Breaking News

Story Of Temba Bavuma: 27 वर्षांनी दक्षिण आफ्रिकेला चोकर्स ते चॅम्पियन बनवणारा टेंबा बवुमा

Temba Bavuma
Photo Courtesy: X/ICC

– महेश वाघमारे

Story Of Temba Bavuma: 27 वर्ष, होय तब्बल 27 वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेचा आयसीसी ट्रॉफीचा वनवास संपला. तिसरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दक्षिण आफ्रिकेने जिंकली. क्रिकेट समजणाऱ्या, क्रिकेट आवडणाऱ्या दोन पिढ्या मनापासून आनंदल्या. तुमचा देश कोणता आहे, या फायनलमध्ये तुम्ही कोणाला सपोर्ट करत होता किंवा ड्रीम 11 वर कोणावर पैसे लावलेले, या सगळ्या गोष्टी मागे पडल्या आणि दक्षिण आफ्रिकेच्या विजयोत्सवात सारेच सामील झाले. या ऐतिहासिक विजयानंतर सारे जण एका क्रिकेटपटूचे खास कौतुक करतायेत, आणि ते केलेच पाहिजे, तो क्रिकेटपटू म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा कॅप्टन टेंबा बवुमा.

temba bavuma
Photo Courtesy: X

Story Of Temba Bavuma

टेंबा बवुमा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू, कॅप्टन अशी त्याची सर्वसाधारण ओळख. मात्र, सोशल मीडिया जनरेशनसाठी तो क्रिकेटमधील सर्वात मोठा मीम मटेरियल. सतत शून्यावर बाद झाल्यानंतर पडलेले लॉर्ड नाव, उंचीवरून कोणी म्हटलेला टिंगू बवुमा, एका कार्टून कॅरेक्टर त्याच्याशी मिळतेजुळते आहे म्हणून जॉन, तर टिपिकल मराठीत सहजतेने, पण वर्णद्वेषात येणाऱ्या फॅन्ड्री आणि का’ळ्या अशी कितीतरी नावे त्याला सोशल मीडिया जनरेशनने दिलीत. पण आपल्या करिअरच्या अगदी सुरुवातीच्या काळातच, “होय मी काळा आहे. माझ्या त्वचेचा रंग तोच आहे” असे त्याने अगदी अभिमानाने सांगून आजच्या या हिणकस विशेषणांना कधीच कोललं होतं.

बवुमा लोकांच्या नजरेत आला तो खऱ्या अर्थाने 2020 च्या आसपास. मात्र, त्याची स्टोरी सुरू होते त्याच्या जन्मापासून. दक्षिण आफ्रिकेतल्या लांगा या कृष्णवर्णीय लोकसंख्या जास्त प्रमाणात असलेल्या भागात त्याचा जन्म झाला. या भागातील बरेचसे लोक अजूनही समाजाच्या मुख्य प्रवाहात आलेले नाही. थोडक्यात आपल्याकडे ज्याप्रकारे आदिवासी लोक दिसून येतात, तशाच प्रकारची काहीतरी परिस्थिती. सुरुवातीच्या काळात टेंबा ज्या शाळेत होता, त्या शाळेत त्याच्या समाजातील फक्त तीन मुले होती. शाळेत असणाऱ्या इतर गोऱ्या मुलांपेक्षा आपण वेगळे आहोत, आपली संस्कृती वेगळी आहे, आपल्या सवयी वेगळ्या आहेत याची त्याला नेहमी जाणीव व्हायची.

परिस्थिती आणि वातावरण अनुकूल नसले तरी क्रिकेटची आवड आणि पॅशन मात्र त्याच्यात होती. लाकडाच्या तुटक्या बॅटने आणि दोन फुटलेले बॉल चिकटपट्टीने चिकटवून टेंबा लहानपणी खेळायचा. वडिल पत्रकार. टेंबाची ही आवड व्यावसायिकतेत बदलणं त्यांच्यासाठी जवळपास अशक्य होतं. त्याच्या दोन अंकलने त्याच्यातील गुण हेरले आणि त्याला क्रिकेटसाठी सहकार्य करायचं ठरवलं. त्याला आधी जोहान्सबर्ग आणि नंतर केपटाऊनला आणलं गेलं.

