Virat Kohli Viral Video : शनिवारी (22 जून) अँटिग्वामध्ये बांगलादेशविरुद्ध झालेल्या आपल्या दुसऱ्या सुपर 8 सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी विजय मिळवला. हा त्यांचा सुपर 8 फेरीतील सलग दुसरा विजय होता. या सामना विजयासह भारतीय संघाने उपांत्य फेरीतील त्यांचे स्थान निश्चित केले आहे. या सामन्यात क्रिकेट चाहत्यांना काही मजेशीर प्रसंगही पाहायला मिळाले. बांगलादेशच्या डावादरम्यान स्टार फलंदाज विराट कोहली याच्या एका कृतीमुळे क्रिकेटशौकिनांना गल्ली क्रिकेटची आठवण झाली असावी!
त्याचे झाले असे की, कर्णधार रोहित शर्माने 18वे षटक फिरकीपटू अक्षर पटेलच्या हाती सोपवले होते. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बांगलादेशचा क्रिकेटपटू रिशद होसेनने उत्तुंग षटकार मारला. हा षटकार मारलेला चेंडू मैदानात लावलेल्या टेबलाखाली गेला. मात्र तो चेंडू टेबलाखाली जाऊन काढण्याशिवाय पर्याय नव्हता. मग काय स्टारडम बाजूला सोडून विराट कोहलीला गल्ली क्रिकेटची आठवण झाली आणि टेबलाखाली जाऊन त्याने चेंडू काढून आणला. त्याचा हा अंदाज पाहून नेटकरीही खूश झाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Virat Kohli 🐐 finding the ball.
– Gully cricket vibes. 😂❤️ pic.twitter.com/gPNi3bTsUr
— 𐌑ⲅ Ꭺɴɪsʜ¹⁸ (@Number18only) June 22, 2024
दरम्यान या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने हार्दिक पांड्याच्या वेगवान अर्धशतकाच्या जोरावर 5 बाद 196 धावा केल्या. हार्दिकने 27 चेंडूत नाबाद 50 धावांचे योगदान दिले. यष्टीरक्षक रिषभ पंतनेही 36 धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात 197 धावांच्या आव्हानाचा बचाव करताना भारताने बांगलादेशला 146 धावांवर रोखले आणि 50 धावांच्या फरकाने सामना खिशात घातला. या डावात भारतीय फिरकीपटू कुलीदप यादवची गुगली कमाल दाखवून गेली. कुलदीपने 4 षटकांत 19 धावा देत 3 विकेट्स काढल्या. तर अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह यांनीही प्रत्येकी 2 विकेट्सचे योगदान दिले.