
Head Coach Gautam Gambhir: काही दिवसांपूर्वीच भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) याला भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानंतर आता त्याच्या मदतीला नवीन सपोर्ट स्टाफ देखील येईल. स्वतः गंभीर याने काही नावे बीसीसीआय (BCCI) ला सुचवली आहेत. आता यामध्ये दोन विदेशी खेळाडूंच्या नावाची भर पडली आहे.
गंभीरने मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर अभिषेक नायर याला सहाय्यक प्रशिक्षक तसेच विनयकुमार याला गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी देण्यासाठी बीसीसीआयकडे विचारणा केली होती. बीसीसीआयने नायर याच्या नावाला पसंती दर्शवल्याचे कळते. मात्र, विनयकुमार याच्या नावावर फुली मारल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून झहीर खान व एल बालाजी यांचा विचार सुरू असल्याचे बोलले जातेय.
या सर्व चर्चेदरम्यानच आता गंभीरने भारतीय सपोर्ट स्टाफमध्ये विदेशी प्रशिक्षकांना आणण्याचा पर्याय समोर ठेवला आहे. त्याने नेदरलँड्सचा माजी कर्णधार व कोलकाता नाईट रायडर्सचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक रेयान टेन डोशचे (Ryan Ten Doeschate) याला भारताच्या सपोर्ट स्टाफमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तर, गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून त्याने दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज माजी वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केल (Morney Morkle) याचे नाव पुढे केले आहे. मॉर्केल हा गंभीर कर्णधार असताना अनेक वर्ष कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मुख्य गोलंदाज होता. तसेच, गंभीर लखनऊ सुपरजायंट्स संघाचा मेंटर असताना त्याने या संघासाठी गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका निभावली होती.
जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप
या संपूर्ण प्रकरणावर अद्याप बीसीसीआयकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. भारतीय संघ जुलै महिन्याच्या अखेरीस श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ 22 जुलै रोजी रवाना होऊ शकतो. तत्पूर्वी, या सर्व प्रशिक्षकांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे.
(Gautam Gambhir Demands Ten Doeschate And Morkel In Support Staff)