Breaking News

कोण पकडणार गाडी क्रमांक 1552? MIvCSK च्या राड्याचा इतिहास हा आहे

mivcsk
Photo Courtesy: X

MIvCSK Rivalry: आयपीएल 2025 (IPL 2025) मधील अति महत्त्वाचा आणि हाय-व्होल्टेज सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. प्रत्येकी पाच वेळा आयपीएल ट्रॉफी उंचावलेल्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स (MIvCSK) यांच्यातील हा सामना स्पर्धेची पुढील दिशा ठरवेल. आयपीएलचा ‘एल क्लासिको’ म्हटला जाणार हा सामना, इतका हाईप का केला जातो यामागे मोठी कहाणी आहे. तीच कहाणी आपण जाणून घेऊया.

Story Of MIvCSK Rivalry

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) व चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यातील रायवलरीची बीजे रोवली गेली ती पहिल्याच आयपीएलच्या लिलावात. चेन्नईला पाच ट्रॉफी जिंकून देणाऱ्या एमएस धोनीला त्या लिलावात विकत घेण्यासाठी मुंबईने जंग-जंग पछाडले होते. मात्र, आधीच सचिन तेंडुलकरच्या रूपाने आयकॉन खेळाडू घेतला असल्याने, त्यांचे बजेट काही बसले नाही आणि धोनी चेन्नईचा झाला. तरी, आयपीएलमधील पहिल्या दोन सीझनमध्ये दोन्ही संघांमध्ये सगळं काही आलबेल होतं.

मुंबई-चेन्नई संघ आणि त्यांच्या फॅन्समधील राडेला सुरुवात खऱ्या अर्थाने झाली ती म्हणजे 2010 च्या फायनलपासून. तीन पैकी दुसरी आयपीएल फायनल खेळायला उतरलेली सीएसके आणि पहिल्यांदाच फायनलला आलेली मुंबई. एकीकडे क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर तर दुसरीकडे भारतीय क्रिकेटमधील पुढचा सुपरस्टार होऊ घातलेला एमएस धोनी. मुंबई थाटात आपल्या पहिल्या ट्रॉफीकडे आगेकूच करत असताना, मास्टरमाइंड धोनीने पहिल्यांदाच आयपीएलमध्ये आलेला, मात्र आयपीएल फायनल गाजवत असलेल्या पोलार्डला शक्कल लढवत बाद केले आणि मुंबईचे पहिले विजेतेपदाचे स्वप्न भंगले. इथून खऱ्या अर्थाने मुंबई विरुद्ध चेन्नई राड्याला सुरुवात झाली.

Story Of MIvCSK Rivalry

या पराभवाचा वचपा काढण्यासाठी मुंबईने तीन वर्ष वाट पाहिली. द ग्रेट रिकी पॉंटिंगकडून कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतलेल्या मुंबईकर रोहित शर्माने, 2013 आयपीएल फायनलमध्ये चेन्नईला पराभूत करून या दुश्मनीला वेगळे वलय प्राप्त करून दिले. स्वतः रोहित म्हणतो, मुंबई-चेन्नई आयपीएल मॅच म्हणजे एल क्लासिको. जबरदस्त फॅन फॉलोईंग असलेले हे दोन्ही संघ, त्यानंतर जेव्हा कधी मैदानात उतरू लागले तेव्हा रोमांचाच्या सगळ्याच बाउंड्री पार केल्या गेल्या. 2015 फायनलला पुन्हा मुंबईने चेन्नईवर कुरघोडी केली.‌ इतके दिवस फक्त फॅन्समध्ये असलेले हे द्वंद्व आता मैदानावरही दिसू लागलेले. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ उघड उघड बोलू लागलेले की फक्त ‘यांच्याविरुद्ध तर जिंकायचच’

2017 च्या आयपीएल फायनलला चेन्नई नव्हती. त्यावेळी संपूर्ण जगाला पाहायला मिळाली ‘द ग्रेट महाराष्ट्रीयन डर्बी’. मुंबई विरुद्ध पुणे अशा झालेल्या त्या फायनल मध्ये चेन्नईचा धोनी पुण्याच्या संघात होता. शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या या थरारक फायनलमध्ये पुण्याला हरवून मुंबई तिसऱ्यांदा चॅम्पियन बनली. सोबतच आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघही ठरला. या कट्टर खुनशीने खरी उंची गाठली ती 2018-2019 मध्ये… दोन वर्षाच्या निलंबनानंतर परतलेल्या चेन्नईने उद्घाटनाच्या सामन्यात ब्रावो आणि केदारच्या दणक्याच्या जोरावर मुंबईला त्यांच्याच घरच्या मैदानावर पाणी पाजले. भरीस भर म्हणून त्यावर्षीची आयपीएल ट्रॉफीही चेन्नईलाच गेली.

