Breaking News

Jhulan Goswami ला गौतम गंभीरसारखी मिळाली जबाबदारी, नाईट रायडर्सला विजेता बनवण्यासाठी झटणार!

Mentor Jhulan Goswami : ऑस्ट्रेलिया आणि भारतानंतर आता वेस्ट इंडिजनेही महिला टी20 क्रिकेट लीग सुरू केली आहे. महिला कॅरेबियन प्रीमियर लीगचा (Women Caribbean Premier League) पुढील हंगाम पुढील महिन्याच्या 21 तारखेपासून सुरू होणार आहे. ही लीग 29 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. भारताची महान महिला वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) या लीगमध्ये दिसणार आहे. या लीगमध्ये ती एका संघाची मार्गदर्शक म्हणून दिसणार आहे.

या लीगमध्ये भारतातील अनेक महिला खेळाडूही खेळणार आहेत. या लीगमध्ये सध्या फक्त तीन संघ आहेत, त्यापैकी दोन संघ आयपीएल फ्रँचायझीच्या मालकीचे आहेत. यामध्ये बार्बाडोस रॉयल्स महिला, गयाना ॲमेझॉन वॉरियर्स महिला आणि त्रिनबागो नाइट रायडर्स महिला असे तीन संघ सहभागी होत आहेत.

झुलन बजावणार मार्गदर्शकाची भूमिका
या लीगमध्ये झुलन त्रिनबागो नाईट रायडर्सची मार्गदर्शक म्हणून काम करेल. झुलन भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालच्या महिला संघाची मार्गदर्शक आहे. ती महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सची मार्गदर्शक आणि गोलंदाजी प्रशिक्षक आहे. झुलनसोबत जेमिमाह रोड्रिग्स आणि शिखा पांडेही या संघात आहेत. याबाबत झुलन म्हणाली, “एवढ्या मोठ्या फ्रँचायझीचा भाग बनणे ही सन्मानाची गोष्ट आहे. नाइट रायडर्सने भारतात चांगली कामगिरी केली आहे आणि महिला कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये या संघाशी जोडले जाणे हा सन्मान आहे.”

झुलनने 2022मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज आहे. यानंतर ती कोचिंगमध्ये गेली. मुंबई इंडियन्सच्या महिला संघासोबतचे तिचे काम सर्वांनाच आवडले आहे. आता ती गौतम गंभीरने नाईट रायडर्समध्ये केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करणार आहे. गंभीरने मार्गदर्शक म्हणून कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल 2024 चा चॅम्पियन बनवले. आता मार्गदर्शक झुलनकडूनही अशीच अपेक्षा असेल.

असा आहे संघ 
त्रिनबागो नाइट रायडर्सचे नेतृत्व वेस्ट इंडिजची माजी कर्णधार डिआंड्रा डॉटिन करत आहे. ऑस्ट्रेलियाच्या मेग लॅनिंग आणि जेस जोनासन या देखील या संघात आहेत. या दोन्ही ऑस्ट्रेलियन खेळाडू जेमिमाह आणि शिखा यांच्यासह महिला प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतात. नाइट रायडर्सला 23 ऑगस्टला बार्बाडोसविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे.