्षित राणा याने यंदाचा हंगाम गाजवला. मिचेल स्टार्कसारखा आंतरराष्ट्रीय दर्जाचा गोलंदाज संघात असताना देखील राणा याने आपल्या गोलंदाजीने सर्वांची मने जिंकली. वेगवान गोलंदाजी सोबतच वेळोवेळी स्लोअर चेंडूचा सुरेख वापर करत 16 बळी टिपले‌.

5) मयंक यादव- मागील तीन वर्षांपासून लखनऊ सुपरजायंट्स संघाचा भाग असलेल्या मयंक यादव याला यंदा संधी मिळाली. आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने सातत्याने 150 पेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी केली. दुखापतीमुळे हंगामातून बाहेर होण्याआधी त्याने केवळ चार सामने खेळताना सात बळी मिळवले. मात्र, त्याच्या वेगामुळे तो सर्वांच्या नजरेत भरला.

या व्यतिरिक्त पंजाबसाठी खेळणारा आशुतोष शर्मा, केकेआरचा रमनदीप सिंग, मुंबईचा नमन धीर, आरसीबीचा स्वप्निल सिंग व दिल्लीच्या अभिषेक पोरेल यांनी देखील आपली दखल घेण्यास भाग पाडले.

(IPL 2024 Uncapped Players Who Might Be Future Stars)

Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score । (kridacafe.com)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *