कोण हा Raghu Sharma? वय 33, कृष्णभक्त, शेन वॉर्न आणि बरंच काही

raghu sharma
Photo Courtesy: X

Story Of Raghu Sharma: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (CSKvMI) या आयपीएलमधील सर्वात हाय व्होल्टेज सामन्यात मुंबईसाठी एका नव्या खेळाडूने पदार्पण केले. हा खेळाडू नवोदित नसला तरी, त्याला या पदार्पणासाठी वयाच्या 33 व्या वर्षापर्यंत वाट पाहावी लागली. त्याचे नाव रघु शर्मा.

Story Of MI Spinner Raghu Sharma

पंजाबच्या जालंधरमध्ये जन्मलेल्या रघुच्या घरी किंवा नातेवाईकांत कोणीही क्रिकेट खेळले नाही. त्याच्या घरात सारे डॉक्टर आणि इंजिनिअर. स्वतः रघुलादेखील क्रिकेटमध्ये फारसा रस नव्हता. त्याने 2011 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगला ऍडमिशन देखील घेतले होते. नेमके त्याच वेळी भारतीय क्रिकेट संघाने 28 वर्षानंतर वनडे विश्वचषक जिंकला. इथेच ठिणगी पडली आणि रघु याने क्रिकेटपटू होण्याचा निर्णय घेतला. मात्र, इथे एक गोष्ट त्याच्या विरोधात जात होती ती म्हणजे त्याचं वजन. स्वतः रघु सांगतो त्यावेळी माझं वजन 120 किलोच्या आसपास होते. परंतु, क्रिकेटपटू होण्याचे ठरवलेल्या रघुने कष्ट देखील करण्याचा निश्चय घेतला.

रघुच्या अशा शरीरयष्टीमूळे प्रशिक्षक देखील त्याच्याकडे दुर्लक्ष करत. त्यानंतर त्याने वजन कमी करण्याचे शिवधनुष्य उचलले. रघु 40 डिग्रीपेक्षा जास्तच्या उन्हात भर दुपारी धावायचा. न थकता दोन तास सराव करायचा. या कष्टाचे फळ त्याला मिळाले आणि पुढील सहा महिन्यात त्यांनी जवळपास 35 किलो वजन कमी केले. मध्यमगती गोलंदाजी करणाऱ्या रघुला त्यानंतर जिल्हास्तरावर संधी मिळाली.

एके दिवशी रघु गोलंदाजी करत असताना हॅमस्ट्रिंगने डोके वर काढले. त्यामुळे त्याने दोन पावले चालत येत, लेगकटर टाकले. तिथे उपस्थित असलेले जालंधर क्रिकेट संघटनेचे प्रशिक्षक व माजी भारतीय क्रिकेटपटू मदनलाल यांनी त्याच्यातील फिरकी गोलंदाजाचे गुण ओळखले. त्यांनी त्याला तिथेच फिरकी गोलंदाज होण्याचा सल्ला दिला. हा सल्ला मानत त्याने लेग स्पिनर म्हणून नवी सुरुवात केली.

रघुने लेगस्पिनर बनल्यानंतर एकलव्याप्रमाणे आपला गुरु निवडला आणि तो गुरु होता ऑस्ट्रेलियाचा सर्वकालीन महान फिरकीपटू शेन वॉर्न. युट्युबवर वॉर्नचे कित्येक व्हिडिओ पाहून तो गोलंदाजी शिकला. स्लाइडर, गुगली हे चेंडू वॉर्नचे व्हिडिओ पाहूनच शिकल्याचे तो कबूल करतो. पुढच्या काळात भारताचे माजी फिरकीपटू एम व्यंकटरमण व राहुल शर्मा त्याला मेंटर म्हणून मिळाले. जे आज देखील त्याच्यासोबत आहेत.

हे देखील वाचा: नाशिककर Ramakrishna Ghosh ची IPL 2026 रणांगणात एन्ट्री! अफाट मेहनत आणि CSK चा विश्वास…

सुरुवातीच्या काळात रघुला त्याच्या घरच्यांचा तितका पाठिंबा नव्हता. तसेच त्याचे वय देखील पुढे गेल्याने वयोगट क्रिकेट खेळण्याची संधी नव्हती. स्थानिक स्तरावर चांगली कामगिरी झाल्यानंतर घरचे थोडेसे सकारात्मक झाले. वडिलांनी त्याला समजावले की, “क्रिकेट खेळू शकतोस मात्र शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नको” वडिलांचा हा सल्ला त्याने ऐकला आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर देखील बनला.

रघुच्या आयुष्यात 2014 मध्ये मोठा बदल झाला. तो आपल्या कुटुंबासह उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी गेला होता. तेथील भक्तिमय वातावरण पाहून तो भारावला आणि थेट वैष्णव पंथातच सामील झाला. वैष्णव पंथात कांदा व लसूण खाण्यास मनाई असते. खेळाडू असल्याने या गोष्टीवर लक्ष ठेवणे अवघड बनते. रघुने आपल्या प्रशिक्षकांना व संघाला याबाबत कल्पना दिली होती. कित्येकदा प्रशिक्षकांशी त्याचा वाद होईल. प्रशिक्षक त्याला रागवत. मात्र, शक्य असेल तेव्हा शेफला सांगून आणि शक्य नसेल तर स्वतः हाताने बनवून तो बिना कांदा व लसणाचे जेवण बनवत. कठीण काळातही तो आपल्या तत्वांशी अगदी प्रामाणिक राहिला.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

दरम्यानच्या काळात तो पंजाबच्या रणजी संघात येण्यासाठी प्रयत्न करत होता. मात्र, त्याला सातत्याने अपयश येत होते. जालंधरच्याच असणाऱ्या दिग्गज हरभजन सिंग याने त्याला 2016 मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघात नेट बॉलर म्हणून बोलावले. मात्र, तो त्यावेळी ट्रायल्समध्ये अपयशी ठरला आणि त्याची आयपीएल खेळण्याची संधी हुकली. पुढे जाऊन 2017-18 च्या हंगामात अखेर युवराज सिंगच्या नेतृत्वात त्याला पंजाबसाठी रणजी डेब्यू करण्याचा मोका मिळाला. दुसऱ्या सामन्यात त्याने गोव्याविरुद्ध सात बळी देखील घेतले. मात्र, त्यानंतर त्याला संघातून अचानक वगळण्यात आले.

संधीचा शोधात तो पद्दुचेरीला पोहोचला. रघुने 2020-2021 मध्ये पद्दुचेरीसाठी लिस्ट ए आणि टी20 पदार्पण केले खरे मात्र पुरेशी संधी मिळालीच नाही. तो या दिवसांना आपल्या संघर्षाचा काळ समजतो. याच काळात तो इरफान पठाण यांच्या अकादमीत देखील आपल्या कौशल्यांवर काम करत होता.

मेहनत करणाऱ्यांसाठी संधी कुठे ना कुठे उपलब्ध असते. हीच गोष्ट रघुसोबत घडली. तो 2023 मध्ये थेट श्रीलंकेत पोहोचला आणि प्रतिष्ठित गॉल संघासाठी विदेशी खेळाडू म्हणून खेळू लागला. त्याने सहा सामन्यात तब्बल 46 बळी मिळवले. मात्र, दुर्दैव पुन्हा एकदा आड आलं. श्रीलंका क्रिकेटने त्यानंतर नियम बदलले आणि विदेशी खेळाडूने आपल्या देशात कमीत कमी पाच प्रथम श्रेणी सामने खेळलेले असावे, अशी अट घातली. त्यावेळी रघुचे सामने होते चार. त्याला निराश होऊन माघारी यावं लागलं.