गोष्ट पुढे सरकते ते 2001 सालात. केपटाऊनच्या साऊथ आफ्रिकन कॉलेज स्कूल्समध्ये एक निबंध स्पर्धा असते. स्पर्धेचा विषय अगदी सोपा ‘पुढील 15 वर्षात तुम्ही स्वतःला कुठे पाहत आहात?’ त्यावेळी 11 वर्षांच्या असलेल्या टेंबाचे उत्तर होते, ‘पुढच्या पंधरा वर्षात मी स्वतःला प्रेसिडेंट मकेबी (दक्षिण आफ्रिकेचे तत्कालीन राष्ट्रपती) यांच्या हातात हात देताना पाहतोय. ते मला दक्षिण आफ्रिकेची एक मजबूत क्रिकेट टीम तयार केल्याबद्दल शुभेच्छा देत आहेत. मी असे करू शकलो तर, माझी आई वडील, माझे दोन अंकल आणि प्रशिक्षकांचा आभारी राहिलं. या सर्वांनी मला त्या लायक बनवले.’ त्यावेळी अनेक अनेक वृत्तपत्रांनी त्याच्या या निबंधाला डोक्यावर घेतले होते. अर्थातच, काहींनी खिल्ली देखील उडवलेली.

कट टू साल 2016 म्हणजेच बरोबर 15 वर्षांनी टेंबा दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रपतींसोबत होता आणि कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पहिला ‘ब्लॅक सेंच्युरीयन’ म्हणून राष्ट्रपती त्याचे कौतुक करत होते. आहे ना अगदी शाहरूखच्या “इतनी शिद्दत से मैंने तुम्ही पाने की कोशिश…” डायलॉगचं रियल वर्जन. बवुमाच्या आधी दक्षिण आफ्रिकेसाठी मोजून चार कृष्णवर्णीय खेळाडू दक्षिण आफ्रिकेसाठी खेळलेले. चारही बॉलर. त्यातही त्या सर्वांना किती त्रास सहन करावा लागायचा, याच्या कथा मखाया एन्टिनीने सांगितल्याच आहेत. अशात भक्कम पाय रोवून उभे राहायला बवुमालाच जमलं.

बवुमा पहिल्यांदा सर्वाधिक चर्चेत आला 2020 च्या टी20 वर्ल्डकप दरम्यान. खरं तर तो संघाचा कॅप्टन होता. संघाने लीग स्टेजमध्येच मार खाल्लेला. स्वतः टेंबाची कामगिरी झिरो होती. क्विंटन डी कॉक याने ‘Black Live Matters’ साठी झुकण्यास नकार दिला आणि त्याच्या मागे पार्श्वभूमी नक्कीच टेंबाची होती हे जगाला कळायला वेळ लागला नाही. तरीही, कोणाचीच फिकीर न करता टेंबा उभा राहिला. काही महिन्यातच भारताला टेस्ट सिरीजमध्ये हरवलं. संघाचा कॅप्टन होता टेंबा. दोन वर्षांनी परत एका टी20 वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिका हरली.‌ पुन्हा कॅप्टन होता टेंबा. 2023 वनडे वर्ल्डकप आणि 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी. कॅप्टन टेंबाच. साऱ्या अपयशाचा धनी टेंबाच. मात्र, ही सारी टिका आणि अपयश टेंबाने आपल्या इवलुशा पण मजबूत खांद्यावर वाहिलं.

बरं टेंबाची स्टोरी फक्त क्रिकेटच्या ग्राउंड पर्यंतच मर्यादित नाही. त्यापलिकडचा टेंबा उंची आणि कर्तृत्वाने अनेक धनाढ्य आणि GOAT खेळाडूंपेक्षा उंच आहे. टेंबा दक्षिण आफ्रिकेत ‘टेंबा बवुमा फाऊंडेशन’ नावाची संस्था चालवतो. संस्था काय काम करते तर, होतकरू विद्यार्थ्यांना शोधून त्यांच्या शिक्षणाचा खर्च करते, गुणवान क्रिकेटपटूंना क्रिकेट ट्रेनिंग देते, कॅन्सर पेशंटला वैद्यकीय सुविधा पुरवते आणि कृष्णवर्णीयांच्या आत्मसन्मानासाठी लढाई लढते. त्याच्या फाउंडेशनच्या वेबसाईटवर गांधीजींचे कितीतरी विचार लिहिलेले पाहायला मिळतील. लांगाच्या लोकांसाठी तो देव आणि आयडॉल आहे.

डब्लूटीसी 2023-2025 च्या सायकलमध्ये दक्षिण आफ्रिकेने 12 मॅचेस खेळल्या. त्यातल्या 5 मॅचेस दुखापतीमुळे टेंबा खेळू शकला नाही. उर्वरित सात मॅचेसमध्ये तो कॅप्टन होता आणि संघाचे विजय होते सहा आणि पराभव शून्य. कॅप्टन्सी आणि बॅटिंगचा जबरदस्त फॉर्म घेऊन लॉर्डसचा ‘लॉर्ड’ बनायला तो क्रिकेटच्या पंढरीत उतरलेला. इथेही अजिंक्य रहायचं आणि आजवर करत असलेला संघर्ष या पाच दिवसातही करायचा, अशी खूणगाठ त्याने मनाशी बांधली असणार. क्रिकेट जरी सांघिक खेळ असला तरी, मी स्वतः पुढे होऊन ऑस्ट्रेलियाला भिडणार, हा लढाऊ बाणा त्याने पूर्ण मॅचमध्ये दाखवला. हॅमस्ट्रिंगने एकवेळ रिटायर्ड आऊट व्हायची वेळ आली होती. तरी देशासाठी तो खेळत राहिला. माईटी ऑस्ट्रेलियन्सना निष्प्रभ केलं. गुडघे टेकायला भाग पाडल.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

लंडनमध्ये अजिंक्य म्हणून आलेल्या टेंबाने, आजही अपराजित राहत दक्षिण आफ्रिकेच्या आयसीसी ट्रॉफीच स्वप्न पूर्ण केलं. ती मानाची गदा उचलताना, तिच्या भोवती मूठ आवळताना त्याच्या डोळ्यात जो आनंद होता त्याची बरोबरी कोणीही करू शकत नाही. संपूर्ण करिअरमध्ये ‘राखीव कोटा’ म्हणून हिणवल्या गेलेल्या नावाचं ओझ त्याने एकदाच उतरवून टाकलं आहे. दक्षिण आफ्रिकन क्रिकेटवर लागलेला चोकर्स नावाचा शिक्का पुसून टाकला आहे आणि त्याच्या आजीने ठेवलेल्या स्थानिक भाषेतील टेंबा म्हणजे ‘आशा/विश्वास’ हे नाव सार्थ केलं आहे!

सॅल्युट टेंबा, मानल गड्या तुला…

Story Of Temba Bavuma

हे देखील वाचा: WTC Final 2025 Day 1: पहिला दिवस ऑस्ट्रेलियाचा! वेबस्टर-स्मिथनंतर गोलंदाजांची कमाल

WTC Final 2025 Day 2: दुसऱ्या दिवशीच सामना रंगतदार अवस्थेत, ऑस्ट्रेलियाचे पारडे किंचित जड

WTC Final 2025 Day 3: दक्षिण आफ्रिकेने गदेभोवती मूठ आवळली! ऐतिहासिक आयसीसी ट्रॉफीपासून 69 धावा दूर

दक्षिण आफ्रिकेने ‘चोकर्स’चा शिक्का पुसला! ऑस्ट्रेलियाला हरवून जिंकली World Test Championship 2025