T20 World Cup, Pakistan Team :- बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्त्वाखालील पाकिस्तान संघासाठी टी२० विश्वचषक २०२४ चा (T20 World Cup 2024) हंगाम चांगला राहिलेला नाही. पाकिस्तान संघाने (Pakistan Cricket Team) अमेरिका आणि भारताविरुद्धचे साखळी फेरीतील पहिले २ सामने गमावले आहेत. आज (११ जून) त्यांचा तिसरा व करा अथवा मरा सामना कॅनडा संघाविरुद्ध होणार आहे. हा सामना गमावल्यास पाकिस्तान संघ विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडेल. मात्र या सामन्यापूर्वीच माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू कामरान अकमल (Kamran Akmal) याने बाबरच्या सेनेवर खोचक टीका केली आहे.
पाकिस्तान संघाने अमेरिकेविरुद्धच्या पहिल्या साखळी फेरी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १५९ धावा केल्या. प्रत्युत्तरात अमेरिका संघानेही २० षटकांत ३ विकेट्सच्या नुकसानावर पाकिस्तानच्या १५९ धावांची बरोबरी केल्याने सुपर ओव्हरद्वारे सामन्याचा निकाल लागला. पाकिस्तानी खेळाडूंच्या खराब प्रदर्शनामुळे अमेरिकेने सुपर ओव्हरमध्ये हा सामना जिंकला. अमेरिकेविरुद्धच्या हाराकिरीनंतर पारंपारिक प्रतिद्वंद्वी भारताविरुद्धही पकिस्तानला पराभवाला सामोरे लागले. पाकिस्तानने ६ धावांनी हा सामना गमावला. संघाच्या या निराशाजनक प्रदर्शनामुळे पाकिस्तानी चाहते व माजी क्रिकेटपटू संतापले आहेत.
संघाची ही खराब कामगिरी पाहून कामरान अकमल म्हणाला, “आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानने पुरुष संघांविरुद्ध खेळणे बंद केले पाहिजे. त्याऐवजी त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या महिला संघांविरुद्ध खेळले पाहिजे. संघ या पातळीपर्यंत खाली आला आहे. पाकिस्तान संघात असे अनेक खेळाडू आहेत, जे विश्वचषकाच्या संघात समाविष्ट होण्यासही पात्र नाहीत.” अशा शब्दांत कामरान अकमलने बाबरच्या संघाचे कान टोचले आहेत.