श्रीलंका सोडल्यावर तो इंग्लंडला रवाना झाला आणि तिथे स्थानिक क्रिकेट खेळू लागला. लॉंगटन फर्स्ट संघासाठी त्याने 21 लिस्ट ए सामन्यांमध्ये 43 बळी टिपले. याच दरम्यान एके दिवशी तो ज्या शहरात राहायचा तिथे दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फिरकीपटू इम्रान ताहीर हा देखील थर्ड डिव्हिजनचा सामना खेळण्यासाठी आला होता. रघुला ही माहिती मिळाल्यानंतर रघु त्याची भेट घेण्यासाठी गेला. इम्रान ताहीरने त्यावेळी त्याला खेळपट्टीवर नेत तब्बल 40 मिनिटे मार्गदर्शन केले. तेदेखील पंजाबीमध्ये. रघुने आपल्या गोलंदाजी शैली थोडासा बदल केला आणि त्याचा फायदा त्याला मिळू लागला.

भारतात परतल्यानंतर पद्दुचेरीसाठी तो पुन्हा खेळत होता. यावेळी खेळाडू सोबतच तो संघाचा स्पोर्ट न्यूट्रिशनिस्ट देखील बनलेला. मात्र, मोठ्या संधीसाठी त्याला पुन्हा एकदा पंजाबला परतायचे होते. शेर ए पंजाब ट्रॉफी खेळण्यासाठी त्याला एनओसी मिळेपर्यंत उशीर झाला. पुढे रणजी हंगामासाठी निवड होण्यासाठीच्या फिटनेस टेस्टमध्ये देखील फेल झाल्याने, त्याची पुन्हा एकदा पंजाबसाठी खेळण्याची संधी गेली.

या अत्यंत कठीण काळात त्याने ओडिसाच्या जगन्नाथ पुरीचा रस्ता धरला. जगन्नाथाची सेवा करता करताना त्याने आपल्या फिटनेसवर देखील काम सुरू ठेवले. विजय हजारे ट्रॉफी 2024-2025 च्या अगदी आधीच पंजाबचे तत्कालीन मुख्य प्रशिक्षक वसीम जाफर यांनी त्याला पुन्हा एकदा ट्रायलसाठी बोलावले. त्याच दिवशी विमान पकडून रघु मोहालीला आला. दुसऱ्या दिवशी फिटनेस टेस्ट दिली आणि त्यात पास देखील झाला. त्याच स्पर्धेत तो संघासाठी 14 बळी मिळवत दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज बनला.

सध्या पंजाब सोडून तो उत्तराखंडसाठी खेळतोय. मागील वर्षी तो पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचा नेट बॉलर म्हणून आला होता. संघटन सराव सत्रांमध्ये आणि इंट्रा स्कॉड सामन्यांमध्ये त्याने संघ व्यवस्थापनाला प्रभावित केलेले. मागील वर्षी विघ्नेश पुथूर दुखापतग्रस्त होताच मुंबईने रघुला करारबद्ध करण्यात उशीर केला नाही. त्यावेळी बाकावर बसला तरी यंदा मात्र तो मैदानात उतरला. पहिल्या सामन्यात अगदी पारंपारिक लेग स्पिन गोलंदाजी करत सर्वांची मने जिंकली.

उशिरा केलेली सुरुवात, एकलव्याप्रमाणे केलेला अभ्यास, मेहनत घ्यायची तयारी आणि जोडीला अध्यात्म ही सगळी रघुच्या प्रवासाची वैशिष्ट्ये आहेत. कृष्णभक्त असलेला रघु डोक्यावर शेंडी आणि गळ्यात कंठी घालून उतरतो तेव्हा, स्वतः भगवान श्रीकृष्ण जसे अर्जुनाच्या पाठी उभे राहिले तसे या भक्ताच्या पाठी उभे आहेत असाच भास होतो.

Story Of Mumbai Indians Leggy Raghu Sharma