Breaking News

David Warner Retirement : Thank You डेव्ही! वॉर्नरच्या असामान्य आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीची अखेर

David Warner Retirement From International Cricket : ऑस्ट्रेलियासाठी यंदाचा टी20 विश्वचषक (T20 World Cup 2024) वाईट स्वप्नाप्रमाणे राहिला. मिशेल मार्शच्या नेतृत्त्वाखालील ऑस्ट्रेलिया संघाला सुपर 8 फेरीत पहिल्यांदाच अफगाणिस्तानकडून पराभव पाहावा लागला. त्यानंतर भारतीय संघानेही ‘करा वा मरा’च्या सुपर 8 सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिल्याने संघाच्या उपांत्य फेरी खेळण्याच्या स्वप्नांचा चुराडा झाला. या सामन्यासह ऑस्ट्रेलियाच्या धाकड क्रिकेटपटू डेविड वॉर्नर (David Warner) याच्या असामान्य आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचाही अंत झाला.

सेंट लुसियाच्या डॅरेन सॅमी स्टेडियमवर सोमवारी (24 जून) झालेल्या सुपर 8 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 24 धावा राखून पराभूत केले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर वॉर्नरने 6 चेंडूत 6 धावांची खेळी केली. भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने सूर्यकुमार यादवच्या हातून त्याला झेलबाद केल्यानंतर वॉर्नरने रागाच्या भरात उजव्या हात बॅटवर जोराने मारला. यानंतर वॉर्नरच्या नजरा अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश सामन्यावर होत्या. परंतु अफगाणिस्तानने 8 धावांनी हा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाला स्पर्धेतून बाहेर केले. परिणाणी भारताविरुद्ध छोटेखानी खेळीसह वॉर्नरची टी20 आणि आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात आली.

वॉर्नरने याआधीच वनडे विश्वचषक 2023 नंतर वनडेतून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर मायदेशात पाकिस्तानविरुद्ध त्याने कसोटी क्रिकेटचा शेवटचा सामना खेळला होता. आता टी20विश्वचषकाच्या सुपर 8 फेरीतून ऑस्ट्रेलिया संघ बाहेर पडल्यानंतर त्याने टी20 क्रिकेटलाही रामराम केला आहे.

वनडे विश्वचषक जिंकण्याव्यतिरिक्त, वॉर्नरने 2021 मध्ये टी20 विश्वचषक आणि गेल्या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप देखील जिंकली आहे. 37 वर्षीय खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 49 शतकांसह जवळपास 19000 धावा केल्या आहेत. यामध्ये कसोटीतील 112 सामन्यांतील 8786 धावांचा समावेश आहे. तसेच वनडेतील 6932 धावा (161 सामने) आणि टी20तील 3277 धावांचाही (110 सामने) समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *