
T20 World Cup 2024| टी20 विश्वचषक 2024 मध्ये रविवारी (23 जून) अत्यंत रोमांचक सामना खेळला गेला. विजेतेपदाचे दावेदार मानले जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानने पराभूत केले. अफगाणिस्तानच्या विजयामुळे आता सुपर 8 (Super 8) मध्ये आता रंगत निर्माण झाली आहे. प्रत्येक संघाचा एक एक सामना शिल्लक असला तरी अद्याप सहा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहेत. उर्वरित चार सामन्यात कशी गणिते निर्माण झाली आहेत हे आपण पाहूया.
Where does your side stand in the race for the Men's #T20WorldCup 2024 semi-finals?
Check here ⬇https://t.co/7IV4rx316T
— ICC (@ICC) June 23, 2024
अ गटातील आता भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) आणि बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान (BAN vs AFG) हे सामने शिल्लक आहेत. यामध्ये भारताने दोनही सामने जिंकत आणि मोठा रनरेट राखत आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 100 पेक्षा जास्त धावांनी पराभव झाल्यासच, भारत सुपर 8 मधून बाहेर पडण्याच्या अंधुक आशा आहेत. मात्र, सध्या तरी या गटातून भारत उपांत्य फेरीसाठी नक्की झाल्याचे दिसते.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला तर, ऑस्ट्रेलियाची उपांत्य फेरीसाठी दावेदारी भक्कम होईल. अशा स्थितीत अफगाणिस्तानला बांगलादेशविरुद्ध मोठा विजय साकार करावा लागेल. बांगलादेशने अफगाणिस्तानला पराभूत केल्यास दोन्ही संघ स्पर्धेतून बाहेर होतील. भारताने ऑस्ट्रेलियाला व अफगाणिस्तानने बांगलादेशला मात दिल्यास भारत व अफगाणिस्तान उपांत्य फेरी खेळतील.
ब गटातील स्थिती ही अ गटापेक्षा अधिक किचकट आहे. या गटात सध्या दक्षिण आफ्रिका दोन विजयासह अव्वलस्थानी आहे. मात्र, एकच विजय मिळवलेल्या वेस्ट इंडीज संघाचा रनरेट सर्वोच्च आहे. एक पराभव एक विजय मिळवलेल्या इंग्लंडची अखेरची लढत तुलनेने दुबळ्या युएसएविरूद्ध (ENG vs USA) होईल. या सामन्यात इंग्लंडने विजय मिळवल्यास ते थेट उपांत्य फेरीसाठी पात्र होतील.
इंग्लंडने विजय मिळवल्यास वेस्ट इंडिज विरूद्ध दक्षिण आफ्रिका (WI vs SA) या सामन्याला उपांत्यपूर्व फेरीचे स्वरूप येईल. या सामन्यात विजय मिळवणारा संघ थेट उपांत्य फेरीत दाखल होईल. युएसएने इंग्लंडला पराभूत करण्याची किमया केल्यास वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरी दाखल होतील.
(T20 World Cup 2024 Semi Finals Scenario In Super 8)