
Who Is Simon Harmer: कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानावर रविवारी (16 नोव्हेंबर) भारत आणि दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांच्यातील पहिला कसोटी सामना समाप्त झाला. तिसऱ्या दिवशीच समाप्त झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 124 धावांचा बचाव करताना ऐतिहासिक विजय मिळवला. दक्षिण आफ्रिका संघ तब्बल 15 वर्षांनंतर भारतात कसोटी सामना जिंकण्यात यशस्वी ठरला. या विजयाचा शिल्पकार ठरला फिरकीपटू सायमन हार्मर. दोन्ही डावात प्रत्येकी चार बळी त्याने टिपले. मात्र, हा हार्मर नक्की कोण आहे? हे आपण जाणून घेऊया.
Story Of Simon Harmer
सात फिरकीपटू खेळत असलेल्या सामन्यात हार्मरच्या चेंडूंना सर्वाधिक टर्न मिळत होता. भारताचे तथाकथित ‘स्पिन स्पेशालिस्ट’ फलंदाज त्याच्यापुढे अक्षरशः स्कूल बॉय वाटत होते. मात्र, त्याने इथपर्यंत पोहोचण्यासाठी केलेला संघर्ष नक्कीच खूप मोठा आहे.
हार्मरचे सध्याचे वय 36. या संघातील सर्वात वयस्कर खेळाडू म्हणून तो खेळतोय. कित्येकांनी त्याचे नाव या कसोटीच्या दुसऱ्या दिवशीच पहिल्यांदा ऐकले. मात्र, हार्मर दुसऱ्यांदा भारतात कसोटी मालिका खेळतोय आणि ती देखील तब्बल 10 वर्षाच्या गॅपनंतर. हार्मरने 2015 भारत दौऱ्यावर दोन कसोटी सामने खेळत 10 बळी मिळवले होते. त्यावेळी आपल्या प्राईममध्ये असलेल्या रविचंद्रन अश्विनची गोलंदाजी पाहून तो अक्षरशः अवाक् झाला होता. भारत दौऱ्यानंतर त्याला संघातून वगळण्यात आले. त्यावेळी त्याने मनातच ग्रह केला की, मी तितका उत्कृष्ट नाही. त्याने स्वतःला काही काळासाठी क्रिकेटपासून बाजूला केलं.
Story Of Simon Harmer
पुन्हा मैदानात उतरायचं तर, सर्वोत्तम होऊनच असा ध्यास त्याने त्यासाठी त्याने 2016 मध्ये पुन्हा एकदा काढलं भारताचं तिकीट आणि पोहोचला भारतीय क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईत. मुंबईमध्ये उमेश पटवाल (Umesh Patwal) यांच्या मार्गदर्शनात त्याने फिरकी गोलंदाजीचे आणखी बारकावे शिकले. तो कबूल करतो की, “भारतात घालवलेला तो काळ माझ्यासाठी टर्निंग पॉईंट होता. फिरकी गोलंदाजी नक्की काय असते, हे मला त्यावेळी समजले.” यानंतर हार्मर एक वेगळाच गोलंदाज म्हणून तयार झाला.
पुढील वर्षी त्याने कोलपॅक करार स्वीकारला आणि एसेक्सचे प्रतिनिधीत्व करण्यास सुरुवात केली. पुढील नऊ वर्ष तो काऊंटी खेळत राहिला. यादरम्यान एकही हंगाम असा केला नाही की, त्याला अव्वल 10 बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीतून बाहेर रहावे लागले. तो 2019,2020 व 2022 या काऊंटी हंगामात तर सर्वाधिक बळी मिळवणारा गोलंदाज होता. इंग्लंडमध्ये एखाद्या फिरकी गोलंदाजाने इतके वर्चस्व गाजवणे ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे.
पुढे कोलपॅक पद्धतच संपुष्टात आली आणि हार्मर दक्षिण आफ्रिकेसाठी खेळण्याकरिता उपलब्ध झाला. मात्र, इथे केशव महाराजने दक्षिण आफ्रिकेचा प्रमुख फिरकीपटू म्हणून स्वतःला स्थापित केले होते. ज्यावेळी संघाला गरज पडेल तेव्हा आपण तयार असू, अशी खात्री हार्मरने निवड समितीला दिलेली. त्याचा पहिला कर्णधार राहिलेल्या ग्रॅमी स्मिथने त्याच्यावर विश्वास दाखवला आणि त्याला दुसरी संधी दिली.
कोविडनंतर मिळालेल्या या दुसऱ्या संधीचे सोनेच केले आहे. पाकिस्तानात आपल्या फिरकीने त्याने दहशत माजवली. आता भारतात ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. फक्त एक सामना खेळून 2015 ला भारतात आलेला हार्मर आता 1000 फर्स्ट क्लास विकेट नावावर असलेला हार्मर आहे. गुवाहाटीमध्ये पुन्हा एकदा अशीच फिरकीचे नंदनवन असलेली खेळपट्टी मिळाल्यास हार्मर भारतीय फलंदाजांना पुन्हा एकदा ‘बिहू’ करायला निश्चितच लावू शकतो.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
हे देखील वाचा: ईडनवर टीम इंडियाची निघाली लाज! Kolkata Test मध्ये 124 धावांचा पाठलाग करताना भारत 30 धावांनी पराभूत
kridacafe
One comment
Pingback: Latest Sports News in Marathi । क्रीडा कॅफे ताज्या मराठी बातम्या । Cricket Live Score ।