Breaking News

Paris Olympics 2024 मधील नेमबाजांच्या यशानंतर प्रशिक्षक सुमा शिरूर यांचे मोठे खुलासे, म्हणाल्या, “टोकियोनंतर सर्व…”

paris olympics 2024
Photo Courtesy: X/Suma Shirur

Suma Shirur On Indian Shooters Success In Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिंपिक्स 2024 (Paris Olympics 2024) मध्ये भारताच्या नेमबाजी (Indian Shooters) संघाने आजवरची सर्वोत्तम कामगिरी केली. भारतीय संघाच्या या यशानंतर रायफल संघाच्या प्रशिक्षक असलेल्या सुमा शिरूर (Suma Shirur) यांनी काही खुलासे केले आहेत.

पॅरिस ऑलिंपिक्समध्ये भारताच्या 10 मीटर एयर रायफल संघाच्या प्रशिक्षक असलेल्या माजी ऑलिंपियन सुमा शिरूर यांनी नुकतीच स्पोर्ट्स कट्टा या यु ट्युब चॅनेलवर मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी पॅरिसमध्ये भारतीय पथकाला मिळालेल्या यशाबद्दल तसेच नेमबाजीत झालेल्या सुधारणेबद्दल मत व्यक्त केले. रिओ ऑलिंपिक्स व टोकियो ऑलिंपिक्समधील अपयशानंतर पॅरिसमध्ये काय बदल झाला? असे विचारले असता त्या म्हणाल्या,

“मागील दोन ऑलिंपिक्समध्ये नेमबाजीत एकही पदक न आल्याने सर्व निराश होते. लोक याबाबत अनेकदा उपाहासाने बोलत. मात्र, या सर्वातून लवकर बाहेर पडत फेडरेशन तसेच सर्व संघटनांनी एकत्रितपणे सकारात्मक पद्धतीने काम केले. खेळाडू आणि प्रशिक्षकांना शक्य ती सर्व मदत पुरवली गेली. एक मोठी टीम कार्यरत असल्याने यावेळी यश मिळेल अशी खात्री वाटत होती.”

शिरूर यांनी या मुलाखतीत भारताच्या नेमबाजांचे विशेष कौतुक केले. पुरुष रायफल 3 पोझिशन प्रकारात कांस्य पदक जिंकणाऱ्या कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळे (Swapnil Kusale) याच्या यशाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले,

“अनेकांसाठी स्वप्निलचे यश चकित करणारे होते. मात्र, नेमबाजी संघाला तो पदक जिंकेल असा विश्वास होता. त्याने क्रीडा प्रबोधिनी ते वरिष्ठ राष्ट्रीय संघ असा प्रवास करताना सातत्य दाखवले. टोकियो ऑलिंपिक्ससाठी पात्र होण्याची त्याची संधी थोडक्यात हुकली होती. मात्र, यावेळी त्याने ती कसर भरून काढली.” भारतीय नेमबाजीचे भविष्य सुरक्षित हातात असल्याने, 2028 लॉस एंजेलिस ऑलिंपिक्समध्ये भारतीय यापेक्षा चांगली कामगिरी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

पॅरिस ऑलिंपिक्समध्ये नेमबाजीत भारताने दमदार कामगिरी केली. नेमबाजी संघाच्या खात्यात तीन पदके आली. मनू भाकेर हिने 10 मीटर एयर पिस्टल प्रकारात दोन पदके जिंकली. यामध्ये वैयक्तिक तसेच मिश्र प्रकारात सरबजोत सिंग याच्या सह तीने पदक जिंकले. तर, रायफलमध्ये स्वप्निल कुसळेने यश मिळवून दिले. याव्यतिरिक्त अर्जुन बबुता 10 मीटर एयर रायफल प्रकारात चौथ्या स्थानी राहिला. तसेच, याच प्रकारात महिला गटात रमिता जिंदाल हिने अंतिम फेरी गाठली होती. अनंतजीत व माहेश्वरी यांना स्किट प्रकारात तर मनू भाकेरला 25 मीटर एअर पिस्टल प्रकारात चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले.

(Suma Shirur Reacts On Indian Shooters Success In Paris Olympics 2024)

Paris Olympics 2024: मेडलचे 15 दावेदार| भारतीय नेमबाजांकडून तीन मेडलवर निशाण्याची अपेक्षा, 12 वर्षांचा दुष्काळ यंदा संपणार?

कोल्हापूरच्या स्वप्निलचा कांस्यवेध! Paris Olympics 2024 मध्ये भारताला जिंकून दिले तिसरे मेडल