Breaking News

Nicholas Pooran : वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरनचा धमाका! एकाच षटकात 36 धावा ठोकत युवराजच्या विक्रमाची बरोबरी

Nicholas Pooran 36 Runs In An Over : टी20 विश्वचषक 2024मधील शेवटच्या साखळी फेरी सामन्यात वेस्ट इंडिजने अफगाणिस्तान (WI vs AFG) संघाचा धुव्वा उडवला. या सामन्यात यजमान वेस्ट इंडिजने जुन्या आठवणी ताज्या करत यंदाच्या विश्वचषकातील सर्वाधिक धावसंख्या उभारली. संघाला धावांचा हा डोंगर उभारुन देण्यात यष्टीरक्षक निकोलस पूरन (Nicholas Pooran) याचा खारीचा वाटा राहिला. त्याने नाबाद 98 धावांची वादळी खेळी खेळली. या खेळीदरम्यान एका षटकात त्याने 36 धावा खेचत माजी भारतीय स्फोटक फलंदाज युवराज सिंगच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.

प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने निर्धारित 20 षटकात 5 बाद 218 धावा केल्या. यातील एकटच्या निकोलस पूरनच्या 98 धावा होत्या. 53 चेंडूंचा सामना करताना 8 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने त्याने ही वादळी खेळी केली. भलेही 2 धावांनी त्याचे टी20 विश्वचषकातील शतक हुकले, परंतु त्याने टी20 क्रिकेटमधील मोठा विक्रम आपल्या नावावर जमा केला.

निकोलस पूरनने एका षटकात 36 धावा केल्या
अफगाणिस्तान संघाकडून डावातील चौथे षटक टाकण्यासाठी अजमतुल्ला उमरजई आला. या षटकात निकोलस पुरनने आपला जुना अवतार दाखवला. अजमतुल्लाहच्या या षटकात निकोलसने सुरुवातीपासूनच मोठे फटके मारले आणि एकूण 36 धावा केल्या.

या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर निकोलस पुरनने षटकार ठोकला. त्यानंतर दुसरा चेंडू नो बॉल ठरला, ज्यावर चौकार गेला. त्यामुळे अजमतुल्लावरील दबाव वाढला आणि त्याने तिसरा चेंडू वाईड टाकला, जो चौकारासाठी गेला. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर फ्री हिट असताना एकही धाव झाली नाही. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर निकोलसने चौकार मारले. पुढे त्याने पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर षटकार ठोकला. उमरजईच्या या षटकात विडिंजला 10 अतिरिक्त धावा मिळाल्या. यामध्ये पाच वाईड, एक नो-बॉल आणि चार लेग-बाय यांचा समावेश होता.

निकोलस पूरनने रोहित-युवराजच्या विक्रमाची बरोबरी केली
निकोलस पूरनने 6 चेंडूत 36 धावा करत टी20 विश्वचषकात 17 वर्षांच्या जुन्या कामगिरीची पुनरावृत्ती केली. तसेच रोहित शर्मा आणि युवराज सिंग यांच्या विक्रमाची बरोबरी केली. 2007 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगने एका षटकात 6 चेंडूत 6 षटकार मारून 36 धावा केल्या होत्या. अशी कामगिरी करणारा युवी हा पहिलाच फलंदाज ठरला. यानंतर किरॉन पोलार्ड, रोहित शर्मा, दीपेंद्र सिंग यांनीही हा पराक्रम केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *