Breaking News

Rufus The Hawk: 17 वर्षांपासून विम्बल्डनवर करडी नजर ठेवणाऱ्या रूफसची कहाणी

rufus the hawk
Photo Courtesy: X/rufus the hawk

Rufus The Hawk: वर्षातील तिसरी ग्रँडस्लॅम म्हणजे विम्बल्डन (Wimbledon 2025) 30 जूनपासून सुरू झाली. अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात आणि ग्रास कोर्टवर होणारी ही सध्याची तरी एकमेव टेनिस स्पर्धा. अनेक अर्थाने ऐतिहासिक आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींसाठी ओळखल्या जाणाऱ्या विम्बल्डनचे असे आणखी एक वैशिष्ट्य आहे, जे कदाचित अनेकांना माहीत नसेल. ते वैशिष्ट्य कोणता नियम नाही, कोणता खेळाडू नाही अथवा सेंटर कोर्टही नाही. तर, तो आहे एक पक्षी, ससाणा. त्याच नाव रूफस (Rufus The Hawk)! याच रूफसची माहिती देणारा हा लेख.

Rufus The Hawk Official Bird Scarer Of Wimbledon

फ्रेंच ओपन संपल्यानंतर टेनिसप्रेमी लगेचच विम्बल्डनच्या तयारीला लागतात. वर्षभरात खेळल्या जाणाऱ्या चारही ग्रँडस्लॅमपैकी विम्बल्डनचा औरा काही वेगळाच असतो. सहभागी खेळाडूंना ड्रेस कोडचा नियम असलेली ही एकमेव स्पर्धा. अगदी ‘सफेदी की चमक’ दाखवत पूर्ण पांढऱ्या कपड्यांपासून ते पांढऱ्या शूजमध्येच सर्व खेळाडूंना कोर्टवर यावे लागते. रेफ्री असोत नाहीतर प्रेक्षकही नियमांच्या बाहेर जाऊन इथे काहीच करू शकत नाहीत. हे सगळे बंधनात असताना रूफस मात्र अगदी स्वच्छंदपणे स्पर्धेच्या आवारात घरट्या घालत असतो.

हॅरिस प्रजातीचा हा ससाणा 2003 मध्ये खास अमेरिकेतून इथे आणण्यात आला. लंडनच्या आल्हाददायी वातावरणात अनेक पक्षी विहार करत असतात. त्या पक्षांचा खास करून कबुतरांचा विम्बल्डनच्या वेळी मैदानावर अनेकदा अडथळा येत. आणि याच पक्षांना हाकलण्याचे काम सोपवण्यात आले रूफसवर. या प्रजातीचे ससाणे बर्ड्स स्केरर (Bird Scarer) म्हणून खास ट्रेनिंग दिलेले असतात. त्यामुळे रूफस हा विम्बल्डनचा अधिकृत बर्ड स्केरर म्हणून ओळखला जातो. (Latest Tennis News)

विम्बल्डन 2000 पर्यंत कबुतरांमुळे अनेकदा सामन्यात अडसर निर्माण व्हायचा. त्यामुळे विम्बल्डनचे आयोजन करणाऱ्या ऑल इंग्लंड लॉन टेनिस आणि क्रॉकेट क्लब यांनी हा ट्रेन्ड ससाणा खास त्या कबुतरांना हाकलण्यासाठी नियुक्त केला. सुरुवातीला 2000 मध्ये हामिश नावाच्या ससाण्याने ही परंपरा सुरू केली. तो 2008 पर्यंत या पदावर होता. हामिश त्यानंतरही क्लबमध्येच राहिला. मात्र, त्यानंतर ही रखवालीची जबाबदारी रूफसकडे आली.

रूफस ऑल इंग्लंड क्लबच्या मालकीच्या 42 एकर जमिनीवर नजर ठेवण्याचे काम करत असतो. या संपूर्ण परिसरातील वेस्टमिन्स्टर अबे, हॉस्पिटल्स, एअर फिल्ड आणि क्लबच्या मालकीच्या जमिनीवर पक्षी येऊ न देण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर असते. रुफस पहाटे पाच ते रात्री दहापर्यंत तो आपले काम इमान इतबारे करत राहतो. रूफसने विम्बल्डन सोबतच 2012 च्या लंडन ऑलिम्पिक (London Olympics 2012) वेळी देखील पक्षांना हाकलण्याचे काम केलेले. इंग्लंडमध्ये झालेल्या 2019 वनडे क्रिकेट वर्ल्डकपवेळी (2019 ODI World Cup) ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर काही सामन्यांसाठी पहारेदारी केलेली.

