Breaking News

Paris Olympics 2024: ओपनिंग सेरेमनीमध्ये सिंधू-शरथने फडकाविला तिरंगा! पारंपारिक वेशभूषेत 117 ऍथलिटची हजेरी

PARIS OLYMPICS 2024
Photo Courtesy: X

Paris Olympics 2024: फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे होत असलेल्या 33 व्या ऑलिंपिक स्पर्धांना शनिवारी (27 जुलै) सुरुवात झाली. स्पर्धेत सहभागी होत असलेल्या 205 देशांच्या पथकांनी या खेळांच्या महाकुंभाच्या ओपनिंग सेरेमनीला (Paris Olympics Opening Ceremony) हजेरी लावली. भारताच्या 117 ऍथलिट असलेल्या पथकाचे नेतृत्व बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू (PV Sindhu) व टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल (Achanta Sharath Kamal) यांनी केले.

ऑलिंपिक इतिहासात प्रथमच स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मुख्य मैदानात पार पडला नाही. पॅरिसच्या प्रसिद्ध सीन नदीवर सर्व देशांची परेड घेण्यात आली. सीन नदीच्या दुतर्फा जवळपास तीन लाख लोकांनी या सोहळ्याला हजेरी लावली. यादरम्यान फ्रान्सचे ऐतिहासिक महत्त्व दाखवणाऱ्या कलाकृती सादर केल्या गेल्या.

या उद्घाटन सोहळ्यात सर्व संघ बोटमधून सामील झाले. भारतीय पथकाची बोट 84 व्या क्रमांकावर होती. भारताच्या या पथकाचे ध्वजवाहक (Indian Flag Bearer) म्हणून दोन वेळची ऑलिंपिक पदकविजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू व तब्बल सहाव्यांदा ऑलिंपिक खेळण्यासाठी उतरलेला अचंता शरथ कमल यांनी जबाबदारी पार पाडली. भारताच्या या पथकात 117 खेळाडूंचा समावेश आहे. त्यापैकी सर्वाधिक 21 खेळाडू नेमबाजी संघातील आहेत.

जॉईन करा क्रीडा कॅफेचा व्हॉट्सअप ग्रुप 

या उद्घाटन सोहळ्यात सर्वप्रथम ऑलिंपिक खेळाचे जनक म्हटल्या जाणाऱ्या ग्रीसचे पथक सहभागी झाले. त्यानंतर रिफ्युजी खेळाडूंचे पथक या सोहळ्यात दाखल झालेले. 205 देशांच्या परेडमध्ये अखेरीस यजमान फ्रान्सचे पथक दिसून आले. जगातील खेळांची सर्वात मोठे स्पर्धा असलेले हे ऑलिंपिक 11 ऑगस्टपर्यंत खेळले जाईल. यामध्ये जगभरातील 10,000 पेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत.

(Indian Contingent In Paris Olympics 2024 Opening Ceremony Sindhu And Achanta Sharath Kamal Flag Bearer)