
Shubham Kadam Shines In MPL 2025: महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2025) चा तिसरा हंगाम नुकताच समाप्त झाला. ईगल नाशिक टायटन्सने अंतिम सामन्यात 6 विकेट्स राखून विजय मिळवला. रायगड रॉयल्स (Raigad Royals) संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. संपूर्ण स्पर्धेत अनेक युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून होतील. यामध्ये रायगड रॉयल्ससाठी खेळणारा युवा लेगस्पिनर शुभम कदम सर्वाधिक भाव खाऊन गेला. त्याच्या कामगिरीची चर्चा क्रिकेट वर्तुळात होऊ लागली आहे.
Leg Spinner Shubham Kadam Shines In MPL 2025
Roaring together, rising together. 🦁
Rushabh Rathod X Shubham Kadam
[Adani Maharashtra Premier League, Adani MPL 2025, Cricket]#ThisIsMahaCricket#AdaniMaharashtraPremierLeague #MPL #MPL2025 pic.twitter.com/IYirw4CSoL— MPLT20Tournament (@mpltournament) June 21, 2025
एमपीएल 2025 च्या साखळी फेरीतील चुरस वाढली असताना, सातारा वॉरियर्सविरुद्ध शुभम कदम याला खेळण्याची संधी मिळाली. प्रत्येकी 10 षटकांच्या झालेल्या या सामन्यात शुभम याने आपल्या अचूक टप्प्यावर केलेल्या गोलंदाजीने 2 षटकात केवळ 9 धावा देत एक बळी मिळवला. तसेच क्षेत्ररक्षणात चित्याची चपळाई दाखवत दोन जबरदस्त झेल पकडले. त्याच्या कामगिरीने खुश होत सामनावीर ठरलेल्या तनय संघवी याने आपला सामनावीर पुरस्कार त्याला दिला.
त्यानंतरही पुढील सामन्यांमध्ये शुभमने आपल्या लेगस्पिन, रॉंग वन व गुगलीने अनेक फलंदाजांना बुचकळ्यात टाकले. यानंतर झालेल्या एलिमिनेटर सामन्यातही त्याने कंजूस गोलंदाजी करत 3 षटकांत फक्त 13 धावा देत एक बळी टिपला. तर, क्वालिफायर 2 मध्ये 4 षटकात अवघ्या 16 धावा देताना रामकृष्ण घोषला ड्रीम बॉल टाकत बोल्ड केले. फायनलचाही अजिबात दबाव न घेता त्याने 28 धावा देत मंदार भंडारीची महत्त्वपूर्ण विकेट मिळवली होती. त्याने हंगामात पाच सामने खेळताना केवळ चार बळी मिळवले असले तरी, त्याचा इकॉनॉमी रेट 5.05 इतका शानदार राहिला.
अवघ्या 17 वर्षांचा असलेल्या शुभम मूळचा दौंड तालुक्यातील वरवंड गावचा आहे. त्याने आपल्या क्रिकेटचे धडे केडगाव येथे सुधीर थोरात यांच्याकडे गिरवले. त्यानंतर त्याने आपले बस्तान पुणे येथे हलवत केडन्स क्रिकेट अकादमीत प्रवेश घेतला. महाराष्ट्राचा माजी रणजीपटू निखिल पराडकर याच्या मार्गदर्शनात त्याने आपल्या क्रिकेट कौशल्यांना धार दिली. केडन्स संघासाठी त्याने अनेक निमंत्रित स्पर्धा खेळल्या. त्यानंतर त्याचे महाराष्ट्र क्रिकेट वर्तुळात चर्चा होऊ लागलेली.
लेगस्पिन गोलंदाजी आणि उत्कृष्ट फलंदाजी अशी कौशल्ये असलेल्या शुभम याने महाराष्ट्र अंडर 16 व महाराष्ट्र अंडर 19 क्रिकेट संघाचे (Maharashtra U19 Cricket Team) प्रतिनिधित्व केले आहे. कुचबिहार ट्रॉफी 2024-2025 मध्ये क्वार्टर फायनलसाठी झालेल्या सामन्यात शुभमने आंध्र प्रदेशविरूद्व 39 धावांमध्ये 6 बळी मिळवलेले. त्याच्या या गोलंदाजामुळे महाराष्ट्र संघ आघाडी घेऊ शकला आणि त्यानंतर क्वार्टर फायनलसाठी पात्र झाला.
शुभमला याच कामगिरीमुळे त्याची एप्रिल महिन्यात झालेल्या एनसीए कॅम्पसाठी निवड झाली होती. ज्या ठिकाणी त्याला एनसीएच्या नामांकित प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन मिळवण्याची संधी मिळाली. शुभमच्या एमपीएलमधील कामगिरीने भारताचे माजी क्रिकेटपटू व माजी निवडसमिती अध्यक्ष किरण मोरे हे अत्यंत प्रभावित झाल्याचे दिसले. तसेच, सोशल मीडियावर देखील त्याच्या नावाची चांगलीच चर्चा झाली. त्यामुळे आगामी काळात शुभम याच्यावर अनेक आयपीएल संघांची नजर असेल.
(Story Of MPL 2025 Talent Shubham Kadam)
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: ईगल नाशिक टायटन्स बनली MPL 2025 चॅम्पियन! रायगड रॉयल्स फायनलमध्ये पराभूत