Breaking News

INDvsPAK | ‘ट्रॅक्टर विकून मॅच पाहायला आलो, पण लाज वाटली…’, पाकिस्तानी चाहत्याचा Video Viral

IND vs PAK, T20 World Cup 2024 :- जगभरात क्रिकेट चाहत्यांची कमी नाही. क्रिकेट सामना पाहण्यासाठी किंवा आपल्या आवडत्या क्रिकेटपटूसाठी चाहते कधी काय करतील? याचा अंदाज लावणे कठीण आहे. नुकताच न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत विरुद्ध पाकिस्तान या कट्टर विरोधकांमध्ये टी२० विश्वचषक सामना पार पडला. हा सामना पाहण्यासाठी जगभरातून क्रिकेटप्रेमींनी स्टेडियममध्ये गर्दी केली होती. मात्र या गर्दीत एका क्रिकेटचाहत्याने सर्वांचे लक्ष वेधले. हा चाहता स्वत:चा ट्रॅक्टर विकून भारत-पाकिस्तानमधील हाय व्होल्टेज लढत पाहण्यासाठी आला होता. परंतु भारतीय संघाने त्याचे हृदय तोडले.

त्याचे झाले असे की, भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील लढत पाहण्यासाठी एका पाकिस्तानी चाहत्याने त्याचा ट्रॅक्टर विकला होता. त्याला या सामन्यात पाकिस्तानला जिंकताना पाहायचे होते. परंतु त्याची निराशा झाली. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले की, या सामन्याचे तिकीट मिळवण्यासाठी त्याने आपला ट्रॅक्टर तीन हजार डॉलरला विकला होता. जेव्हा त्याने भारताची धावसंख्या पाहिली तेव्हा त्याला वाटले की आपले बलिदान यशस्वी ठरेल. परंतु भारतीय संघाने शानदार पुनरागमन केले आणि त्याच्या इच्छा धुळीस मिळाल्या. सामन्यानंतर त्या चाहत्याने पाकिस्तानला अधिक मेहनत घेण्याचा सल्ला दिला आहे.

काय घडलं सामन्यात?
टी20 विश्वचषक 2024 चा 19 वा सामना रविवारी कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये खेळला गेला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने 19 षटकांत 10 गडी गमावून 119 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ 20 षटकांत 7 गडी गमावून 113 धावाच करू शकला. जसप्रीत बुमराहच्या घातक गोलंदाजीमुळे रोहित शर्माच्या सेनेने सामना सहा धावांनी जिंकला. या सामन्यात वेगवान गोलंदाजाने एकूण तीन विकेट घेतल्या. त्याने आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये 3.50 च्या इकॉनॉमी रेटने केवळ 14 धावा दिल्या आणि सामना भारताच्या बाजूने वळवला. या शानदार कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. याआधी 2023च्या एकदिवसीय विश्वचषकात बुमराहने पाकिस्तानविरुद्ध 19 धावांत दोन बळी घेतले होते आणि तो सामनावीर ठरला होता.

महत्वाच्या बातम्या-

INDvPAK | पाकिस्तान पुन्हा भारतापुढे नतमस्तक, कर्णधार बाबर आझमने सांगितले नेमकी कुठे झाली चूक?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *