Suryakumar Yadav Injury : टी20 विश्वचषक 2024च्या (T20 World Cup 2024) साखळी फेरीत अपराजित राहिलेला भारत संघ सुपर आठ सामन्यांच्या तयारीला लागला आहे. 20 जून रोजी बार्बाडोसच्या मैदानावर अफगाणिस्तानविरुद्ध भारताला सुपर आठ फेरीतील पहिला सामना खेळायचा आहे. हा सामना जिंकत उपांत्य फेरीतील आव्हान जिवंत ठेवण्याची संधी भारतीय संघाकडे असेल. परंतु या सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. सराव सत्रादरम्यान भारताचा धाकड फलंदाज जखमी झाला आहे.
सोमवारी (17 जून) भारतीय संघाने बार्बाडोसच्या ब्रिजटाऊनमध्ये सराव सत्राला सुरुवात केली. यावेळी नेटमध्ये फलंदाजी करताना स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवच्या हाताला दुखापत झाली. त्यानंतर फिजिओने येऊन त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. यानंतर स्टार खेळाडूने पुन्हा एकदा फलंदाजी करत सराव सत्र पूर्ण केले. असे असले तरीही, सूर्याची दुखापत किरकोळ होती की गंभीर, याबाबत बीसीसीआयकडून कोणतेही अपडेट समोर आलेले नाही. मात्र ही दुखापत गंभीर असल्यास भारतीय संघासाठी हा मोठा धक्का असू शकतो.
A minor scare as Surya was hit on his hand while taking throw downs. He’s back at the nets within minutes of the magic spray #T20WorldCup #Indiancricket pic.twitter.com/CBChGw4g4j
— Vikrant Gupta (@vikrantgupta73) June 17, 2024
सूर्या भारतीय संघाच्या महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक आहे. त्याने अमेरिकेविरुद्ध नाबाद अर्धशतक झळकावले होते. या खेळीदरम्यान 49 चेंडूंचा सामना करताना त्याने 2 चौकार आणि 2 षटकार मारले. जरी तो पाकिस्तानविरुद्ध काही विशेष करू शकला नाही. पाकिस्तानविरुद्ध 7 धावा करून तो बाद झाला होता. मात्र सुपर आठमध्ये तो संघासाठी मधल्या फळीत महत्वपूर्ण योगदान देऊ शकतो.