चेन्नईला हरवायची संधीच शोधत असलेल्या मुंबईने पुढच्या वर्षी चेन्नईला त्यांच्या घरच्या मैदानावर जाऊन लोळवले. सोबतच त्यावर्षीच्या फायनलमध्ये शेवटच्या बॉलवर चेन्नईलाच हरवून अवघ्या एका धावेने विजय मिळवत, आणखी एक ट्रॉफी जिंकली. हिटमॅन शर्मा कर्णधार म्हणून भलत्याच रंगात आलेला आणि त्याने पुढच्या वर्षीदेखील मुंबईला चॅम्पियन बनवले.

या सगळ्या कुस्ती तर 2020 ला ट्विस्ट आला. आयपीएल 2020 आधी धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर झाला आणि त्याच वर्षी चेन्नईचे पानिपतही झाले. धोनीला म्हातारा म्हणून चिडवायला एमआयच्या फॅन्सने सुरुवात केली. पुढच्या वर्षी कमबॅक काय असतो हे चेन्नई आणि धोनीने दाखवून दिलं आणि आयपीएलचे ट्रॉफी उचलली. दोन वर्षानंतर 2023 मध्ये देखील अशीच स्क्रिप्ट लिहिली गेली आणि चेन्नईने मुंबईच्या पाच ट्रॉफीच बरोबरी केली. त्या फायनलनंतर धोनी रिटायर होईल असे वाटत असतानाच त्याने आणखी खेळणार असल्याचे जाहीर करून टाकत, या रायवलरीची आग तशीच धगधगणार याची शाश्वती दिली.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

आयपीएल 2024 दोन्ही संघांसाठी हवी तशी गेली नाही. मात्र, वानखेडेवरच धोनीने हार्दिकच्या शेवटच्या ओव्हरमध्ये सलग तीन षटकार मारून आयपीएल 2024 ची ‘मोमेंट ऑफ द सिझन’ दिली. आयपीएल 2025 च्या पहिल्या राउंडमध्ये चेन्नई मुंबईवर भारी पडलीय. आता राऊंड 2 मध्ये काय होते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

प्रत्येकी पाच ट्रॉफी जिंकलेले दोन्ही संघ सध्या बॉटममध्ये आहेत. चेन्नईची हालत इतकी खराब आहे की, त्यांना राहिलेल्या 7 पैकी कमीत कमी 6 सामने जिंकायचे आहेत. दुसऱ्या बाजूला मुंबईची देखील हालत जवळपास अशीच आहे. त्यांना देखील सात पैकी पाच सामने जिंकावे लागतील. आता रविवारी मुंबई घरच्या ग्राउंडवर हरली तर, त्यांच्यापुढे सर्वच सामने जिंकण्याचे मोठे आव्हान असेल. चेन्नईला वानखेडेचा किल्ला भेदता आला नाही तर, त्यांची गाडी क्रमांक 1552 जवळपास रिझर्व्ह होऊन जाईल.

मुंबई आणि चेन्नई फॅन्समधील ‘स्टेटस वॉर’ चरमसीमेवर असताना आता बाकी क्रिकेट प्रेमींनी फक्त आयपीएलचा आनंद घेतील इतके मात्र नक्की!

(Story Of MIvCSK Rivalry)

हे देखील वाचा- कोण आहे मुंबईचा नवा भिडू Vignesh Puthur? फक्त 2 मॅच आणि आयपीएल कॉन्ट्रॅक्ट, वाचा पूर्ण स्टोरी

अवघ्या 15 बॉलमध्ये रातोरात स्टार बनला Vipraj Nigam! रिंकू सिंगचा खास जोडीदार आणि बरच काही