Breaking News

जरा अवघड झालयं तरीही WTC25 Final गाठण्याची टीम इंडियाला संधी, वाचा ‘या’ चार शक्यता, दक्षिण आफ्रिका फायनलमध्ये

wtc25 FINAL
Photo Courtesy: X

WTC25 Final Scenario: जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2025 (WTC 2025) च्या अंतिम फेरी पोहोचण्यासाठीची शर्यत चांगलीच रंगली आहे. दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला पहिल्या कसोटीत पराभूत करत या अंतिम फेरीत आपली जागा निश्चित केली. तर, आता उर्वरित एका जागेसाठी भारत, ऑस्ट्रेलिया व श्रीलंका यांच्या दरम्यान चुरस होईल. भारतीय संघाला या अंतिम सामन्यासाठी पात्र होण्याकरता आता अनेक गणितांवर अवलंबून राहावे लागेल.

(WTC25 Final India Scenario & Chances)

सेंचुरीयन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानला दोन गडी राखून पराभूत केले. त्यामुळे त्यांची जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील जागा पक्की झाली. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पराभूत झाले तरी, ते दुसऱ्या स्थानीच राहू शकतात.‌ त्यामुळे जून महिन्यात लॉर्ड्स येथे होणारा अंतिम सामना ते खेळणे निश्चित आहे.

भारतीय संघाला या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी आता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. ऑस्ट्रेलिया आणि भारत (AUSvIND) यांच्या दरम्यान मेलबर्न येथे असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याचा अखेरचा दिवस अद्याप बाकी आहे. हा सामना भारतीय संघाने जिंकल्यास अंतिम फेरीत पोहोचण्याची आशा कायम राहील. हा सामना अनिर्णित राहिल्यास सिडनी येथे होणारा अखेरचा सामना भारतीय संघाला जिंकावाच लागेल. भारताने ही मालिका 2-1 किंवा 3-1 या फरकाने जिंकल्यास भारत थेट अंतिम सामन्यासाठी पात्र होईल.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप

ही मालिका आत्ता 1-1 अशा बरोबरीत आहे. मालिकेचा निकाल हाच राहिल्यास भारतीय संघाला श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया या मालिकेवर लक्ष ठेवावे लागेल. दोन सामन्यांच्या या मालिकेतील एक सामना श्रीलंकेने जिंकल्यास व दुसरा सामना अनिर्णित राहिल्यास भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचेल. तत्पूर्वी, भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी मालिका गमवावी लागल्यास, भारतीय संघ या शर्यतीतून बाहेर पडेल.

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील मालिका बरोबरीत सुटल्यास श्रीलंका संघाकडे देखील जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम सामन्यात खेळण्याची संधी असेल. मात्र, त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत 2-0 असा विजय मिळवावा लागेल.

(WTC25 Final India Scenario & Chances)

हे देखील वाचा- SAvPAK: दक्षिण आफ्रिकेने रचला इतिहास! थरारक सामन्यात पाकिस्तानला नमवत गाठली WTC ची फायनल