Breaking News

ENG vs WI : अँडरसन युगाचा शेवट अन् नव्या स्टारचा उदय, कसोटीत 90 वर्षांनंतर घडला चमत्कार

ENG vs WI Test: इंग्लंड क्रिकेट संघाने पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 114 धावांनी पराभव केला. हा सामना महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचा (James Anderson) शेवटचा कसोटी सामना होता. या सामन्यात गस ऍटकिन्सनने (Gus Atkinson) इंग्लंडकडून पदार्पण करत अप्रतिम कामगिरी केली. तो इंग्लंडच्या विजयाचा नायक ठरला. त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला आहे. आपल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर त्याने 90 वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये मोठा चमत्कार घडवला आहे.

गस ऍटकिन्सनने पहिल्या डावात एकूण 7 विकेट्स घेतल्या. त्याच्यामुळे वेस्ट इंडिजचा संघ पहिल्या डावात केवळ 121 धावा करू शकला. यानंतर, त्याने दुसऱ्या डावातही धाकड गोलंदाजीचे उदाहरण सादर केले आणि 5 विकेट्स घेतल्या. अशाप्रकारे त्याने दोन्ही डावात मिळून एकूण 12 विकेट्स घेतल्या. 1934 नंतर पहिल्यांदाच इंग्लंडच्या कोणत्या गोलंदाजाने पदार्पणाच्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात 10 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा गस ऍटकिन्सन हा इंग्लंडचा आठवा गोलंदाज ठरला आहे. पदार्पणाच्या कसोटी सामन्यातील सर्वोत्तम गोलंदाजीच्या बाबतीत तो चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने 26 षटके टाकली, एकूण 106 धावा दिल्या आणि 12 विकेट्स घेतल्या.

विशेष म्हणजे, गस ऍटकिन्सन फक्त 26 वर्षांचा आहे आणि त्याला जेम्स अँडरसनच्या शेवटच्या सामन्यात कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याने मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा करून घेत चमकदार कामगिरी केली. आता अँडरसनने निवृत्ती घेतली आहे. अशा स्थितीत पुढील काही सामन्यांसाठी इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये गस ऍटकिन्सनचे स्थान जवळपास निश्चित झाले आहे. त्याने इंग्लंडकडून 9 वनडे सामन्यांमध्ये 11 विकेट्स आणि 3 टी20 सामन्यात 6 विकेट्स घेतल्या आहेत.

इंग्लंडने सामना जिंकला
दरम्यान वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 121 धावा केल्या होत्या. यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 371 धावा केल्या आणि त्यामुळे त्यांना 250 धावांची आघाडी मिळवली. त्यानंतर गस ऍटकिन्सनसमोर वेस्ट इंडिजचे फलंदाज दुसऱ्या डावात टिकू शकले नाहीत आणि 136 धावांवर गारद झाले. परिणामी इंग्लंडने 1 डाव आणि 114 धावांनी सामना जिंकला.