सिक्युरिटीचे काम करणारा हा रूफस चोरीला देखील गेला होता. विम्बल्डन सुरू असतानाच 28 जून 2012 रोजी रूफस त्याच्या मालकाच्या गाडीतून चोरीला गेलेला. रात्रीच्यावेळी तो मालकाच्या गाडीतून बाहेर पडल्याने रस्ता चुकला. कावळ्यांच्या थव्याने त्याच्यावर हल्ला केल्याने त्याचे जीपीएस ट्रान्समीटर त्याच जागी पडले आणि तो उडून गेला. ऐन विम्बल्डन सुरू असतानाच जवळपास तीन दिवस रूफस गायब झाल्याने सोशल मीडियावर एकच हल्लकल्लोळ माजला. मोठी चर्चा झाली. टेनिसप्रेमींनी अक्षरशः कॅम्पेन सुरू केली. तीन दिवसानंतर तो सापडला. त्याच्या पायाला किरकोळ दुखापत झालेली. या संपूर्ण प्रकरणाची इतकी चर्चा झाली की, त्यावेळी सर्वाधिक सर्च केलेला पक्षी म्हणून त्याची नोंद झाली. तसेच, ब्रिटनमधील सर्वात प्रसिद्ध पक्षाचा तमगा देखील त्याला मिळाला. स्टेला आर्टोइस यांची प्रसिद्ध जाहिरात मालिका असलेल्या ‘Here’s To Perfection’ मध्ये देखील रुफस दिसला आहे. जगातील अनेक निर्मिती संस्थांनी रूफसवर माहितीपट तयार केलेले दिसून येतील.

जगभरातील नामांकित टेनिसपटू ज्या विम्बल्डन कोर्टवर खेळण्यासाठी आतुर असतात, त्या विम्बल्डनचे सिक्युरिटी फोटोकार्डही रूफसकडे आहे. त्यावर ‘बर्ड स्केरर’ हा जॉब टायटल लिहिलेला दिसून येतो. इतकेच नव्हे तर रूफसची सोशल मीडिया हँडल्सदेखील आहेत (Rufus On X And Facebook). रुफसचे खेळायला येणाऱ्या खेळाडू आणि प्रेक्षकांशी देखील जवळचे नाते दिसून येते. सहभागी खेळाडू दरवर्षी त्याची भेट आणि त्याच्यासोबत फोटो घेतल्याशिवाय जात नाहीत. रूफसची क्रेझ विम्बल्डनवेळी इतकी असते की, प्रेक्षक खास त्याच्या चेहऱ्यासारखे टोपी आणि त्याच्यासारखेच पंख असलेले ड्रेसिंग करून आलेले दिसतात. सोशल मीडियावर त्याच्यासोबत अनेक प्रेक्षकांच्या सेल्फी देखील आहेत. त्याही एकदम थाटात!

हा लेख खास रूफससाठी असला तरी, जाता जाता यंदाच्या विम्बल्डनची थोडक्यात चर्चा व्हायलाच हवी. नुकताच फ्रेंच ओपन जिंकून आलेला कार्लोस अल्कारेझ सलग तिसऱ्या वर्षी विम्बल्डन अजून कोण हॅट्रिक करणार का? जोकोविच कमबॅक करणार का? की सिन्नर, झ्वेरेव्ह किंवा ड्रेपरपैकी कोणी नव्याने विम्बल्डनचा सम्राट होणार? ही चर्चा देखील टेनिसजगतात सुरू आहे. तुम्ही देखील विम्बल्डन 2025 वर नजर ठेवा‌. अगदी रूफससारखी!

(Rufus The Hawk Official Bird Scarer Of Wimbledon)

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

 हे देखील वाचा: Wimbledon 2025 च्या विजेत्यावर पैशाचा पाऊस, मिळणार आयपीएल विजेत्यांपेक्षाही तगडी रक्कम