Breaking News

Ratan Tata यांच्या निधनाने हळहळले क्रिकेटविश्व, या शब्दांत दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली

ratan tata
Photo Courtesy: X

Ratan Tata Passed Away: भारताचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचे बुधवारी (9 ऑक्टोबर) निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर जगभरातून शोक व्यक्त केला जात आहे. क्रिकेटविश्वातून देखील त्यांना श्रद्धांजली अर्पण केली गेली. अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

जगभरात मोठे उद्योगपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या टाटा यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. टाटा हे केवळ उद्योजक म्हणून नव्हे तर मोठे दानशूर म्हणूनही प्रसिद्ध होते. सर्व क्षेत्रातून त्यांचा आदर केला जात. त्यांच्या निधनानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू व भारतरत्न सचिन तेंडुलकर याने ट्विट करत म्हटले,

‘आदरणीय रतन टाटा यांच्या निधनाने देश दुखाच्या खाईत लोटला गेला आहे. त्यांच्याशी माझे संबंध आले हे मी खरेच भाग्याचे समजतो. मात्र, देशभरातील असे अनेक लोक आहेत जे त्यांना भेटले नसले तरी, त्यांच्याही मनात अशीच भावना आहे.’ असे म्हणत सचिनने त्याच्या आठवणी जागवल्या.

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने म्हटले, ‘अगदी सोन्यासारखे मन असलेला माणूस. तुम्ही नेहमी लक्षात राहाल, ज्यांनी लोकांचे आयुष्य उत्कृष्ट बनवण्यासाठी मेहनत केली.’ भारताचा वरिष्ठ क्रिकेटपटू विराट कोहली याने इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत आपल्याकडून आदरांजली वाहिली.

याव्यतिरिक्त भारतीय संघाचा युवा क्रिकेटपटू शुबमन गिल, माजी क्रिकेटपटू शिखर धवन, बीसीसीआय सचिव जय शहा व दिनेश कार्तिक यांनी देखील त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

(Cricket World Pay Tribute To Ratan Tata)