
Karun Nair International Career Might Ended: इंग्लंड विरुद्ध भारत (ENG vs IND) या कसोटी मालिकेतील चौथा सामना मँचेस्टर येथे बुधवारी (23 जुलै) सुरू झाला. या सामन्यासाठी भारतीय संघात तीन बदल केले गेले. अनुभवी करुण नायर याच्या जागी साई सुदर्शन याला संधी मिळाली. यानंतर आता करूणचे आंतरराष्ट्रीय करियर संपले, अशी चर्चा सुरू झाली आहे.
Some Players Are Not At All Meant For International Cricket.
Thank You Karun Nair. pic.twitter.com/WZI8jt3VzP
— Vaibhav Bhola 🇮🇳 (@VibhuBhola) July 23, 2025
Karun Nair International Career Might Ended
कर्नाटक आणि भारत अ संघांसाठी सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतर करूण याला 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध मोहाली येथे कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली. आपल्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात तो अनुक्रमे 4 व 13 धावा बनवू शकला. मात्र, चेन्नई येथे झालेल्या मालिकेतील अखेरच्या व आपल्या तिसऱ्या सामन्यात त्याने ऐतिहासिक कामगिरी केली. विरेंद्र सेहवाग याच्यानंतर भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा तो केवळ दुसरा भारतीय बनला.
या खेळीने करूण रातोरात स्टार बनला होता. त्याची तुलना अनेक भारतीय व विदेशी दिग्गजांसोबत होऊ लागली. मात्र, यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत त्याला पुन्हा एकदा संधी मिळाली. या मालिकेत तो सपशेल अपयशी ठरला. मालिकेतील तीन सामन्यात त्याला एकदाही 30 चा आकडा गाठत आला नाही. परिणामी, त्याला डच्चू दिला गेला. पुढच्या काळात देशांतर्गत क्रिकेट व काऊंटी क्रिकेटमध्ये त्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली.
करूण याने 2022 मध्ये एक ट्विट केले. ‘डिअर क्रिकेट, मला अजून एक संधी दे’ या ट्विटची नेहमी चर्चा व्हायची. रणजी, काऊंटी, विजय हजारे ट्रॉफी व सय्यद मुश्ताक अली या सर्व स्पर्धा त्याने गाजवल्या. शेवटी 2025 आयपीएलमध्येही 89 रन्सच्या धुवाधार खेळीने कमबॅक केले. त्यानंतर पुन्हा एकदा त्याच्या आंतरराष्ट्रीय पुनरागमनाची चर्चा व्हायला लागली. अखेर इंग्लंड दौऱ्याच्या भारत अ आणि कसोटी अशा दोन्ही संघात त्याची निवड झाली.
इंग्लंड टूरवर सर्व क्रिकेटजगत करूणच्या कमबॅकसाठी तयार होते. इंग्लंडच्या भूमीवर पाऊल ठेवल्यावर पहिल्याच इनिंगमध्ये त्याने इंग्लंड लायन्सविरुद्ध 205 रन्सची खेळी करून ‘त्या’ ट्विटला पुन्हा एकदा चर्चेत आणले. दुसऱ्या सराव सामन्यात तो चांगली सुरुवात करण्यात यशस्वी ठरला. त्यामुळे कसोटी मालिकेसाठी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळणार हे निश्चित झाले.
हेडिंग्ले येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच डावात तो खातेही खोलू शकला नाही. दुसऱ्या डावातही तो फक्त 20 धावांपर्यंत पोहोचू शकला. दुसऱ्या कसोटी पुन्हा एकदा तो फेल. धावा होत्या 31 आणि 26. क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्स कसोटीत 40 आणि 14 अशी त्याची आकडेवारी राहिली. परिणामी, मॅंचेस्टर कसोटीतून त्याला बाहेर बसावे लागले. आता मालिकेतील शेवटच्या कसोटीतही त्याला संधी मिळण्याची शक्यता धूसरच दिसते. त्यामुळे मोठ्या मेहनतीने त्याने मिळवलेली दुसरी संधी मातीमोल झाली, असं म्हणावे लागेल.
करूणचे वय आता 33 पेक्षा जास्त आहे. भारताच्या कसोटी संघाचा विचार केल्यास साई सुदर्शन त्याच्या जागी सध्या तरी खेळतोय. पर्यायांची चाचपणी केल्यास अभिमन्यू ईस्वरन, ध्रुव जुरेल आणि ऋतुराज गायकवाड हे त्याच्यापेक्षा तुलनेने युवा आणि सातत्यपूर्ण फलंदाज संघ व्यवस्थापनाच्या नजरेत असतील. या स्थितीत निवडसमिती आणि संघ व्यवस्थापन करूणला तिसरी संधी देण्याची शक्यता कुठेच दिसत नाही.
करूणच्या आजवरच्या कसोटी कारकिर्दीवर नजर टाकल्यास दिसून येते की, तो 9 सामन्यांच्या 13 केवळ 505 धावा करू शकलाय. त्याची सरासरी 42 पेक्षा जास्त दिसतेय. मात्र, या सगळ्या आकडेवारीतून एक 303 धावांची खेळी वजा केली तर त्याच्या कामगिरीची आकलन सुमार या शब्दात करावे लागेल. भारतीय क्रिकेटमधील सध्याची काट्याची स्पर्धा पाहता त्यात करूणचे टिकणे अवघड दिसते. त्यामुळे करूणचे करियर संपले, असे अनेक जण छातीठोकपणे म्हणू शकतात.
(Karun Nair International Career Might Ended)
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: SA20 Retention: एसए 20 2026 साठी रिटेन्शन जाहीर, खेळाडूंची झाली अदलाबदली, वाचा सविस्तर
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।